स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ हे नाव घेतल्यावर आपल्यासमोर ‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’, ‘हिंदुत्वाचे उद्गाते’, ‘अंदमानातील छळाला पुरून उरणारे सावरकर’, ‘मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी’, ‘महाकवी’ अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुआयामी प्रतिमा उभ्या राहतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर हिंदुत्व, सेवासमर्पणाचा भाव, संघटन आणि शिस्तबद्धता हे पैलू प्रकर्षाने समोर येतात.
सावरकरांनंतर अत्यंत प्रतिकूल राजकीय आणि सामाजिक परिस्थितीतदेखील जनमानसांत हिंदुत्व पोहोचवून, त्याला भक्कम जनाधार मिळवून देण्याचे कार्य जर कोणी केले असेल, तर ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने! हिंदुत्व, सामाजिक समरसता, देशभक्ती, परिवर्तनशीलता हे सावरकर आणि संघाला जोडणारे काही महत्त्वाचे दुवे. हिंदूंचे आत्मभान जागृत करून हिंदुत्वाची तात्त्विक बैठक, सैद्धांतिक आणि चिंतनात्मक मांडणी, हिंदुत्व संहिताबद्ध करण्याचे महान कार्य सावरकरांनी केले; म्हणून सावरकर दार्शनिक आणि हिंदुत्व परंपरेतील महत्त्वाचे चिंतक ठरतात, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू माणसाची अचूक नस ओळखून, त्याच्यातील हिंदुत्वाचे आत्मभान जागृत करण्यासाठी संघटनात्मक कार्य केले आणि त्याला सेवावृत्तीची सशक्त जोड दिली. ‘भारत समर्थ व्हावा, सशक्त व्हावा’ हे सावरकर आणि संघाचे सर्वोच्च ध्येय! त्यासाठी द्रष्ट्या सावरकरांनी मार्गदर्शन केले, तर संघाने त्याला संघटनेची जोड दिली. एकमेकांशी स्पर्धात्मक नव्हे, तर परस्परपूरक कार्य त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष. जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यानिमित्ताने यावर्षी ‘स्वा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असा विषय ‘कालजयी सावरकर’ विशेषांकासाठी निवडला आहे. त्यासाठी सावरकर आणि संघ यांचे सामायिक विचार, कार्यासंबंधीचे लेख या विशेषांकात वाचायला मिळतील. तसेच डॉ. श्रीरंग गोडबोले यांचा स्वा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील महत्त्वाचा प्रदीर्घ लेख या विशेषांकात आहे. या लेखातील माहिती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभिलेखागारातील दुर्मीळ माहितीवर आणि छायाचित्रांवर आधारित असल्याने, हा विशेषांक निश्चितच संग्राह्य झाला आहे. यातील छायाचित्रांसाठी ‘सांस्कृतिक वार्तापत्र युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार विशेषांका’चे (संपादक-डॉ. श्रीरंग गोडबोले, दि. 31 मार्च 2014) विशेष आभार!
दरवर्षीप्रमाणे यंदाही दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘कालजयी सावरकर’ विशेषांकासाठी मला अतिथी संपादक म्हणून संधी दिल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे खूप खूप आभार; तसेच मुख्य उपसंपादक (फीचर्स) विजय कुलकर्णी, सर्व लेखकांचेदेखील खूप धन्यवाद! वाचक दरवर्षीप्रमाणे यंदाच्या विशेषांकालादेखील उत्तम प्रतिसाद देतील, अशी आशा करतो.
-अक्षय जोग, अतिथी संपादक