सावरकरांची संघटनशास्त्रीय जडणघडण
बाल विनायकाला वाचनाचे वेड लागले. त्याची प्रेरणा त्याचे बहुश्रुत वडील दामोदरपंत हे होते. बालवयापासूनच प्रगल्भ असलेल्या विनायकाच्या मनात वृत्तपत्रांपासून पुस्तकांपर्यंत सगळे काही वाचण्याची आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच तो बुद्धिवादी असल्यामुळे परंपरांचे अंधानुकरण न करता, त्याविषयी प्रश्न, शंका तो विचारत असे. त्यामुळेच जातिव्यवस्था हा हिंदू समाजाला लागलेला शाप आहे, असे त्याला लहानपणापासूनच वाटायचे. तो त्याच्या परीने ही बंधने तोडण्याचा प्रयत्न करत असे. त्याचे बालपणीचे सवंगडी सर्व जाती-जमातीतील होते. आपल्या वाचनाचे लाभ सर्वांना मिळावे, सर्वांचे ज्ञान वाढावे, यासाठी तो अनेक पुस्तके व वर्तमानपत्रे या मित्रांना वाचून दाखवत असे, त्यावर सखोल चर्चाही करत असे. एकमेकांत स्पर्धा करण्यापेक्षा एकोप्यातून प्रगती करणेच योग्य, ही भावना विनायकाच्या मनात होती. युवा संघटनाबांधणीचे बीज त्याच्या मनात असे अगदी बालपणापासूनच पेरले गेले होते. संघटनाबांधणीसाठी लागणारे सर्व नेतृत्वगुण बाल विनायकात विकसित झाले होते.
अत्यंत संस्कारक्षम वयात विनायक जी संघटनसूत्रे शिकला, त्यांचा त्यांनी कायम पाठपुरावा केला. युवा संघटन, जनसंघटन, सामाजिक संघटन व राजकीय संघटन बांधून सावरकरांनी देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले.
नाशिकला आपल्या कार्यकाळात सावरकरांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ (1899) ही गुप्त संघटना स्थापन केली. पुढे प्रकटपणे सार्वजनिक चळवळी करण्यासाठी युवकांची ‘मित्रमेळा’ (1900) ही संघटना त्यांनी स्थापन केली. ही संघटना ज्ञानार्जन व विधायक कार्यासाठी समर्पित होती. शेवटच्या टप्प्यात क्रांतिकारकांची ‘अभिनव भारत’ ही संघटना सावरकरांनी स्थापन केली. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना ते महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहात. तेथे त्यांनी युवकांची संघटना उभी केली. लो. टिळकांच्या प्रेरणेतून व त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण भारताचे जनजीवन उजळून टाकणारी, प्रकाशमान करणारी परदेशी कापडांची पहिली होळी पेटवून स्वदेशीचा नारा बुलंद केला. लंडनच्या मुक्कामात क्रांतिकारकांचे संघटन बांधले. पुढे अंदमानातील ‘सेल्युलर जेल’च्या काळकोठडीत कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कैद्यांचे संघटन उभे केले. रत्नागिरीतील स्थानबद्धतेत अस्पृश्यतेविरोधात समाज संघटन उभे केले; तर राजकारणात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी राजकीय संघटनाचा पाया रचला. असा सावरकरांच्या युवा व जनसंघटन बांधणीचा लखलखीत इतिहास आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 सालच्या विजयादशमीला ‘व्यक्तिनिर्माणा’साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना विकसित केली, तिचे स्वरूप व परिणाम समजावून घेऊ ः
कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहावयाचे असेल, तर तिचा सैद्धांतिक पाया भक्कम असला पाहिजे. त्याचप्रमाणे ते सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी सतत उलगडत जाणारी नित्यसिद्ध कार्यपद्धती विकसित झालेली असली पाहिजे. आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या अनेक प्रबोधनकार व समाजसुधारक यांची सैद्धांतिक भूमिका पक्की असते व ती समाजाला मार्गदर्शकही असते. पण, ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी, कृतीत उतरविण्यासाठी लागणारी कार्यपद्धती त्यांनी विकसित केलेली नसते. त्यांच्या विचारांचे स्वरूप ग्रांथिक असते. समाजप्रबोधन यादृष्टीने त्याचे महत्त्व वादातीत असले, तरी त्यांच्या मर्यादाही स्पष्ट असतात. या पार्श्वभूमीवर 100 वर्षे सातत्याने कार्यरत व नित्य-वर्धिष्णू असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैशिष्ट्ये नजरेत भरतात.
