‘स्वदेशी’ चळवळ ही भारतीयांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात एक प्रमुख अस्त्र होते. पण, स्वातंत्र्यानंतर ‘स्वदेशी’ची ही चळवळ काहीशी मागे पडली. परंतु, 2014च्या सत्तापरिवर्तनानंतर ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या कित्येक अभियानांतून ‘स्वदेशी’लाही पुनश्च बळ मिळाले. आताही आखाती युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी भारतीयांना ‘स्वदेशी’ वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघानेही ‘स्वदेशी’चा कायमच पुरस्कार केला आणि जनमानसालाही ‘स्व’आधारित अर्थव्यवस्थेचे महत्त्व पटवून दिले. त्याचाच या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात, ‘पंचपरिवर्तना’च्या मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ अनेक दशकांपासून यावर काम करीत आहेत. असे हे पाच मुद्दे म्हणजे- ‘स्व-बोध’, ‘सामाजिक समरसता’, ‘कुटुंब प्रबोधन’, ‘पर्यावरण’ आणि ‘नागरी कर्तव्य.’
पर्यावरण शाश्वत ठेवून आणि लोकांना निरोगी व शांत ठेवून, 2047 पर्यंत राष्ट्राच्या सर्व पैलूंमध्ये भारताला पुन्हा महान बनवण्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ‘स्वदेशी’ हा ‘स्व-बोध’चाच एक पैलू, ज्याला आपण आता ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणून ओळखतो. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेली शिकवण लक्षात घेता, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संघ आज वाटचाल करीत आहे.
‘स्व-बोधा’बद्दल संघ आणि सावरकरांची विचारसरणी अतिशय स्पष्ट आहे. ‘आपली विचारपेठ आणि बाजारपेठ भारतीय असली पाहिजे; तरच आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळू शकेल,’ हा त्यामागील मोलाचा विचार. तसे केले तरच जीवनाच्या व समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये राष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक विकास साधून ‘विश्वगुरू’ ही उपाधी पुन्हा प्राप्त करता येईल, ही त्यामागील विचारधारणा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘स्वदेशी जागरण मंच’ 1991 मध्ये स्थापनेपासून समाजात या विषयासंदर्भात जागृतीसाठी प्रयत्नशील आहे. तथापि, संघ स्वयंसेवक त्यापूर्वीपासूनच हे कार्य करीत आले आहेत आणि संघाने वीर सावरकरांच्या ‘स्वदेशी’शी निगडित प्रयत्नांना आणि विचारप्रक्रियेलाच पुढे नेले आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ का आवश्यक आहे?
‘आत्मनिर्भरता’ ही राष्ट्राला सशक्त करणारी गुरुकिल्ली. ‘स्वदेशी’वर लक्ष केंद्रित केल्याने उद्योगधंदे वाढतात, रोजगाराच्या संधी निर्माण होतात, जागतिक बाजारपेठांचा विस्तार होतो, तंत्रज्ञान अद्ययावत होते आणि कौशल्ये व ज्ञान निर्माण होते. या सगळ्याचा एकूणच राष्ट्राला फायदा होतो. मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीम सुरू केली आणि त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आपण राष्ट्रीय सामर्थ्याच्या रूपात अनुभवत आहोत. सेमीकंडक्टर, संरक्षण, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश तंत्रज्ञान, कृषी उत्पादने, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, डिजिटल विश्व आणि पर्यावरण व्यवस्थापन यांसह प्रत्येक क्षेत्राला सशक्त करण्यासाठी सरकार, उद्योगपती आणि समाज एकत्र काम करत आहे. पण, अजून जलद गतीने ‘स्वदेशी’ला अनुसरून काम केले पाहिजे. ही आत्मनिर्भरता पर्यावरणाला हानी न पोहोचवता किंवा नैसर्गिक संसाधनांचे शोषण न करता साध्य केली पाहिजे.
‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने होणारा देशाचा प्रवास आणि त्याअनुषंगाने आखलेली धोरणे अर्थव्यवस्थेला होणारे फायदे दर्शवत आहेत. अनिश्चित जागतिक परिस्थिती आणि युद्धसंघर्षाचे धक्के सहन करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे. ‘मेक इन इंडिया’ चळवळीचा उद्देश भारतीय उत्पादन उद्योगाच्या वाढीस प्रोत्साहन देणे, तसेच जागतिक कंपन्यांना भारतात उत्पादन केंद्रे स्थापन करण्यास प्रवृत्त करणे, हा आहे. एखादी परदेशी कंपनी भारतात आपल्या वस्तूंचे उत्पादन करून, त्यांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करीत असली, तरीही आपण या संपूर्ण प्रक्रियेला ‘मेक इन इंडिया’ असे म्हणू शकतो. जरी प्रत्येक वस्तूचे उत्पादन करणे शक्य नसले आणि आपल्याला काही कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत असले, तरी तांत्रिक विकासातून जे काही उत्पादन करता येईल, ते ‘स्वदेशी’ पद्धतीनेच केले पाहिजे आणि एक ग्राहक म्हणून प्रत्येक भारतीयाने भारतात तयार झालेली उत्पादनेच खरेदी केली पाहिजेत. चीन आणि पाकिस्तानलादेखील आता भारताने अलीकडे दाखवलेल्या ‘स्व’ आधारित स्वातंत्र्याची आणि सामर्थ्याची भीती वाटू लागली आहे. आज जरी जगाने भारताचे आध्यात्मिक सामर्थ्य मान्य केले असले, तरी भारताचे सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीकरणाच्या माध्यमातून कसे प्रकट होते, याबद्दल पाश्चात्य जग चिंतित आहे. पाश्चात्य जग अशा देशांच्या मोहात पडले आहे, जे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर अवलंबून राहतात; आपल्या संस्कृतीचा बळी देतात आणि नैसर्गिक संसाधने कमी किमतीत विकतात. भारताच्या उदयामुळे जागतिक व्यवस्थेत कसा बदल होईल, याची पाश्चात्य जगालाही पुरती जाणीव आहे.
भारत जितका वेगाने विकास करेल, तितकी जगात दहशतवाद आणि अन्य देशांच्या नैसर्गिक संसाधनांच्या शोषणापासून मुक्त अशी शांतता आणि सहकार्य नांदेल. भारताने कोणत्याही प्रकारचा अवाजवी फायदा न घेता, निस्वार्थ मदतीचे आपले धोरण यापूर्वी विविध कृतींतून प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. ‘कोरोना’च्या आव्हानात्मक काळात अनेक देशांना ‘कोरोना’ प्रतिबंधक लस भारताने पुरवली. तसेच संघर्षग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या अन्य देशांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारताने मदतीचा हात दिला. पाकिस्तानला पाठिंबा व सहानुभूती दर्शविणार्या तुर्कीयेसारख्या देशालाही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी साहाय्य करून भारताने हे धोरण सिद्ध केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स्वदेशी’कडे असलेला जन्मजात कल
सावरकरांनी 1898 मध्ये वयाच्या अवघ्या 15 ते 16 वर्षांच्या दरम्यान, ‘स्वदेशीचा फटका’ सादर केला. ‘फटका’ हा एक काव्यप्रकार. पुण्यातील ‘जगद्हितेच्छु’ पत्रामध्येही या ‘फटक्या’ला लोकप्रियता मिळाली. यावरून असे दिसून येते की, सावरकरांच्या मनात लहानपणीच ‘स्वदेशी’ची तळमळ होती आणि पुण्यात आल्यावर त्यांच्या मनात ‘स्वदेशी’विषयी जी दृष्टी निर्माण झाली, त्याचे कृतीत रूपांतर झाले. दि. 7 ऑक्टोबर 1905 रोजी परदेशी मालावर बहिष्कार चळवळीला चालना देण्यासाठी सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली. या होळीचा धूर थेट लंडनपर्यंत पोहोचला. रत्नागिरीत असताना सावरकरांनी रत्नागिरी ‘हिंदू सभे’साठी ‘दीपावलीचे लक्ष्मीपूजन’ (1925) ही कविता लिहिली. त्यात ‘स्वदेशी’ची प्रशंसा केली होती आणि विदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.
