जातिभेद, अस्पृश्यता निवारण असेल अथवा ‘रोटीबंदी’, ‘बेटीबंदी’सारख्या सप्तबेड्यांवर स्वा. सावरकरांनी जोरदार आसूड ओढले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबरोबरच जातिभेदांपलीकडे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, यासाठीही सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना असेल किंवा अस्पृश्यांसोबत सहभोजनातून समाजाला प्रत्यक्ष कृतीतून समरसतेचा संदेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सामाजिक समता आणि समरसतेच्या संस्कारांची रुजवण करीत, हिंदू संघटन बळकट केले. त्यानिमित्ताने सावरकर आणि संघाने जोपासलेल्या समरसतेचे चिंतन करणारा हा लेख...
जातिभेदाच्या निर्दालनासाठी मी शाळेत होतो, तेव्हापासून प्रकटपणे वागत आलो आहे. महाविद्यालयामध्ये मी हा उघड उपदेश देई. विलायतेत तर बोलायलाच नको. पुढे अंदमानातही हाच उपदेश देई आणि तो प्रत्यक्ष व्यवहारात आणी. मी शेकडो लोकांच्या जातिभेदमूलक दुष्ट समजुती पालटल्या आहेत. कारागृहातून बाहेर येताच, मी तीव्र लोकद्वेषास तोंड देऊनही जातिभेदाच्या निर्दालनाचे यत्न प्रकटपणे व्याख्यानांतून, लेखांतून, चर्चेतून माझ्या व्यक्तीपुरते तसे आचरण प्रकटपणे केले आहे.” - स्वातंत्र्यवीर सावरकर.
आपला समाज निर्दोष झाला पाहिजे, यासाठी राजा राममोहन राय, महात्मा फुले, लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, स्वामी दयानंद सरस्वती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या सार्यांनीच समाजास अंतर्मुख होण्यासाठी भाग पाडले. आपली लेखणी, वाणी आणि कृतिशीलतेने समतेचा आणि पर्यायाने समरसतेचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला.
अंदमानातून सुटका होऊन सावरकर रत्नागिरीला आले. त्यांच्या राजकीय विचार प्रकटनाला वा कृतीला इंग्रजांनी प्रतिबंध केला होता. 1924 साली वयाच्या 41व्या वर्षी सावरकर रत्नागिरीला आले. ते पुढे साडेतेरा वर्षे रत्नागिरीलाच राहिले. अशा स्थितीत त्यांनी हिंदूंच्या एकात्मतेचा व त्यांच्या आधुनिकतेचा विचार आग्रहाने मांडला.
सावरकर हे केवळ विचारवंत नव्हते, तर प्रचारक कार्यकर्ते होते. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील विचार व कार्य क्रांतिकारी होते. “शाळेत असल्यापासूनच आपण जातिभेद निर्दालनाच्या पक्षाचे होतो”, असे सावरकर म्हणतात. जाती-जातींमधील ‘स्पर्शबंदी’ व ‘रोटीबंदी’ मोडावी आणि सर्वांनी आपणास एका ‘हिंदू’ जातीचे म्हणून ओळखावे, त्यानुसार वागावे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. या विषयासंबंधी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण शैलीत अनेक लेखही लिहिले. पण, लेख लिहूनच ते थांबले नाहीत. त्यांनी रत्नागिरी शहरात प्रत्यक्ष चळवळ सुरू केली. सहभोजन, सार्वजनिक हळदीकुंकू, संक्रांत व दसरा उत्सव अशी अनेक उदाहरणे बोलकी आहेत. ‘रोटीबंदी’, ‘बेटीबंदी’, ‘स्पर्शबंदी’, ‘व्यवसायबंदी’, ‘वेदबंदी’ आणि ‘सप्तशृंखला’ तोडून टाकण्यासाठी सावरकरांनी आग्रही प्रचार केला. सवर्णांना काय वाटेल किंवा राजकीय मतावर काय परिणाम होईल, याचा विचार न करता त्यांनी अनिष्ट पद्धतींवर आक्रमकपणे आघात केले.
रत्नागिरीने अस्पृश्यतेची आणि ‘रोटीबंदी’ची बेडी कशी तोडली?