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी केवळ संघमंत्र दिला नाही, तर तो प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी नित्य-विकसनशील कार्यपद्धती म्हणजे शाखातंत्रही दिले. आजच्या परिभाषेत त्याला ‘दृष्टिपत्र’ (व्हिजन डॉक्युमेंट) व ‘ध्येयविधान’ (मिशन स्टेटमेंट) असे म्हणता येईल. संघमंत्राची मांडणी करताना आपण काही नव्याने सांगत आहोत, असा दावा त्यांनी केला नाही. “प्राचीन काळापासून चालत आलेले हिंदू जीवनदर्शन आपण आधुनिक परिभाषेत मांडत आहोत,” असे ते म्हणतात. शाखातंत्रही स्वयंसेवकांच्या सामूहिक चिंतनातून, शहाणपणातून विकसित झाले आहे. काल व परिस्थितीनुसार बदल होण्याची अंतर्निहित (इन बिल्ट) क्षमता व लवचीकता त्या शाखातंत्रात आहे. या दोन्ही संकल्पनांचा आशय आणि अन्वयार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आता आपण करणार आहोत.
क्रांतिकारकांचा मार्ग व म. गांधींच्या काँग्रेसचा मुस्लीम तुष्टीकरणाचा मार्ग यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर व त्यांच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर, आपल्या कार्यासाठी तिसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न डॉ. हेडगेवार यांनी सुरू केला. त्यांच्या डोळ्यांसमोर वर्तमानकालीन भारत व त्यातील हिंदू समाजाच्या अवनतीचे चित्र स्पष्टपणे उभे राहिले. या विपरीत परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे, हे त्यांच्या लक्षात आले. एका बाजूला संपन्न, वैभवशाली असा प्राचीन काळातील भारत त्यांच्या डोळ्यांसमोर होता; तर दुसऱ्या बाजूला आजचा हजार वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेला भारत त्यांच्या नजरेसमोर होता. अतिशय सुसंस्कृत, सुविद्य, बलशाली व कोणत्याही बाह्य आक्रमणाला परास्त करणारा विजिगीषू हिंदू समाज त्यांच्या डोळ्यांसमोर होता, त्यांच्या ज्ञानचक्षूंना दिसत होता; तर दुसरीकडे हतप्रभ, पराभूत, आत्मविस्मृत व असंघटित हिंदू समाज त्यांना दिसत होता. त्यातून व डॉ. हेडगेवारांना आलेल्या व्यामिश्र अनुभवातून त्यांना मार्ग काढायचा होता आणि त्यांनी तो मार्ग शोधला, हे महत्त्वाचे. या हिंदू समाजाचे व राष्ट्राचे परमवैभव, हे ध्येय संघ-संस्थापकांच्या डोळ्यांसमोर होते. त्याचा वैचारिक पाया प्राचीन भारतीय संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, जीवनमूल्ये हा आहे. त्यांचे युगानुकूल पुनरुज्जीवन करून त्यांची पुन:प्रतिष्ठा करणे, हे त्यांचे ध्येय होते. राष्ट्रभावनेचे जागरण व सांस्कृतिक मूल्ये यांच्या आधारे भारताला विश्वगुरुपदी स्थापित करणे, हा संघमंत्र आहे. त्यासाठी ‘व्यक्तिनिर्माण’ व त्या माध्यमातून बलशाली, सुसंघटित, एकात्म, समरसतायुक्त व तुच्छतामुक्त हिंदू समाज निर्माण करणे, हा संघमंत्र आहे. हे साध्य करण्यासाठी सत्तानिरपेक्ष, परिस्थितीनिरपेक्ष, नित्य-संघटन असले पाहिजे. संघात सहभागी होणाऱ्या हिंदूंना या संघमंत्राची जाण असली पाहिजे व त्याच्याशी त्याची बांधिलकी असली पाहिजे. ‘हे राष्ट्र माझी माता आणि मी तिचा पुत्र’ हे नाते हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्तीत रुजले पाहिजे, यासाठी संघमंत्र.
