इंग्लंडचे राजे चार्ल्स यांनी नुकतेच अमेरिकी संसदेत दिलेले ऐतिहासिक भाषण आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा अप्रतिम वस्तुपाठ ठरले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेताल नेत्याला न दुखावता, शालजोडीतून कानपिचक्या देत चार्ल्स यांनी अमेरिकी महासत्तेला लोकशाही आणि सभ्यतेचे कशा पद्धतीने स्मरण करून दिले, याचा सविस्तर वेध घेणारा हा लेख.
विन्स्टन चर्चिल यांनी एकदा अत्यंत मार्मिकपणे म्हटले होते की, "अमेरिका आणि इंग्लंड हे एकाच भाषेने विभागलेले दोन देश आहेत.” मात्र, जागतिक राजकारणात मूल्यांचा, सभ्यतेचा आणि लोकशाहीच्या अखंड परंपरेचा प्रश्न येतो, तेव्हा या दोन देशांना सांधणारा धागा किती मजबूत आणि ऐतिहासिक असू शकतो, याचे उत्तम आणि अभूतपूर्व उदाहरण नुकतेच अमेरिकेच्या ‘कॅपिटॉल हिल’वर पाहायला मिळाले. निमित्त होते, ते इंग्लंडचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या ऐतिहासिक भाषणाचे. १९९१ साली राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते; त्यानंतर तब्बल साडेतीन दशकांनी एका इंग्लंडच्या सम्राटाने अमेरिकन संसदेत उभे राहून जे राजकीय चातुर्य आणि राजनैतिक मुत्सद्दीपणा दाखवला, तो ऐतिहासिकच नाही, तर आजच्या जागतिक परिस्थितीवर आणि बदलत्या सत्ता-समीकरणांवर अचूक भाष्य करणारा ठरला.
सध्याच्या घडीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेधडक, काहीशा आक्रस्ताळ्या आणि लोकशाहीच्या संकेतांचे उल्लंघन करणार्या नेत्याला, त्याच्याच घरी जाऊन अत्यंत शालजोडीतून कानपिचक्या देण्याचे जे कौशल्य किंग चार्ल्स यांनी दाखवले, ते खरोखरच लाजवाब आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा एक उत्तम वस्तुपाठ ठरले आहे. ‘नेटफ्लिस’वरील ‘द क्राऊन’सारखी मालिका पाहिलेल्या किंवा इंग्लंडच्या राजघराण्याचा इतिहास अभ्यासलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे सहज लक्षात येईल की, तेथील राजेशाही ही निव्वळ मुकुट, राजदंड, बग्गी आणि बडेजाव मिरविणार्या सोहळ्यांपुरती मर्यादित नाही. ती जागतिक स्तरावर इंग्लंडची सर्वांत मोठी ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून अत्यंत संयमाने, शांतपणे आणि प्रभावीपणे काम करते. लोकशाही आणि राजेशाही या वरवर परस्परविरोधी वाटणार्या संकल्पना असल्या, तरी इंग्लंडमधील व्यवस्थेने या दोघांचा एक अत्यंत सुंदर मेळ घातला आहे. राणी एलिझाबेथ यांनी सात दशके हेच काम केले आणि आता किंग चार्ल्स तोच वारसा पुढे नेत आहेत.
‘द क्राऊन’चे तत्त्वज्ञान
राजेशाहीकडे स्वतःचे कोणतेही कार्यकारी अधिकार नसतात, हेच त्यांचे सर्वांत मोठे बलस्थान. कारण, त्यांच्या शब्दांना कोणत्याही राजकीय स्वार्थाचा, निवडणुकीच्या गणितांचा किंवा पक्षांतर्गत राजकारणाचा दर्प नसतो. चार्ल्स यांच्या या भाषणाने हे पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध केले आहे की, राजकीय नेतृत्व उथळ आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या आहारी गेलेले असते, तेव्हा असा घटनात्मक प्रमुख देशाची आणि जागतिक मूल्यांची ढाल बनून कसा उभा राहतो. ‘द क्राऊन’मध्ये आपण पाहतो की, राणी अनेकदा आक्रमक पंतप्रधानांना (उदा. मार्गारेट थॅचर) शांतपणे योग्य मार्ग दाखवते. आज जागतिक रंगमंचावर चार्ल्स यांनी ट्रम्प यांच्याबाबतीत तेच काम नेमकेपणाने तेच केलेले दिसले.
