स्वा. वि. दा. सावरकर आणि रा. स्व. संघाचे स्त्री-सबलीकरणाचे विचार हे केवळ उक्तीवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर आधारित आहेत. स्त्रीला सन्मान देण्याबरोबरच राष्ट्रोत्थानातील स्त्रीची महत्त्वपूर्ण भूमिका सावरकर आणि संघानेही वेळोवेळी मांडली आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही केली. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांपासून, ते त्यांच्या साहित्यातील धडाकेबाज स्त्री पात्रांपर्यंत, स्त्री-सबलीकरणाचा विचार स्पष्टपणे प्रतिबिंबित होतो. तसेच संघाच्या विविध संघटनांतील स्त्रियांचा सहभाग आणि ‘राष्ट्र सेविका समिति’ची गेल्या 90 वर्षांची घोडदौड, स्त्री-सबलीकरणाच्या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण ठरावी. याविषयी सविस्तर विवेचन करणारा हा लेख...
स्त्री-सबलीकरण हा केवळ हक्कांचा विषय नसून, आत्मभान जागृत होण्याचा एक सखोल आणि प्रदीर्घ असा प्रवास आहे. बरेचदा स्त्रीच्या क्षमतेपेक्षा तिच्या मर्यादांचाच अधिक विचार केला जातो. भारतीय इतिहासाचा मागोवा घेतला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, स्त्रीची मूळ प्रतिमा ही निर्बल किंवा परावलंबी नव्हती, तर ती बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि स्वाभिमान यांची सशक्त अभिव्यक्ती होती. परंतु, पुढे भारतावर झालेल्या आक्रमणांमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्त्रियांना घराच्या चौकटीत राहणं भाग पडलं. मात्र, या ऐतिहासिक बदलामुळे स्त्रीची मूलभूत क्षमता कधीच लोप पावली नाही. स्त्री-सबलीकरण हे आपल्या संस्कृतीतील ‘शक्ती’ या तत्त्वाचे पुनर्जागरण आहे.
स्वा. सावरकरांचे स्त्री-सबलीकरणाचे विचार
स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत पुरोगामी असे क्रांतिकारी सुधारक. त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यनिष्ठा, देशनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा या निष्ठांवर उभं होतं. सावरकरांच्या मनात स्त्रीप्रतिमा कशी होती, हे बघायचं असेल, तर सावरकरांनी ललित साहित्यात चितारलेल्या स्त्रिया बघाव्या. अतिशय धाडसी, शूर, कर्तृत्ववान, मेधावी अशा या स्त्रिया आहेत. ‘कमला’, ‘गोमंतक’ किंवा ‘विरहोच्छ्वास’ या महाकाव्यांत, ‘उःशाप’, ‘उत्तरक्रिया’ किंवा ‘संन्यस्त खड्ग’ या संगीत नाटकांत किंवा ‘काळे पाणी’ आणि ‘मोपल्यांचे बंड’सारख्या कादंबऱ्यांमध्ये किंवा कथांमधली स्त्रीपात्रे अत्यंत तेजस्वी रेखाटली आहेत. ‘विरहोच्छ्वास’मध्ये मुकुलची प्रेयसी प्रेमला ही स्वतः युद्धामध्ये उडी घेते. ‘उःशाप’मधील बंगष खान याचा खून केल्यावर कमलिनी म्हणते, “हिंदू कुमरिकांनो, ही रक्ताने माखलेली कट्यार पाहा. पावित्र्यरक्षण आणि धर्मसंगोपन आमच्या पुरुषांना आणि देवालाही जेव्हा करता येत नाही, तेव्हा ते एक चितोडची चिता करू शकते, नाहीतर ही सूडाची सुरी!”
‘संन्यस्त खड्ग’मधली सुलोचना म्हणते, “शरण नाही रण, मारीता मारीता मरण.” सावरकरांच्या साहित्यातील स्त्रिया या अशा रणांगणावर पुरुषांच्या बरोबरीने पुरुषार्थ गाजवणाऱ्या, प्रसंगी पुरुषांची निर्भत्सना करणाऱ्या आहेत. ‘उत्तरक्रिया’ नाटकात यशवंतराव जेव्हा पानिपतच्या सूडासाठी आपण स्वारीवर जात असल्याचे सांगतात, त्यावेळी त्याच आवेशात त्यांची पत्नी म्हणते, “हिंदू वीरांनो, जा भाऊंचा सूड घ्यायला; हिंदूंचा सूड घ्यायला जा, जा!” सावरकरांनी रेखाटलेल्या स्त्रिया या वैयक्तिक सुखापेक्षा राष्ट्रकर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या आहेत.
