Nasrapur Case : नसरापूर प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणार यावर सरकार ठाम - नवनाथ बन

फास्टट्रॅकवर सुनावणी, राऊतांनी बिनबुडाचे आरोप टाळावेत

    03-May-2026
Total Views |
navnath ban
 
मुंबई : (Nasrapur Case) "नसरापूर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत आहेत. राज्य सरकारच्या वतीने हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून ठोस पुरावे गोळा करून आरोपीला फासावर लटकवण्यापर्यंतची कारवाई केली जाईल.या संवेदनशील प्रकरणात विनाकारण राजकारण करून बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे." अशी प्रतिक्रिया भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.३ रोजी दिली.
 
"कोणतेही प्रकरण घडले की “लाडकी बहीण योजना बंद करा” अशी मागणी करणे चुकीचे आहे.या योजनेचा आणि गुन्हेगारी प्रकरणांचा काहीही संबंध नसताना मुद्दामून महिलांविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असून सरकार एकीकडे महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या योजनांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या मदतीवर आक्षेप घेणे म्हणजे त्यांच्या सन्मानावर आघात आहे." असे बन यांनी स्पष्ट केले. (Nasrapur Case)
 
सरकारचे “एन्काऊंटर करा” अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी सुनावले की, "जनतेनेच तुमचा राजकीय एन्काऊंटर केला आहे. सरकार या प्रकरणात अत्यंत गंभीर असून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस काम करून पुरावे गोळा करत आहे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा मिळवून देणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. अशा संवेदनशील विषयात राजकीय चिखलफेक करणे अयोग्य असून राऊतांनी या प्रकरणात तरी राजकारण करू नये."(Nasrapur Case)
 
हेही वाचा :  विधानपरिषद निवडणूक आणि पोटनिवडणूकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती
 
महिला अत्याचारावर बोलताना संजय राऊतांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. पाटकर नावाच्या महिलेबाबतच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले. (Nasrapur Case)
"खासदार निधीवर भाष्य करण्याआधी संजय राऊतांनी आत्मपरीक्षण करावे. महाविकास आघाडीच्या काळात भाजप आमदारांना निधी देण्यात झालेला अन्याय, तसेच १२ आमदारांचे निलंबन याची आठवण लक्षात असावी. राऊतांचे सहकारी नेते पक्ष सोडून जात असून , पक्षांतर्गत असंतोषाकडे त्यांनी लक्ष द्यावे, इतरांना सल्ले देण्याआधी स्वतःच्या भूमिकेचा विचार करण्याची त्यांना गरज आहे."असेही बन म्हणाले. (Nasrapur Case)
 
भाजपवर “पैसे वाटून निवडणूक जिंकते” असा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले." महाविकास आघाडीच्या काळात दररोज १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाले होते, त्याचा हिशोब आधी द्यावा. भाजप जनतेची सेवा करून, काम करून आणि लोकांचा विश्वास जिंकून निवडणुका जिंकते. अशा प्रकारचे आरोप करण्याआधी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा." असे बन यांनी ठणकावून सांगितले. (Nasrapur Case)