ऐतिहासिक नाळ
किंग चार्ल्स यांचे भाषण ऐकताना, वरकरणी ते दोन देशांमधील जुन्या मैत्रीचे गोडवे गाणारे वाटत असले, तरी त्याचे ‘अंडरकरंट्स’ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आणि रंजक आहे. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातील संबंधांना आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘स्पेशल रिलेशनशिप’ असे म्हटले जाते. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात सांडलेले रक्त आणि ‘फॅसिझम’ विरुद्ध दिलेला लढा हा या संबंधांचा पाया. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला लवकरच अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. याच संदर्भाचा धागा पकडत चार्ल्स यांनी अत्यंत खुबीने अमेरिकन क्रांतीचे स्मरण केले. "आपली ही भागीदारी वादातूनच जन्माला आली असली, तरी परस्परांतील संबंध कुठेही कमी झालेले नाही,” असे सांगत त्यांनी ‘प्रतिनिधित्वाशिवाय कर नाही,’ या ऐतिहासिक तत्त्वाचा संदर्भ दिला. एकेकाळी याच करप्रणालीवरून अमेरिकेने इंग्लंडविरोधात बंड पुकारले होते आणि स्वतःला स्वतंत्र घोषित केले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले. ही इतिहासाची उजळणी नव्हती, तर ती आजच्या काळातही अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा वस्तुपाठ होता. ज्या देशावर इंग्लंडने एकेकाळी राज्य केले, ज्या देशाने साहेबांना हाकलून लावले, त्याच देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात उभे राहून, अत्यंत नम्रपणे; पण तेवढ्याच ठामपणे चार्ल्स यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना लोकशाही मूल्यांची आठवण करून दिली. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या, महासत्तेच्या मिजासीत वावरणार्या अमेरिकेला तिच्या मुळांची आणि मूल्यांची आठवण करून देण्याचे हे काम केवळ इंग्लंडचा एखादा राजाच इतक्या सहजतेने करू शकतो.
पंतप्रधानांची पाठराखण
या भेटीची आणि भाषणाची राजकीय पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि तणावपूर्ण होती. ट्रम्प यांच्या या दुसर्या कार्यकाळात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. इंग्लंडमध्ये सध्या मजूर पक्षाचे सरकार असून, कीर स्टारमर पंतप्रधान आहेत. स्टारमर यांचे डावीकडे झुकलेले विचार आणि ट्रम्प यांचे अति-उजवे, ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण यांच्यात विस्तवही जात नाही. विशेषतः जागतिक व्यापार, आयात करांचे धोरण आणि इराणसह पश्चिम आशियातील युद्धस्थितीवरून दोघांत उघड संघर्ष सुरू आहे. ट्रम्प यांनी स्टारमर यांच्यावर बोचरी टीका करताना, "हे काही विन्स्टन चर्चिल नाहीत, ज्यांच्याशी आपण व्यवहार करत आहोत,” अशी हेटाळणी करणारी, अत्यंत अवमानास्पद टिप्पणी केली होती. एका मित्रराष्ट्राच्या पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरणे, हे राजनैतिक संकेतांचे उघड उल्लंघन होते. अशा स्फोटक वातावरणात चार्ल्स यांनी आपल्या पंतप्रधानांची पाठराखण अत्यंत कल्पकतेने केली.