या लेखात त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली, तरी या गोष्टींचा किती गांभीर्याने अभ्यास केला होता, हे लक्षात येते. सावरकर लिहितात, “जी काही माणसे अस्पृश्यता स्वतः पाळणार नाहीत असे म्हणाली, त्यांना घेऊन सोप्यातली सोपी गोष्ट म्हणून महारवाड्यात भजने करण्यास जाऊ लागले. ‘हिंदुसभे’ची बरीच मंडळी वारंवार महार-चांभारवाड्यात जाऊन झाडझूड करत, तुळशी-फुलझाडे लावीत, भजने करीत. महार-चांभारांना गावांत आणून संमिश्र भजने करण्यास आरंभले. गावांत चालताना सर्वांसमक्ष त्यांच्या खांद्यावर हात टाकावा, हातातील वस्तू उघडउघड द्यावी-घ्यावी की, ज्यांयोगे अस्पृश्यांस शिवून घेण्याची आणि नागरिकांनी त्यांना शिवताना बघण्याची सवय लागावी. हळूहळू लोकांची मने वळवून काही पालख्यांच्या मिरवणुकीत व दिंड्यांमध्ये अस्पृश्यांस जागा मिळू लागली. शाळांतील मुले सरमिसळ बसविण्याचे आंदोलन 1925 पासून हाती घेतले. दसरा नि संक्रांत या दोन दिवशी सोने नि तिळगुळ वाटण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी जातींच्या मंडळींसह महार, चांभार, भंगी यांचेही दोन-दोन लोक घेऊन ‘हिंदुसभे’च्या वतीने घरोघर जावे व अंगणातूनच विनवावे की, “आम्ही सोने द्यावयास आलो आहो, आपण आपल्या घरी ख्रिश्चन, मुसलमानादिक अहिंदूंना जिथपर्यंत येऊ देता, तिथपर्यंत तरी आम्हां हिंदूंस येऊ द्यावे! अहिंदूंहूनदेखील तुमच्या हिंदू-धर्मबंधूस अस्पृश्य लेखणे म्हणजे हिंदू धर्मास अपमानीणे, उपमर्दिणे नव्हे काय?” दोन-चार वर्षे हा उपक्रम सारखा चालू ठेवला. सरसकट अस्पृश्यांना प्रवेश मिळू लागला, तेव्हा तो उपक्रम पुढे अनावश्यक म्हणून संपविला. महिलांसाठी संमिश्र हळदी-कुंकवाचे समारंभ चालू केले. पुढे यात्रा, सभा, संमेलनांतून गावांत सर्व लोक स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून सरमिसळ बसण्या-फिरण्याची रीतच पडली. पूर्वास्पृश्यांचे एक बॅण्ड पथक उभारले. अनेक पूर्वास्पृश्यांना नोकर्या लावून दिल्या. 1929 साली स्पृश्य-अस्पृश्य यांचा एकत्र अखिल हिंदुमेळा झाला. ‘पतितपावन अखिल हिंदू मंदिर’ नि संस्था स्थापन केली. पोथीजात जातिभेदांच्या मानवी उच्च-नीचतेला थारा न देता, हिंदुमात्र तितका जिथे एकमुखाने सांघिक पूजा-प्रार्थना करू शकतो आणि करतो, असे हिंदू जातीचे हे एक राष्ट्रीय केंद्र होऊन बसले आहे.
स्वा. सावरकरांनी मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता निवारणाचे कार्य 1924 पासून रत्नागिरीत सुरू केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामही त्याच दरम्यान नागपुरात डॉ. हेडगेवारांनी सुरू केले. त्यांनी स्वत्व विसरलेल्या समाजाला एका साध्या-सोप्या कार्यपद्धतीद्वारे दैनंदिन संघाची शाखा आणि नैमित्तिक कार्यक्रम दिले. शाखेमध्ये त्यांनी एक चैतन्य निर्माण करत परस्परांशी संपर्क, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे, परस्पर जिव्हाळा आणि अकृत्रिम व्यवहार यामधून त्यांनी ‘मी हिंदू आहे, हे माझे राष्ट्र आहे, हे हिंदुराष्ट्र आहे’ या अत्युच्च ध्येयाशी सर्वांना जोडले. त्यांच्या दृष्टीने हिंदुराष्ट्र हा वादविवादाचा विषय नसून, ती प्रत्यक्ष जीवनानुभूती होती.