1933 मध्ये ‘मनुस्मृतीतील महिला’ ही लेखमाला ‘स्त्री’ मासिकात प्रसिद्ध झाली. धर्मशास्त्रामध्ये स्त्रियांचे दोषविषयक वर्णन सावरकरांना अमान्य होते. त्यांच्या मते, शास्त्रकार पुरुष होते; शास्त्रकार स्त्रिया असत्या, तर त्यांनीसुद्धा पुरुषदोष मांडले असते. ‘मनुस्मृती’मध्ये अनेक परस्परविरोधी वचनं आहेत, तेही सावरकर निदर्शनास आणतात. 1950 मध्ये सावरकरांनी ‘स्त्रीजीवनाचे ध्येय’ या विषयावर दादर येथे व्याख्यान दिले होते. त्यांच्या मते, भारतीय घटनेने स्त्रियांना समान अधिकार दिले आहेत. पण, निसर्गाने स्त्रियांकडे प्रजोत्पादनाचे काम दिले आहे; त्या दृष्टीने स्त्रियांचे ध्येयसुद्धा पुरुषांपेक्षा वेगळे आहे. इथे ‘चूल आणि मूल’ या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात येतो. सावरकर म्हणतात, “राष्ट्र हे लोकांनी बनते. यादृष्टीने उत्तम संतती निर्माण करणे, तिचे संगोपन, सेवा, काळजी करणे ही राष्ट्रसेवा आहे. यादृष्टीने स्त्रियांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक जडणघडण झालेली असते. यादृष्टीने स्त्रियांना गृहशिक्षण देण्यात यावे,” असे ते म्हणतात. पण, सावरकर असेही म्हणतात, “ज्यांना एवढी उपजत बुद्धी लाभलेली असते, त्यांना मूल झाले किंवा नाही, यापेक्षा त्यांनी गणितशास्त्रात काय प्रगती केली व मानवावर काय उपकार केले, हे अधिक महत्त्वाचे आहे.”
1953 मध्ये पुण्याच्या महिला सभेत बोलताना त्यांच्या भाषणाचा आशय असा होता की, निसर्गतःच स्त्रीकडे आलेले ‘चूल आणि मूल’ पाहण्याचे काम, म्हणजे तिचे निम्मे राष्ट्रीय कर्तव्य आहे. उरलेल्या निम्म्या कर्तव्यात समाजाच्या आणि देशाच्या सेवेचा समावेश होतो! म्हणजेच, आपलं ध्येय हे केवळ संतती निर्माण करणे, एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ते प्राथमिक कर्तव्य आहे; हे कर्तव्य बजावल्यावर, आपापली क्षमता ओळखून ती इतरही काही करू शकते, या मताचे सावरकर आहेत.
1936 मध्ये ‘प्राचीन यहुदी योषिता’ ही लेखमाला, शिवाय ‘ललनांच्या लावण्याचे हानी-लाभ’ हे लेखसुद्धा सावरकरांनी लिहिले. सावरकरांनी एका लेखामध्ये जगातील तीन थोर स्त्रियांची ओळख करून दिली आहे. यामध्ये चीनच्या चंग ज्या राजकारण कुशल आहेत, इटलीच्या मुसोलिनी ज्या उत्तम गृहिणी आहेत आणि Abyssinia म्हणजे आजच्या इथियोपियाच्या सम्राज्ञी ज्या धर्मभोळ्या आहेत. प्रत्येकीच्या ठिकाणी वेगळी गुणवत्ता आहे. सगळ्याच स्त्रिया या कर्तृत्ववान असतील असे नाही, त्यांनी मुसोलिनीसारखे गृहकर्तव्य पार पाडावे. त्यांच्या पत्नी माई सावरकरसुद्धा मुसोलिनीच्या गटात मोडतात. त्यांनी सार्वजनिक हळदी-कुंकवाचे कार्यक्रम केले, तरी त्या धाडसी नव्हत्या; त्यामुळे सावरकरांनीसुद्धा त्यांना कधी भरीस पाडलं नाही. मात्र, इथियोपियाच्या सम्राज्ञीप्रमाणे स्त्रियांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये, असेही सावरकर म्हणतात.
सावरकरांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर त्यांनी स्वतःच्या पत्नीस दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता. सावरकरांचे विचार स्त्रियांच्या बाबतीतसुद्धा क्रांतिकारकच म्हणावे लागतील!