शाखातंत्रसंघाची शाखा हे व्यक्तिनिर्माणाचे केंद्र आहे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या विकासाचे ते केंद्र आहे. ते मानवी ऊर्जानिर्मितीचे वर्षातील 365 दिवस चालणारे अग्निहोत्र आहे. संघ-संस्थापक डॉ. हेडगेवार यांची दूरदृष्टी, प्रेरणा आणि स्वयंसेवकांचे सामूहिक चिंतन या माध्यमातून शाखातंत्र विकसित होत गेले. स्थल, काल, परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता असण्याइतके ते लवचीक आहे. तत्त्वाशी तडजोड न करता तपशिलात बदल होण्याइतकी व्यवस्था त्यात आहे. शाखेच्या एका तासातील कार्यक्रमांचे पूर्वनियोजन व पूर्ण नियोजन काटेकोरपणे होत असते. शाखेचे उद्दिष्ट तिहेरी आहे. एक- स्वयंसेवकाच्या अंगी शिस्त बाणावी, संघभावना व शारीरिक क्षमतांचा परिपोष व्हावा; दोन- शाखेतील बौद्धिक कार्यक्रमांतून संघमंत्राचे त्याचे आकलन वाढावे, त्याची विचार क्षमता वाढावी, समर्पणवृत्ती वाढावी आणि तीन- त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, अंगभूत गुणांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचा कार्यकर्तेपणा वाढावा आणि शाखेत जे शिकले, त्याचे प्रतिबिंब दिवसाच्या उरलेल्या 23 तासांच्या व्यवहारात उमटावे, अशी अपेक्षा असते.
शौर्य, समर्पण, त्याग आणि भारताचे गतवैभव यांचे प्रतीक असलेला ‘भगवा ध्वज’ रा. स्व. संघाने गुरुस्थानी मानला आहे. ध्वजारोहण व ध्वजप्रणाम होऊन संघशाखेची सुरुवात होते. व्यक्ती कितीही मोठी वा महान असली, तरी ती स्खलनशील होऊ शकते म्हणून अमूर्त; पण आदर्शाचे प्रतीक असलेला ‘भगवा ध्वज’ संघाने गुरुस्थानी मानला आहे. ध्वजारोहणानंतर ‘आसेतुहिमाचल’ विस्तारलेल्या मातृभूमीचे सांस्कृतिक गौरवगान गाणाऱ्या एकात्मता स्तोत्राचे पठण होते. शिस्त, संघभावना, शारीरिक क्षमता व स्वास्थ्य वाटावे, यासाठी शारीरिक कार्यक्रम घेतले जातात. सूर्यनमस्कार, व्यायाम, योग, संचलन, तसेच प्रेरणादायी देशी खेळ यांचा यात समावेश असतो. सर्वच कार्यक्रम एकाच दिवशी घेणे शक्य नसल्याने त्यांचे साप्ताहिक नियोजन केले जाते. त्यानंतर जे बौद्धिक कार्यक्रम होतात; त्यात दिनविशेष, सुभाषिते, अमृतवचन, गीतगायन हे कार्यक्रम होतात. याबरोबरच वार्ताविशेष, बोधकथा, परिवार परिचय, सेवाकार्य परिचय, वैचारिक गाभा असणारे बौद्धिक वर्ग यांचेही साप्ताहिक वेळापत्रक केले जाते. ध्वजासमोर शिस्तीत उभे राहून प्रार्थना होते आणि शाखेचे त्या दिवसाचे कामकाज संपते. दैनंदिन शाखेचे स्वरूप हे साधारणतः असे असते. व्यक्ती-विकासाच्या अनेक पैलूंचा या कार्यक्रमरचनेत बारकाईने विचार केला जातो. तो साध्य करण्यासाठी कार्यक्रम हे साधन, निमित्त असते.
नैमित्तिक कार्यक्रमात सहली, सहभोजन, जनसंपर्क अभियान, विविध स्तरांवर नियमितपणे होणाऱ्या बैठका, संघाचे सहा उत्सव, शिबिरे, महामेळावे, स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी होणारे संघशिक्षा वर्ग, प्रचारक प्रशिक्षण वर्ग व बैठका यांचा समावेश असतो. या सर्व नित्य व नैमित्तिक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी विविध स्तरांवर संघरचनेने नियुक्त केलेले तरुण व गृहस्थी कार्यकर्ते आणि संघाची प्रचारक यंत्रणा सामान्य स्वयंसेवकांच्या सहकार्याने व सहभागातून पार पाडत असते. संघाचे जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र व अखिल भारतीय स्तरावरील ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते या कार्याला दिशा व गती देण्यासाठी आपापल्या भागांत प्रवास करत असतात, बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. सामाजिक दायित्व व अभिसरण यासाठी अनेक गतिविधी संघाने विचारपूर्वक स्वीकारल्या आहेत. त्याला संघ शताब्दी वर्षात ‘पंचपरिवर्तना’ची जोड दिली. हिंदू समाजाचे नित्यसिद्घ व बलशाली संघटन, त्याद्वारे राष्ट्रनिर्माण व हे साध्य करण्यासाठी ‘व्यक्ती-विकास’ या त्रिसूत्रीवर संघाचे कार्य आधारित आहे.
