जीवनाचा खरा अर्थ केवळ जगण्यात नसून, तो मूल्यांसाठी जगण्यात आणि समाजासाठी काहीतरी करून जाण्यात आहे. या तत्त्वांना आपल्या कृतीतून साकार करणारे कै. नरहरी भार्गव तथा आबा मुळ्ये हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
समाजकार्य, शिक्षकधर्म आणि संघनिष्ठा यांचा सुंदर संगम ज्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो, ते म्हणजे कै. नरहरी भार्गव तथा आबा मुळ्ये. ‘स्वयंसेवक’ ही केवळ ओळख नसून ती जीवनशैली आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचे संपूर्ण आयुष्य होय. साधेपणा, प्रामाणिकपणा, निःस्वार्थ वृत्ती आणि दृढनिश्चय या गुणांच्या जोरावर त्यांनी आपले जीवन समाजकार्यासाठी अर्पण केले.
१९४८ च्या सत्याग्रहात सहभाग घेतल्यानंतर त्यांनी तळेगाव, पुणे येथे शिक्षक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. पुढे जून १९५२ मध्ये ‘पेण प्रायव्हेट हायस्कूल’मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि तेथूनच त्यांनी आपल्या कार्याचा पाया अधिक भक्कम केला. पेंडसे मास्तरांच्या विश्वासावर त्यांनी पेणमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्या विश्वासाला पूर्ण न्याय देत तब्बल २९ वर्षे (१९५२ ते १९८०) अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने आपली नोकरी बजावली. एकूण ४६ वर्षे त्यांनी स्वयंसेवकत्व टिकवून ठेवले, वाढवले आणि समाजमान्य केले.
“कामात चोख, संघकामात रोख” हा त्यांचा जीवनमंत्र होता. शाळेतील अध्यापनात ते जितके कुशल होते, तितकेच संघकार्याबाबत ते ठाम आणि समर्पित होते. त्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. त्या काळातील काँग्रेसचे मान्यवर नेते मा. भाऊसाहेब नेने, मा. प.रा. दाते, अप्पाराव भावे यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.
१९७५च्या आणीबाणीच्या काळात सर्वत्रच दहशत होती. त्यांच्या मुलाने पुण्यात सत्याग्रह केला होता. मुलीने अलिबागला केला होता. त्याचा त्यांना अभिमान होता. त्यांच्या नशिबात सत्याग्रह करण्याचे भाग्य नव्हते, कारण पेणला सत्याग्रह होणार नाही असे वातावरण होते; पण आणीबाणीचे दमनचक्र चालूच होते. एके दिवशी पोलीस चौकशीसाठी शाळेत आले असताना त्यांनी कोणतीही भीती न बाळगता “मी संघाचा स्वयंसेवक आहे” असे ठामपणे सांगितले. त्यांच्या लॉकरची तपासणी झाली, परंतु काहीही आक्षेपार्ह न सापडल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. या प्रसंगातही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना धीर देत शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यांची ही धीरगंभीर वृत्ती आणि निर्भीडपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.
आबा मुळ्ये यांनी जिल्हाभर माध्यमिक शिक्षक संघ रुजविण्याचे आणि टिकविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. मुरुड-श्रीवर्धनपासून कर्जत-पनवेलपर्यंत त्यांचा सतत प्रवास चालू असे. आमदार जगन्नाथ भावे आणि आमदार मुकुंदराव कुलकर्णी हे त्यांचे मार्गदर्शक होते. मात्र संघकार्याबाबत कोणतीही शंका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी शिक्षक संघाचे काम बाजूला ठेवून पुन्हा पूर्णवेळ संघकार्याला स्वतःला वाहून घेतले. जिल्हा कार्यवाह म्हणून त्यांनी संघकार्याचा विस्तार मोठ्या समर्पणाने केला. शनिवार-रविवार हे त्यांचे ‘संघवार’ असायचे. संघाच्या अपेक्षेप्रमाणे शनिवार-रविवार हा त्यांचा 'संघवार' असायचा, मुरुडच्या बगारामपंत वर्तकांपासून महाडला मामा गांगल, दत्तोपंत साळुंके, कर्जतला शामराव चितळे, पनवेलला अप्पा मुजुमदार, अलिबागला शुक्ल सर, किहिमला अप्पा (परशुरामपंत) भावे यांसारखे त्या काळातले कार्यकर्ते हे त्यांचे केवळ संघमित्र नव्हते, तर जिवाभावाचे मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबातील/घरातील एक सदस्य असावेत असा त्यांचा घरोबा, सलोखा आणि जिव्हाळा होता. “जेथे अपेक्षित तेथे उपस्थित” हेच त्यांचे कार्यसूत्र होते.
संघकार्य करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. झिराळ आळी व्यायामशाळेच्या मैदानावर शाखा सुरू असताना काही समाजकंटकांकडून दगडफेक, मारहाण यांसारखे प्रकार घडले. एकदा तर त्यांच्या पाठीवर गंभीर प्रहार झाला; तरीही त्यांनी शाखा बंद केली नाही. उलट अशा प्रसंगांकडे त्यांनी सहनशीलतेने पाहिले. “हा मार संघासाठी सोसायलाच पाहिजे” ही त्यांची भूमिका त्यांच्या अढळ निष्ठेचे द्योतक आहे. शिक्षक म्हणूनही त्यांचे कार्य तितकेच प्रभावी होते. त्यांच्या निवृत्तीच्या वर्षी घेतलेल्या तपासणीत निरीक्षकांनी त्यांच्या अध्यापनाचे विशेष कौतुक केले. “इतक्या सहजपणे मराठी व्याकरण शिकविण्याची पद्धत अप्रतिम आहे” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सहकाऱ्यांनी त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली; मात्र नियमानुसार त्यांनी सन्मानाने निवृत्ती स्वीकारली.
निवृत्तीनंतरही त्यांनी साधेपणाने, समाधानाने जीवन व्यतीत केले. “विना दैन्येन जीवनम्” या तत्त्वानुसार १७ वर्षे त्यांनी आयुष्य जगले आणि ६ मे १९९८ रोजी “अनायासेन मरणम्” अनुभवत त्यांनी आपल्या जीवनयात्रेचा शांतपणे समारोप केला. कै. नरहरी भार्गव तथा आबा मुळ्ये यांचे जीवन हे कर्तव्यनिष्ठा, संघनिष्ठा, स्वाभिमान आणि सेवाभाव यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या कार्याचा सुगंध आजही समाजात दरवळत आहे.