संघाचे स्त्री-सबलीकरणाचे विचार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेची ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या ओळीने सुरुवात होते. भारतमातेच्या या धारणेत-आकलनात प्रत्येक स्त्रीचा सन्मान अंतर्भूत आहे. 2023च्या विजयादशमी उत्सवात उद्बोधन करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले होते, “स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एकमेकांना परस्परपूरक आहेत, हा आपला भारतीय दृष्टिकोन आहे. व्यक्तिनिर्माणाचे काम करण्यासाठी संघाच्या शाखा आणि महिलांसाठी ‘राष्ट्र सेविका समिति’च्या शाखा वेगळ्या चालतात. परंतु, समाजाच्या इतर सर्व कामांमध्ये स्त्री-पुरुष एकत्र मिळून काम करतात आणि डॉ. हेडगेवारांच्या काळापासून हे चालत आले आहे. समाज संघटित करायचा असेल, तर संख्येच्या दृष्टीने अर्धा भाग असलेल्या मातृशक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; त्यांनाही सक्षम करावे लागेल.”
1936 साली वं. लक्ष्मीबाई केळकर यांनी ‘राष्ट्र सेविका समिति’ची स्थापना केली होती. या कार्याला डॉ. हेडगेवार यांचा पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद होता. “स्त्रिया या समाज आणि राष्ट्राचा कणा आहेत आणि जोपर्यंत त्या जागृत होणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्राचा पूर्ण विकास संभव नाही.” हा डॉक्टरांचा विचार त्यांचा दूरदशपणा दाखवतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘राष्ट्र सेविका समिति’ या दोन्ही संघटनांची कार्यपद्धती वेगवेगळी असली, तरी उद्देश्य एकच आहे. मुलामुलींमध्ये कर्तव्यबोध निर्माण करणं, त्यांना राष्ट्रनिर्माणच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं; थोडक्यात, त्यांचं चरित्र निर्माण करणं! आज समितीच्या देशामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक शाखा आहेत. तसेच ब्रिटन, अमेरिका, मलेशिया, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, युरोपसह जगात अनेक ठिकाणीसुद्धा त्या यशस्वीरीत्या सुरू आहेत. समितिमध्ये स्त्रिया शारीरिक व्यायाम, योग, समूहचर्चा आणि बौद्धिक चिंतन यांसारख्या गोष्टींमध्ये सहभागी होतात, जेणेकरून त्यांची सर्जनशीलता, कर्तृत्व हे केवळ कुटुंबापुरतंच मर्यादित राहात नाही, तर राष्ट्रकार्यासाठी त्याचा उपयोग होतो. स्त्रियांमध्ये असलेल्या मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तीन गुणांना समितीमध्ये प्रोत्साहन दिलं जातं. या गुणांना धरून स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करताना दिसतात. आजकाल वारंवार संघकार्यात स्त्रियांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. त्यावर डॉ. मोहनजींची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक आहे. 2016ला ‘राष्ट्र सेविका समिति’चं प्रेरणा शिबीर सुरू होतं. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना ते हसत म्हणाले, “संघ महिलांमुळेच तर चालतो! उद्या जर एखाद्या स्वयंसेवकाच्या पत्नीने म्हटलं की, तुम्ही उद्यापासून शाखेत जाणार नाही, तर संघाचं कामचं थांबेल!” यादृष्टीने संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना ढोबळे यांनी उचित म्हटलं आहे की, “संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा योगक्षेम चालवण्यासाठी मातृशक्तीच घराघरांत नांदत असते. मोठ्या कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढणे, औक्षण करणे, वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये सहभाग, घरी बैठक असते, तेव्हा चहापान किंवा भोजन-न्याहारीची व्यवस्था हे सगळं स्त्रिया करत असतात. ही अदृश्य शक्ती कार्यरत असते.”
दृश्य स्वरूपात असणारा स्त्रियांचा सहभाग पाहिला, तर आकडेवारी विस्मयात टाकणारी आहे. विस्तारभयास्तव फार तपशिलात जाता येणार नाही.
एखाद्या वटवृक्षाला केवळ काही रेषांमध्ये चितारण्यासारखं हे काम आहे. त्या वटवृक्षाची असंख्य मुळे, फांद्या, पानं-फळं, त्या वटवृक्षावर पूर्णवेळ प्रचारक असलेली स्वयंसेवकांची घरटी असे अनेक तपशील सुटून जाणार आहेत. यावरून संघाचा
स्त्रीसबलीकरणाचा विचार किती व्यापक आणि मूलगामी आहे, याची कल्पना येईल.
