दि. १८ एप्रिल १९६६ रोजी समाजसुधारक आणि ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’चे संस्थापक हमीद दलवाई यांनी अवघ्या सात मुसलमान महिलांना घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला होता. तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथांमुळे मुस्लीम महिलांवर होणारा अन्याय थांबवावा, हा त्या महिलाधिकार मोर्चाचा उद्देश. यंदा या मोर्चाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’तर्फे राष्ट्रीय परिषदेचे पुणे येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने परिषदेतील चर्चेचा सूर उलगडणारा हा लेख...
एप्रिलच्या १८ तारखेची पुण्यातली एक सकाळ. थोडा उशीर झाल्याने जरा घाईनेच थेट त्या एस. एम. जोशी थिएटरमध्ये शिरलो. स्थिरस्थावर झाल्यानंतर हॉलमध्ये एकवार नजर फिरवली. एकही जाळीदार टोपी नाही. एकही बुरखा वा हिजाबही नाही! दोन-चार जणी तर केसात गजरे माळून आलेल्या. बहुतेक महिला साड्यांमध्ये किंवा जरा तरुण महिला पंजाबी ड्रेसमध्ये दिसत होत्या. बारकाईने परत कुणी नजर टाकलीच तर- कोरं कपाळ, गळ्यातली काळी पोत वा नाकातली छोटीशी चमकी एवढ्यावरूनच हलकासा अंदाज येतो की, आपण मुस्लीम महिलांच्या कार्यक्रमात आलो आहोत. कार्यक्रमाचा बॅनर जर पाहिला नाही, तर हा प्रामुख्याने मुस्लीम समुदायाचा कार्यक्रम आहे, असं कुणालाही वाटणार नाही. धार्मिक प्रतिनिधित्व दाखवणारी कोणतीच चिन्हं कोणीच अंगावर बाळगलेली नसणं आणि हे पृथकतेपेक्षा तुमच्या-आमच्यासारखंच असणं, हे तिथे जास्त महत्त्वाचं व लक्षवेधी ठरत होतं.
निमित्त होतं, ते मुस्लीम महिलांच्या दि. १८ एप्रिल १९६६ साली काढलेल्या पहिल्या ‘महिलाधिकार मोर्चा’च्या ‘हीरक महोत्सवी’ आठवणींच्या जागराचे आणि तिथून सुरू झालेल्या एका प्रवासाचे. विजय तेंडुलकरांनी ज्याची ‘इटुकला मोर्चा’ म्हणून वृत्तपत्रातून एक सकारात्मक दखल घेतली होती, त्या मोर्चाला आता ६० वर्षे झाली होती आणि पुलाखालून तसं बरंच पाणीही वाहून गेलं होतं. तरीही, आपला पाया अजूनही मजबूत आहे ना, हे आजमावण्यासाठी आणि सामाजिक अभिसरणाकरताच या कार्यक्रमाचे आयोजन ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ने शमसुद्दीन तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली केले होते. हमीद दलवाईंच्या नेतृत्वात मुंबई विधानसभेवर काढलेल्या त्या पहिल्यावहिल्या मोर्चाचा तो क्षण केवळ रस्त्यावर उतरण्याचा नव्हता, तर शतकानुशतके अंगवळणी पडलेल्या भीती, संकोच आणि मर्यादांना पडलेले प्रश्न विचारण्याचा होता. १९६६ साली जेव्हा या सात स्त्रिया प्रथमच एकत्र आल्या, तेव्हा त्यांच्याकडे ना मोठमोठी व्यासपीठं होती, ना माध्यमांचा आधार होता; पण होती ती फक्त अन्यायाची जाणीव आणि बदलाची तीव्र इच्छा!
त्याकाळात मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर अनेक स्तरांवर बंधने होती, अजूनही बर्याच अंशी आहेत. शिक्षणाची मर्यादा, आर्थिक स्वावलंबनाचा अभाव आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर घातलेले अनेक अदृश्य बंध. अशा परिस्थितीत रस्त्यावर उतरून आपला आवाज मांडणं, ही प्रथम एक ‘मानसिक क्रांती’ होती आणि नंतर होती, एका ‘सामाजिक क्रांती’ची सुरुवात! आज त्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना जाणवतं की, बदल हा नेहमी मोठ्या घोषणांनी होत नाही; तो शांतपणे, सातत्याने आणि अनेकदा कुणालाही न दिसता घडत असतो. त्या पहिल्या मोर्चाने कदाचित लगेच सगळं बदललं नाही; पण त्याने एक दार उघडलं विचार करण्याचं, प्रश्न विचारण्याचं आणि स्वतःसाठी उभं राहण्याचं!
