महाराष्ट्राच्या मत्स्योत्पदनात १८ टक्क्यांनी वाढ; सुरमई, माकुळ, पापलेटच्या उत्पादनात राज्य देशात प्रथम

    03-May-2026
Total Views |
maharashtra fisheries production
मुंबई (अक्षय मांडवकर) - 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे (maharashtra fisheries production). २०२५ साली महाराष्ट्राने ३.६६ लाख टन मत्स्योत्पादन घेतले असून मत्स्योत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे (maharashtra fisheries production). मात्र, माकुळ, पापलेट आणि सुरमई माशांच्या उत्पादनामध्ये राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे (maharashtra fisheries production). राज्यात सर्वाधिक मत्स्योत्पादन हे बांगडा माशाचे झाले असून या माशाची गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक मासेमारी २०२५ मध्ये झाली आहे. (maharashtra fisheries production)
 
 
केंद्र सरकारची ‘सीएमएफआरआय‘ ही संस्था दरवर्षी भारताच्या वार्षिक मत्स्य उत्पादनाची नोंद करते. यामध्ये किनारी राज्यांमधील मासेमारीचा अभ्यास करुन आकडेवारी काढण्यात येते. यासाठी संस्थेचे शास्त्रज्ञ वर्षभर मासळी उतरविण्याच्या केंद्रावर जाऊन तेथील मत्स्यसाठ्याची नोंद घेत असतात. त्यानुसार २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये महाराष्ट्राचे मत्स्योत्पादनामध्ये १८ टक्यांनी वाढ झाली आहे. २०२४ साली राज्याचे मत्स्योत्पादन हे ३.११ लाख टन होते, जे २०२५ साली ३.६६ लाख टन झाले आहे. या वाढीमध्ये सर्वाधिक वाटा मुंबईतील ससून डाॅक (१९ टक्के) आणि भाऊच्या धक्क्याचा (१८ टक्के) आहे. मत्स्योत्पादनामध्ये यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीचा वाटा हा ९३.५ टक्के, मोटरचलित बोटींचा वाटा ६.२ टक्के आणि पारंपारिक बोटींचा वाटा ०.३ टक्के आहे. यांत्रिक नौकांमध्ये सर्वाधिक मासेमारी ही पर्ससीन जाळीद्वारे (४८ टक्के) करण्यात आली असून त्यानंतर ट्रॉलर(२९ टक्के) आणि डोल जाळीच्या (१० टक्के) माध्यमातून करण्यात आली आहे.
 
 
५५.१३ हजार टन उत्पादन घेऊन राज्यात सर्वाधिक मासेमारी ही बांगडा या माशाची झाली आहे. एकूण मासेमारीमध्ये बांगड्याच्या मासेमारीचा वाटा १५.१ टक्के आहे. गेल्या दहा वर्षातील राज्यातील बांगड्याच्या मासेमारीमधील सर्वाधिक मासेमारी ही २०२५ मध्ये नोंदवण्यात आली आहे. २०१५ साली राज्यात बांगड्याचे उत्पादन १४ हजार ५५० टन होते, जे २०२५ साली ५५ हजार १२५ टन झाले आहे. महाराष्ट्रातील बांगड्याच्या या वाढत्या मासेमारीला समुद्रातील काही घटकांबरोबरच मासेमारीच्या बदलत्या पद्धती देखील कारणीभूत असल्याचे 'सीएमएफआरआय' वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. अजय नाखवा यांनी सांगितले आहे. पर्ससीनसारख्या जाळ्याने प्रभावी पद्धतीने मासेमारी केल्यामुळे देखील बांगड्याच्या मत्स्योत्पादनात वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
- महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेट असून ६ हजार ५९२ टन उत्पादन घेऊन महाराष्ट्र पापलेटच्या मासेमारीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या दहा वर्षातील राज्यातील पापलेटच्या मासेमारीमधील सर्वाधिक मासेमारी ही २०२५ मध्ये नोंदवण्यात आली आहे. २०१५ साली राज्यात पापलेटचे उत्पादन ३ हजार १४८ टन होते, जे २०२५ साली ६ हजार ५९२ टन झाले आहे.
- १३ हजार ७६२ टन उत्पादन घेत मत्स्यप्रेमींच्या लाडक्या सुरमई माशाच्या मासेमारीत देखील महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. याशिवाय गेल्या दहा वर्षातील राज्यातील सुरमई मासेमारीमधील सर्वाधिक मासेमारी ही २०२५ मध्ये नोंदवण्यात आली असून २०१५ साली ती ५ हजार ७७० टन होती, जी २०२५ साली १३ हजार ७६२ टन झाली आहे.
- माकूल माशांच्या मासेमारीत देखील महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांक असून २०२५ मध्ये ३५ हजार ५१२ टन उत्पादन घेण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात बांगड्याचे उत्पादन सर्वाधिक झाले असले तरी, बांगड्यापेक्षा हा मासा उच्च दराने विकला जातो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या या माशाचे उत्पादन राज्याला फायदेशीर ठरले आहे.