काँग्रेसमधील भाषणात चार्ल्स यांनी थेट स्टारमर यांचे नाव घेऊन त्यांच्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मधील भाषणाचा दाखला दिला. "माझ्या पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात म्हटल्याप्रमाणे, आपली भागीदारी अपरिहार्य आहे आणि गेल्या ८० वर्षांत ज्या गोष्टींनी आपल्याला टिकवून ठेवले आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही,” असे चार्ल्स म्हणाले. एका घटनात्मक राजाने विदेशी भूमीवर आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या शब्दांना असा जाहीर दुजोरा देणे, हा ट्रम्प यांच्यासाठी एक अत्यंत कठोर संदेश होता. देशांतर्गत राजकारणात आमचे काहीही मतभेद असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड हा एकसंध आहे आणि तुम्ही आमच्या पंतप्रधानांचा अपमान करू शकत नाही, हे त्यांनी विखारी भाषा न वापरता एका सूचक वाक्यात ट्रम्प यांना सुनावले.
‘नाटो’, युक्रेन आणि मुक्त जगाचे नेतृत्व
डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘नाटो’ या पाश्चात्त्य लष्करी आघाडीबद्दलचे तुच्छतेचे मत आणि त्यांची युक्रेन युद्धाबाबतची व्यावसायिक भूमिका ही सर्वश्रुत आहे. ट्रम्प हे वारंवार युक्रेनची लष्करी मदत थांबवण्याची आणि ‘नाटो’ मित्रराष्ट्रांवर संरक्षणाच्या खर्चाचा अधिक बोजा टाकण्याची भाषा करत आले आहेत. ट्रम्प यांच्या मते, परराष्ट्र धोरण म्हणजे एक ‘बिझनेस डील’ आहे. या पार्श्वभूमीवर, चार्ल्स यांनी आपल्या भाषणात ‘नाटो’चे महत्त्व आणि युक्रेनला भक्कम पाठिंबा देण्याची गरज अत्यंत प्रभावीपणे मांडली. युक्रेनच्या शूर लोकांसाठी आणि खर्या अर्थाने न्याय्य व शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अढळ निश्चयाची नितांत गरज आहे, असे चार्ल्स अमेरिकन काँग्रेसमध्ये ठणकावून सांगतात, तेव्हा ते निव्वळ इंग्लंडचे नाही; तर संपूर्ण युरोपचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. ते अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांच्याच संकुचित धोरणांवर प्रहार करत असतात. लोकशाही, मुक्त समाज आणि जागतिक शांतता यासाठी अमेरिकेने केवळ स्वतःच्या कोशात न राहता आपल्या जागतिक जबाबदार्यांपासून पळ काढू नये, हाच यामागचा मुख्य आशय असतो. युरोपच्या सुरक्षेला अमेरिकेने गृहीत धरू नये किंवा पैशांच्या तराजूत तोलू नये, हा अत्यंत स्पष्ट इशारा एका राजाने अतिशय सभ्य शब्दांत दिला.
एक अनुक्त वैचारिक संघर्ष
चार्ल्स आणि ट्रम्प यांच्यातील सर्वांत मोठा वैचारिक संघर्ष हा हवामानबदलाच्या मुद्द्यावर आहे. चार्ल्स हे गेली ५० वर्षे पर्यावरणाचे खंदे पुरस्कर्ते राहिले आहेत. ‘शाश्वत विकास’ हा त्यांच्या आयुष्याचा ध्यास राहिला आहे. याउलट, ट्रम्प हे हवामानबदलाला थोतांड मानतात आणि जीवाश्म इंधनाचा अनिर्बंध वापर करण्यावर त्यांचा भर असतो. चार्ल्स यांनी आपल्या भाषणात अत्यंत संयमाने; पण ठामपणे भविष्यातील पिढ्यांप्रति असलेल्या आपल्या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली. निसर्गाचे संतुलन राखणे ही आता एका देशाची जबाबदारी नसून, ती जागतिक निकड आहे, हे सांगताना चार्ल्स यांनी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांच्या पर्यावरणविरोधी धोरणांवरच निशाणा साधला. हा दोन नेत्यांमधील संघर्ष नव्हता, तर निसर्गाकडे पाहण्याच्या दोन पूर्णतः भिन्न दृष्टिकोनांचा तो सामना होता, ज्यामध्ये चार्ल्स यांची प्रगल्भता अधिक उठून दिसली.