संघाची सुमारे दीड लाख सेवाकार्ये देशभरात चालतात. त्यांत निम्मा सहभाग हा स्त्रियांचा आहे. संघाच्या आनुषंगिक संघटना आणि कार्य जसे ‘सेवा भारती’, ‘विद्या भारती’, ‘संस्कार भारती’, ‘विवेकानंद केंद्र’, ‘अखिल भारतीय विद्याथ परिषद’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘भारतीय मजदूर संघ’, ‘भारतीय किसान संघ’, ‘संस्कृत भारती’, ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’, ‘अखिल भारतीय इतिहास संकलन योजना’, ‘दुर्गावाहिनी’ यांमध्ये स्त्रियांचा केवळ निम्मा सहभाग नाही, तर अनेक संघटनाच्या पदाधिकारी या महिला आहेत. दोन ‘विश्व संवाद केंद्रा’च्या प्रमुख या महिला आहेत. प्रकाशन विभागातसुद्धा अनेक ठिकाणी स्त्रिया संपादनाची जबाबदारी सांभाळताना दिसतात. ‘सेवागाथा’ नावाची एक वेबसाईट चालते; हे चालवण्याचं काम एक महिला करते. प्रचार विभागातसुद्धा स्त्रियांचा मोठा सहभाग आहे. “भारतीय स्त्रीसबलीकरणाचा अर्थ पुरुषविरोध नाही, तर पुरुषांसोबत मिळून समाजनिर्माण करणे हा आहे,” या के. एस. सुदर्शन यांच्या या वाक्याची यथार्थता पटते.
आजपर्यंत संघाची जनजागृतीची अनेक अभियानं झाली. ‘राष्ट्रजागरण अभियान’, ‘कारसेवा’, ‘शिलापूजन’, ‘विश्वमंगल गोग्राम यात्रा’, ‘एकात्मता यात्रा’ यांमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने हिरिरीने सहभागी झाल्या. राम मंदिर निधी समर्पण अभियानात 27 हजार महिला सहभागी झाल्या होत्या. अमरनाथचं आंदोलन 62 दिवस चाललं, ज्यात अडीच लाख महिलांचा सहभाग होता. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, धर्मजागरण, ग्रामविकसन, पर्यावरण, बालगोकुलम या संघाच्या सहा गतिविधींमध्ये महिलांचा हजारोंच्या संख्येने सहभाग आहे. महिला समन्वयाद्वारे 2018 मध्ये ‘स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया’ हे 74 हजार स्त्रियांचं मोठं सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये 16 संघटनांच्या महिलांनी काम केलं. संघशताब्दीनिमित्त गेल्यावष देशभरात 472 महिला संमेलनं झाली, ज्यांमध्ये 5 लाख, 75 हजार, 740 महिला सहभागी झाल्या. यावरून हे स्पष्ट होते की, संघाचा महिलांप्रति असलेला दृष्टिकोन संतुलित आहे. ‘नारीशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे,’ हे वाक्य संघविचारात आणि आचारात किती खोलवर रुजलं आहे, हे दिसतं. ‘नारी शौर्य पर्व’, ‘नारी गौरव सप्ताह’ किंवा ‘भारताच्या वीर नारी’ यांसारख्या कार्यक्रमांचं नियमित आयोजन संघ करत असतो. अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, राणी अबाक्का, राणी दुर्गावती सारख्या आदर्श स्त्रियांचं स्मरण या कार्यक्रमात केलं जातं.
उपसंहार
सावरकर आणि संघविचारात काही समान धागे आढळतात. दोन्हीकडे स्त्री-सशक्तीकरण हा केवळ सैद्धांतिक किंवा चर्चेचा विषय नाही, तो कृतीचा विषय आहे. दि. 6 ऑक्टोबर 1947 साली मुसलमानांनी पळवून नेलेल्या 20 हजार स्त्रियांना सोडवण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत मागावी, असे पत्र भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंग यांनी गृहमंत्री सरदार पटेल यांना पाठवलं होतं. या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला, दि. 14 ऑगस्ट 1947ला मावशी केळकर पाकिस्तानमध्ये गेल्या आणि त्यांनी 800 महिलांची सभा घेतली आणि त्यांना संघटित राहून शीलाचं रक्षण करण्यासाठी धीर दिला, हे असतं महिला सशक्तीकरण!
सावरकरांनी ज्याप्रकारे स्त्रीला राष्ट्रकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले, त्याचप्रमाणे संघाच्या विचारधारेतही स्त्रीला समाजघडणीतील जबाबदार आणि नेतृत्वक्षम घटक म्हणून पाहिलं जातं. दोघांच्या दृष्टिकोनात स्त्रीचे पूजन केवळ प्रतीकात्मक न राहता, तिच्या कर्तृत्वाला आणि निर्णयक्षमतेला मान्यता मिळाली पाहिजे, ही भूमिका दोघेही मांडतात.
- अश्विनी जांभेकर- पितळे
9922952258