ओटावा : (Khalistani Threat in Canada) कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणेच्या अहवालामध्ये कॅनडाला खलिस्तानी दहशतवादाचा धोका असल्याचे म्हटले असून, कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळ जोरावर असून, खलिस्तान समर्थकांकडून कॅनडामधील हिंदूंना लक्ष्य केले जाते. भारताने कित्येकवेळा याबाबत कॅनडाशी चर्चा करुनही भूतकाळात कॅनडाने या धोक्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. ट्रुडो सरकारच्या काळात तर खलिस्तानी दहशतवाद्यांसाठी भारताबरोबरचे संबंधही कॅनडाने पणाला लावले. मात्र, कार्नी सरकारने हे संबंध सुधारण्यासाठी कॅनडाच्या भूमीचा वापर भारतविरोधी कृत्यांसाठी करु दिला नसल्याचे जाहीर केले होते.
याच पार्श्वभूमीवर कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी एक अहवाल कॅनडाच्या संसदेकडे सुपुर्द केला असून, यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या धोक्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. 40 वर्षांपूर्वी झालेल्या ‘एअर इंडिया’ विमानातील बॉम्बस्फोटाला कॅनडाच्या इतिहासातील सर्वाधिक प्राणघातक दहशतवादी हल्ला म्हणून या अहवालामध्ये म्हणताना, त्याचे संबंध कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गटांचा म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये 329 जणांचा मृत्यू झाल्याचेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच, या अहवालामध्ये कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गटांचा, दहशतवादाशी असलेला संबंध कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हे दहशतवादी त्यांचा दहशतवादी अजेंडा पुढे रेटण्यसाठी काही कॅनडाच्या नागरिकांचाही वापर करत असल्याचे त्या अहवालामध्ये म्हटले आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांना कारवाईसाठी कॅनडातील काही समूह सहकार्य करत असल्याचेही, एका अहवालातून उघडकीस आले होते. या समूहांचे कॅनडामध्ये मोठे जाळे होते. मात्र, आता ते लहान लहान गटात विखुरले गेल्याचेही या अहवालात म्हटले होते. या समूहांमध्ये ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ आणि ‘इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन’ यांचा समावेश असून, सध्या या दोन्ही संघटनांना कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.