‘चेक्स अॅण्ड बॅलन्सेस’
चार्ल्स यांच्या संपूर्ण भाषणातील सर्वांत लक्षवेधी, ऐतिहासिक आणि सर्वाधिक टाळ्या मिळवणारा क्षण म्हणजे जेव्हा त्यांनी लोकशाहीतील ‘चेक्स अॅण्ड बॅलन्सेस’ या तत्त्वाचा हेतुतः उल्लेख केला. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकी लोकशाहीच्या संस्थात्मक चौकटीवर, न्याय व्यवस्थेवर आणि माध्यमांवर वारंवार आघात झाले आहेत. कार्यकारी अधिकारांचा अनिर्बंध गैरवापर आणि हुकूमशाही प्रवृत्तीची झलक ट्रम्प यांच्या वागणुकीत नेहमीच पाहायला मिळते. म्हणूनच, एका घटनात्मक राजाने (ज्याच्याकडे स्वतःचे असे कोणतेही थेट राजकीय अधिकार नाहीत!) अमेरिकी संसदेत उभे राहून संविधानातील नियंत्रण आणि संतुलनाच्या महत्त्वाची आठवण करून देणे, ही ट्रम्प यांच्यासाठी एक सणसणीत चपराक ठरली. स्वातंत्र्य हे संस्थांच्या बळकटीवर आणि अधिकारांच्या विभाजनावर अवलंबून असते, असे चार्ल्स सांगतात; तेव्हा ते हुकूमशाही प्रवृत्तीला थेट आव्हान देत असतात. विशेष म्हणजे, या विधानावर अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांनी ज्यामध्ये ‘डेमोक्रॅट्स’ आणि अनेक ‘रिपब्लिकन्स’चाही समावेश होता, उभे राहून चार्ल्स यांना दीर्घकाळ दाद दिली. ट्रम्प यांना कायद्याच्या राज्याची आणि लोकशाही संस्थांच्या सन्मानाची जाणीव करून देण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता अधिक प्रगल्भ मार्ग असू शकला असता?
‘स्टेट डिनर’ची मुत्सद्देगिरी
राजकीय चातुर्याचा आणि हजरजबाबीपणाचा कळस ‘व्हाईट हाऊस’मधील रात्रीच्या स्नेहभोजनाच्या वेळी पाहायला मिळाला. ट्रम्प यांनी काही काळापूर्वी युरोपीय देशांना उद्देशून एक दर्पोक्ती केली होती की, "अमेरिका नसती, तर युरोपातील देश आज जर्मन भाषा बोलत असते,” असे ते वाक्य होते. या विधानाचा अचूक संदर्भ लक्षात ठेवून चार्ल्स यांनी अत्यंत मिश्कीलपणे; पण तेवढ्याच ताकदीने पलटवार केला. आपल्या भाषणात ते हसत हसत म्हणाले, "मिस्टर प्रेसिडेंट, तुम्ही नुकतेच म्हणालात की, अमेरिका नसती तर युरोप जर्मन बोलत असता. पण, मी असे म्हणू शकेन का की, आम्ही (इंग्लंड) नसतो, तर तुम्ही आज फ्रेंच बोलत असता!” (कारण, अमेरिकेवर इंग्लंडने वर्चस्व मिळवले नसते, तर फ्रान्सने मिळवले असते). चार्ल्स यांच्या या एका विधानाने ट्रम्प यांच्या अहंकाराला थेट; पण अत्यंत सभ्य भाषेत उत्तर दिले गेले. याशिवाय, चार्ल्स यांनी १८१४ मध्ये इंग्लंडच्या सैन्याने ‘व्हाईट हाऊस’ला लावलेल्या आगीचाही अत्यंत विनोदी अंगाने संदर्भ दिला. ट्रम्प यांच्या ‘रिअल इस्टेट’ व्यवसायातील पार्श्वभूमीवर फिरकी घेत चार्ल्स म्हणाले, "आम्ही १८१४ मध्ये ‘व्हाईट हाऊस’चा रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट करण्याचा आमचा स्वतःचा असा एक प्रयत्न केला होता. ‘बोस्टन टी पार्टी’च्या कटू आठवणीपेक्षा आजचे हे जेवण नक्कीच चांगले आहे,” असा नर्मविनोद करत त्यांनी वातावरणातील तणाव अगदी सहजतेने कमी केला. समोरच्याचा थेट अपमान न करता, कोणताही राजनैतिक पेचप्रसंग न ओढवता आणि चेहर्यावरील स्मितहास्य न ढळू देता समोरच्याला त्याची अचूक जागा दाखवून देण्याची ही इंग्लंडच्या राजेशाहीची खास ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