देशी तेले, देशी साबू, देशी वस्त्राने
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने
स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरि मंगल वेळ
गजांतलक्ष्मी हिंदूहिंदूंच्या दारी डोलेल!
कवितेची आवड असूनही, सावरकर एक वास्तववादी आणि व्यवहारवादी व्यक्ती होते. ते केवळ स्वदेशीचे भावनिक समर्थक नव्हते. परिणामी, त्यांनी प्रत्यक्ष आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या रचना लिहिल्या. सावरकरांनी यंत्रयुगाचे स्वागत केले. त्यांनी ’यंत्र शाप की वरदान?’ आणि ‘यंत्रामुळे बेरोजगारी वाढते का?’ यांसारखे लेख लिहिले. यंत्रांचे फायदे आणि रोजगाराच्या संधी यांचा सखोल अभ्यास करून ते यंत्रांचे कट्टर समर्थक बनले. रत्नागिरीत सावरकरांनी स्वदेशी दुकानेही उघडली. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकांना स्वदेशी उत्पादने वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, सावरकर स्वतः हातगाडीवरून त्या स्वदेशी वस्तू विकत असत. सावरकर एक सर्जनशील विचारवंत असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या देशभक्तीतून प्रेरणा घेतली.
रा. स्व. संघ आणि स्वदेशी जागृती
नोव्हेंबर 1991 मध्ये असंघटित आणि लघु उद्योगांवर लक्ष केंद्रित करून, स्वदेशी उत्पादने आणि ब्रॅण्ड्सना प्रोत्साहन देण्यासाठी पहिली मोहीम सुरू करण्यात आली. पहिली देशव्यापी मोहीम दि. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 1994 दरम्यान सुरू करण्यात आली. यामध्ये जाहीर सभा, परिषदा, स्वदेशी उत्पादनांची यादी असलेली माहितीपत्रके, रस्त्यावरील सभा आणि भिंतीवरील लिखाणाचा समावेश होता. ‘स्वदेशी जागरण मंच’ स्वदेशी खरेदीतून देशभक्तीचा संदेश देत, सक्रिय स्वयंसेवक आणि संघप्रेरित जनसंघटनांच्या सदस्यांना एका छताखाली आणतो.
अलीकडेच ‘स्वदेशी जागरण मंच’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर संलग्न संघटनांनी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना, विशेषतः महिला व तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी मदत करण्याकरिता एकूण 448 केंद्रे स्थापन केली आहेत. ही केंद्रे तरुणांना स्वयंरोजगार, उद्योजकता, नोकरी, स्टार्टअप्स आणि इतर उपक्रमांबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक केंद्रबिंदू म्हणून काम करतात. त्यानंतर दि. 30 जुलै ते 10 ऑक्टोबर 2023 या कालावधीत, ‘एसबीए (स्वावलंबी भारत अभियान)’ने 4 हजार, 413 स्वतंत्र कार्यक्रमांव्यतिरिक्त 511 जिल्ह्यांमध्ये ‘देशव्यापी उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रम’ आयोजित केला. यामध्ये तब्बल 8 लाख, 20 हजार, 850 तरुणांनी सहभाग घेतला. उद्योजकतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने तब्बल 2 हजार, 701 हायस्कूल आणि महाविद्यालये, 1 हजार, 555 संस्था आणि महाविद्यालये आणि 155 विद्यापीठांमध्ये ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ देखील आयोजित करण्यात आले होते.
संघ स्वयंसेवकांचे ध्येय भारताला एक यशस्वी आणि मजबूत राष्ट्र बनवणे आहे, जे सर्वांसाठी सार्वत्रिक कल्याण आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वदेशी तत्त्वे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ‘एकात्म मानवदर्शन’ ही संकल्पना, शाश्वत हिंदू दृष्टिकोनावर आधारित असून, व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, जग, निसर्ग आणि ब्रह्मांड यांच्या समग्र दृष्टिकोनावर भर देते. हा समग्र दृष्टिकोन व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि नैसर्गिक जगाच्या आकांक्षांनाच एकात्म करतो.
- डॉ. पंकज जयस्वाल
7875212161