हॉलमधील तो समुदाय पाहताना हेच जाणवत होतं की, हा प्रवास केवळ बाह्यस्वरूपाचा नाही. जाळीदार टोपी, बुरखा किंवा हिजाब नसणं हे केवळ प्रतीक आहे; खरा बदल आहे तो आत्मविश्वासात, संवादात आणि स्वतःच्या ओळखीला नव्याने परिभाषित करण्याच्या क्षमतेत. ६० वर्षांपूर्वीच्या हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या त्या ‘इटुकल्या मोर्चा’तही सर्व भगिनी साड्यांत आणि बुरखा वा हिजाबाविना होत्या. महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या प्रक्रियेत ‘आपण’ आणि ‘ते’ हा भेद कुठेतरी विरघळताना दिसतो. त्या स्त्रिया वेगळ्या नाहीत, तर आपल्या समाजाचाच एक भाग आहेत-आपल्यासारख्याच स्वप्नं बाळगणार्या, संघर्ष करणार्या आणि बदल घडवण्याची इच्छा असणार्या!
कदाचित, म्हणूनच त्या कार्यक्रमात धार्मिक ओळख असणार्या पोशाखाची वा इतर प्रतीकांची अनुपस्थिती रिकामी वाटली नाही. उलट, तिने एक नवीन उपस्थिती निर्माण केली; मानवी समानतेची, सहअस्तित्वाची आणि सामायिक भविष्यातील आशेची. बहुतेकांच्या मनातल्या ‘स्टिरिओटाईप’ प्रतिमांना छेद देणारं दृश्य होतं ते. १९६६च्या त्या मोर्चाने सुरू झालेला प्रवास अजून संपलेला नाही. तो आजही सुरू आहे; प्रत्येक शिक्षित होणार्या मुलीत, स्वतःचा निर्णय घेणार्या प्रत्येक स्त्रीत आणि म्हणूनच, कदाचित हा प्रवासच खर्या अर्थाने समाजाला पुढे नेत असतो.
अशीच अजून एक लक्षवेधी गोष्ट एका बाबतीतून प्रकर्षाने जाणवली की, परिषदेचं बहुतेक सर्व कामकाज म्हणजे भाषणं वा चर्चा मराठीतूनच चालली. फक्त परराज्यातून आलेल्या वक्त्यांच्या सोयीसाठी अधूनमधून हिंदीचा आधार घेतला जात होता आणि त्यांना हिंदी अथवा मधूनच त्यांच्या राज्याच्या भाषेत बोलायची मुभाही होती. पण, विचारांची मुख्य वाहिनी मराठीच राहिली. इथेही ते आणि आपण हा भेद असा नव्हताच. सर्वाधिक मोलाची उपस्थिती होती, ती ९६ वर्षांचे अब्दुल कादर मुकादम यांची. ते मूळचे रेवदंड्याचे कोकणी मुस्लीम. पण, कित्येक वर्षांपासून कोल्हापूरकर झालेले! हमीद दलवाईंचे सहयोगी म्हणून त्यांनी केवळ इतिहास पाहिलेला नाही, तर तो जगलेलाही आहे. दीर्घ काळातले सूक्ष्म बदल टिपणारी त्यांची नजर आणि ते उत्तम, नेमक्या मराठीत मांडण्याची हातोटी, ही या संमेलनाची एक मोठी ताकद होती.