ट्रम्प यांची हतबलता
या संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आजच्या अत्यंत ध्रुवीकरण झालेल्या आणि उथळ जगातही एका तटस्थ संस्थात्मक नेतृत्वाचे महत्त्व काय असू शकते, हे यातून अधोरेखित झाले. ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याला फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी किंवा खुद्द इंग्लंडच्या स्टारमर यांनी अशा सुरात आणि स्वरात सुनावले असते, तर ट्रम्प यांनी लगेचच सोशल मीडियावर जाऊन त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील शाब्दिक हल्ला चढवला असता, त्यांना ‘लूझर’ ठरवले असते. आयातशुल्कवाढीचीही धमकी दिली असती. पण, चार्ल्स यांच्या बाबतीत ट्रम्प तसे करू शकत नाहीत. त्यांच्या हातचे हत्यारच चार्ल्स यांनी आपल्या सभ्यतेने हिरावून घेतले होते. उलटपक्षी, ट्रम्प स्वतः या भेटीनंतर अत्यंत भारावल्यासारखे आणि गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाले की, "चार्ल्स एक अद्भुत व्यक्ती आहेत आणि मला त्यांच्या काँग्रेसमधील भाषणाचा हेवा वाटतो. कारण, त्यांनी ‘डेमोक्रॅट्स’नाही उभे राहून टाळ्या वाजवायला भाग पाडले.”
ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेवरून हेच सिद्ध होते की, त्यांना चार्ल्स यांच्या भाषणातील गुढार्थ आणि उपहास समजलाच नाही किंवा त्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षित केले. चार्ल्स हे राजकीय नेते नाहीत, ते दैनंदिन निवडणुकीच्या आणि स्वार्थाच्या राजकारणाच्या पलीकडे आहेत. त्यांच्या शब्दांना एक ऐतिहासिक पावित्र्य, निष्पक्षपातीपणा आणि वजन आहे, जे ट्रम्प यांच्यासारख्या केवळ भांडवलशाहीच्या आहारी गेलेल्या नेत्यालाही निमूटपणे मान्य करावे लागते, हेही नसे थोडके! किंग चार्ल्स यांचे हे भाषण म्हणजे एक औपचारिक राजनैतिक सोहळा नव्हता. ती एका जुन्या, प्रगल्भ साम्राज्याने जगातील सर्वांत शक्तिशाली; पण सध्या दिशाहीन आणि आत्मकेंद्रित वाटणार्या महासत्तेला दिलेली एक प्रेमळ समज होती. राजकारण हे धमक्या, ‘टॅरिफ वॉर’ आणि आक्रस्ताळेपणा करून चालत नाही, तर त्यासाठी मुत्सद्दीपणा, संयम आणि इतिहासाचे भान लागते, हाच धडा चार्ल्स यांनी ट्रम्प यांना दिला. खर्या अर्थाने, एका सम्राटाने लोकशाहीची पाठराखण करत आपले राजाचे कर्तव्य आपल्या राजेपदाला कोणताही कमीपणा न येता बजावले आहे, हेच यातून समोर येते. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासासाठी हा एक अत्यंत मोलाचा दस्तऐवज ठरला आहे, हे निश्चित!
- संजीव ओक