संघमंत्राच्या व शाखातंत्राच्या प्रत्येक बारीकसारीक तपशिलामागे काही एक विचार असतो, एक भूमिका असते, चिंतन असते. यासंदर्भातील सर्व निर्णय हे सामूहिक विचार प्रक्रियेतून घेतले जात. ‘मते अनेक; पण चर्चेअंती निर्णय एक’ या समन्वयवादी भूमिकेतून प्रत्येक निर्णय घेतला जात असल्याने त्याच्या अंमलबजावणीची, यशापयशाची जबाबदारी प्रत्येकाची व सामूहिकही असते. अशा या कार्यपद्धतीतून एक शास्त्रशुद्घ संघटनशास्त्र आपोआप विकसित झाले आहे, हे महत्त्वाचे!
संघाच्या कार्यपद्घतीतच बहुस्तरीय नेतृत्व विकासाची प्रक्रिया सामावलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरांवर नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्या संघात नेहमीच तयार व कार्यरत असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीत सर्व क्षेत्रांत कोणत्याही स्तरावर नेतृत्वाचे हस्तांतरण सहज-सुलभ व शक्य होते. संघातील सरसंघचालक हे सर्वोच्च पदही त्याला अपवाद नाही. अशा सर्वसमावेशक पद्धतीने गेली 100 वर्षे संघकार्य सुरू आहे.
समारोप
स्वा. सावरकर यांच्यानंतर त्यांचे युवा संघटनेचे संघटनात्मक कार्य पुढे नेऊ शकणारे प्रागतिक व समर्थ नेतृत्व व या कार्यासाठी आवश्यक असणारी नित्यसिद्ध कार्यपद्धती विकसित झालेली दिसत नाही किंवा नेतृत्वाच्या पुढील पिढ्या विकसित करण्याचा व त्याद्वारे युवा संघटनेचे सातत्य निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसत नाही; ही वस्तुस्थिती आहे. याची दोन कारणे संभवतात. एक- सावरकरांना त्यांच्या जीवनात भोगावा लागलेला कारावास व विजनवास, त्यांच्या जीवनात आलेली संकटे, त्यांची राजकीय कार्यातील व्यस्तता; यामुळे या महत्त्वाच्या बाबींकडे इच्छा असूनही लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. हा दोष व्यक्तीचा नसून परिस्थितीचा आहे. दुसरे- सावरकरांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व राष्ट्रीय चिंतन एवढे प्रगल्भ व काळाच्या पुढे होते की, सर्वसामान्य माणसाच्या ते आवाक्याबाहेरचे होते. त्यांचे शिष्यत्व पत्करणे वा त्यांनी सुरू केलेले संघटनकार्य करणे म्हणजे पदरात विस्तव बांधून घेणे, असे भल्याभल्यांना वाटणे स्वाभाविक होते.
त्या तुलनेत स्वातंत्र्याच्या विविध चळवळींचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी असल्याने संघ-संस्थापक डॉ. हेडगेवार यांना जनमानस व समाजपरिवर्तनाचे गतिशास्त्र चांगलेच ठाऊक होते. बाबाराव सावरकर व स्वा. सावरकर यांनी मांडलेले हिंदू चिंतन याने जरी ते प्रभावित झाले असले, तरी त्यांनी मांडलेला संघविचार समाजाच्या आकलनातील व आवाक्यातील होता आणि विशेष म्हणजे, तो विचार प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्यांनी एक कार्यपद्धती विकसित केली होती. त्यांचे स्वत:चे द्रष्टेपण व स्वयंसेवकांचे सामूहिक चिंतन यातून संघटनशास्त्रदृष्ट्या शास्त्रशुद्ध व प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी सुलभ अशी व्यक्ती, काल व परिस्थिती निरपेक्ष अशी ती कार्यपद्धती आहे आणि 100 वर्षांनंतरही तिचे व्यावहारिक महत्त्व किंचितही कमी झालेली नाही.
स्वा. सावरकरांचे युवा संघटनेचे प्रयत्न वरा. स्व. संघाचे हिंदू संघटन व व्यक्तिनिर्माणाचे कार्य एकाच ध्येयाकडे जाणारे मार्ग आहेत आणि ते ध्येय म्हणजे ‘परं वैभवम् नेतुमेत् स्वराष्ट्रम् हे महत्त्वाचे!
- प्रा. श्याम अत्रे
9324365910