भावलेले एक आशादायक चित्र म्हणजे सुसंस्कृत, सुशिक्षित मुस्लीम तरुणांचा लक्षवेधी सहभाग. कोल्हापूरहून आलेला इर्शाद वडगांवकर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रशियन साहित्यात ‘पीएचडी’ करणारा. त्याच्या बोलण्यातून आणि दृष्टिकोनातून एक डोळस, जागतिक भान असलेला विचार स्पष्ट जाणवत होता. या परिषदेत आपल्या सामाजिक दोषांचे खापर हे इतर जाती अथवा धार्मिक समुदायातल्या लोकांवर फोडणारा आक्रमकपणा अजिबातच नव्हता; तर आमच्या या स्थितीला आमचेच तथाकथित नेते, विशेषतः धार्मिक नेते जबाबदार आहेत, हे विशेषत्वाने मांडले गेले. या परिषदेत दोषारोपांऐवजी समाजाचं आत्मपरीक्षण जास्त होत होतं. आता सुशिक्षित मुस्लीम स्त्रियाही धार्मिक नेत्यांचा विरोध पत्करून काही प्रमाणात धार्मिक कृत्यं करताना दिसताहेत. काझी होऊन ‘निकाहनामा’ पढणार्या दोन स्त्रियांनीही आपले अनुभव मांडले. विशेष म्हणजे, आंतरधर्मीय विवाह करून मुस्लीम घरांमध्ये गेलेल्या या दोनजणींनी त्यांना समाजातले हे प्रश्न व दोष जास्तच प्रकर्षाने कसे जाणवले आणि आपल्या सामाजिक कामातून वा लेखनातून त्यांना वाचा फोडण्याचे त्यांचे प्रयत्न अगदी मोकळेपणाने मांडले.
आस्तिक असूनही परिवर्तनवादी होता येते आणि नास्तिकांच्या बरोबरीने काम करता येते, हा सहअस्तित्वाचा व परस्पर आदरयुक्त स्वीकाराचा मुद्दाही महिला व पुरुष यांनी मांडला. परंपरा आणि आधुनिकता यांचा तोल साधण्याचा प्रयत्न तरुण पिढीत अधिक सजगपणे होताना जाणवला.विशेष उल्लेख करावासा वाटतो, तो अद्वैत साने या तरुणाचा. तीन वर्षे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्या सहवासात राहून त्याने तयार केलेला दोन तासांचा माहितीपट हा केवळ एक ‘डॉक्युमेंटेशन’ नाही; तर एका विचारप्रवाहाचा, एका सामाजिक प्रवासाचा जिवंत दस्तऐवज आहे. अशाप्रकारचे प्रयत्न पुढच्या पिढीसाठी संदर्भबिंदू ठरतात, ज्यातून इतिहास समजतो, वर्तमानाचं भान येतं आणि भविष्याचा मार्गही थोडाफार स्पष्ट होतो.हे सगळं अनुभवत असताना एक जरा गमतीदार विचार मनात तरळून गेलाच- आमच्या सदाशिव पेठेला अनेक लोक नावं ठेवतात. यात आता विनोदाचा भाग जास्त आणि तथ्याचा भाग कमी! कारण, जागतिक उदारीकरणानंतर सदाशिव पेठ परिसरही अधिकाधिक ‘प्रोग्रेसिव्ह’ होत गेला. याच्याच जुन्या-नव्या भागात मराठी साहित्य परिषद, पत्रकार भवन, ‘एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन’ व ‘ना. ग. गोरे अॅकेडमी’, नाट्यकर्मींचे विविध मंच अशी व्यासपीठं उभी राहिली; जिथे विचारांची देवाणघेवाण, संवाद आणि बदल यांना जागा मिळू लागली. हा प्रवासच खर्या अर्थाने समाजाला पुढं नेत असतो.
या सगळ्या चित्रात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, बदल घडवून आणायला अनेक पिढ्यांचं काम खर्ची पडतं. ते केवळ एका पिढीपुरतं राहून चालत नाही. अब्दुल कादर मुकादम यांच्यासारखी ज्येष्ठ पिढी, हमीद दलवाईंच्या विचारांचा वारसा जपणारी मधली पिढी आणि इर्शाद वा अद्वैतसारखी शोधक तरुण पिढी या सगळ्यांच्या सहभागातूनच हा प्रवास साकारतो आहे आणि म्हणूनच, त्या दिवशीचं ते संमेलन केवळ भूतकाळाच्या आठवणींचा स्मरणरंजनाचा सोहळा नव्हतं; तर ते होतं, एका सतत चालू असलेल्या संवादाचं, परिवर्तनाच्या प्रक्रियेचं आणि सामूहिक आशेचं जिवंत चित्र!
- संजय चांदेकर
(लेखक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेतून सेवानिवृत्त आणि भारतविद्या व समाजशास्त्राचे अभ्यासक तथा अनुबोधपट निर्माता आहेत.)