डॉ. हेडगेवारांच्या ‘हिंदू-संघटन’ या शब्दांतून सामाजिक आशय मांडणारा एक शब्दप्रयोग अत्यंत समर्थपणे पुढे आला, तो म्हणजे ‘समरसता.’ ‘समरसता’ हा या काळाचा लक्ष्यवेधी शब्द आहे. आज राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत हा शब्द वापरला जाऊ लागला आहे. मुख्य म्हणजे, सामाजिक परिवर्तनाचा आधार असणारे व्यक्तिगत आणि सामुदायिक असणारे मन; या मनाशी जोडलेला समरसतेचा विचार आहे.
हिंदूंना जात विसरायला लावता येऊ शकते, हिंदू हा जातपात, पंथ, भाषा यांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो आणि आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत, आपण सर्व हिंदुत्वाच्या अनुभूतीने परस्परांचे बंधू आहोत, भाऊ आहोत, ही अनुभूती डॉ. हेडगेवारांनी निर्माण केली. ‘केवळ हिंदूच आमचे बंधू आहेत’ असे नसून, ‘सगळ्या मानव जातीशी आमचे बंधुत्वाचे नाते आहे,’ असा केवळ आशावाद निर्माण केला नाही; तर आज देशभरात त्याचे प्रकटीकरण झाल्याचे आपल्याला दिसते.
सर्व हिंदूंना एका समान भूमिकेवर आणायचे आहे, एका समान पातळीवर आणायचे आहे. विचाराच्या आणि व्यवहाराच्या एका समान भूमिकेवर आणायचे आहे, अशी संघाची प्रारंभीपासूनची भूमिका राहिली आहे. द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर गुरुजींच्या प्रयत्नांतून भारतातील सर्व पंथोपंथाचे धर्माचार्य एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्याकडून ‘न हिंदू पतितो भवेत्, हिंदवः सोदराः सर्वे!’ यासारखे विचार सर्वमान्य करून घेतले. दि. 8 मे 1974 रोजी पुण्याच्या ‘वसंत व्याख्यानमाले’त तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे ‘सामाजिक समता आणि हिंदू संघटन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, आरक्षण, आंतरजातीय विवाह आदी विषयांवर संघाची भूमिका स्पष्ट केली आणि उघडपणे सांगितले की, “अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे.”
इंग्रजी दिनदर्शिकेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दि. 14 एप्रिल आणि मराठी दिनदर्शिकेनुसार वर्षप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ही डॉ. हेडगेवारांची जयंती 1983 मध्ये एकाच दिवशी म्हणजे, दि. 14 एप्रिलला आली होती. त्यामुळे असा दुर्मीळ योग साधत, ज्येष्ठ संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडींच्या पुढाकाराने दि. 14 एप्रिल 1983 मध्ये ‘सामाजिक समरसता मंचा’ची स्थापना करण्यात आली.
दत्तोपंत ठेंगडी यांच्या व्याख्यानांवरील दोन पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. ‘दलित समस्या-एक विचार’ आणि ‘समरसतेशिवाय सामाजिक समता अशक्य!’ यामध्ये त्यांनी सामाजिक समता आणि समरसतेविषयी मूलभूत चिंतन मांडले. यातून समरसतेचा विचार समाजामध्ये पोहोचायला उपयोग झाला. त्यावर ‘समरसता मंचा’ची वाटचाल सुरू झाली.
‘सर्व महापुरुष सर्व समाजाचे, कुणा एका समाजाचे नाहीत,’ असे सांगत प्रबोधनपर्वातील सर्व महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र येऊन साजरी केली पाहिजे. त्यानिमित्ताने सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवायला ‘समरसता मंचा’ने यशस्वी प्रयत्न केले. अठरापगड जातींच्या संस्था-संघटनांना साद घालत, समरसता-विचार सर्वदूर पोहोचला. 1994 रोजी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या मार्गदर्शक मंडळाच्या सर्व संतांनी, पूज्य शंकराचार्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. काशी येथील डोंब राजाच्या घरी जाऊन संतांनी त्यांच्याबरोबर भोजन केले. डॉ. आंबेडकरांना 1932 साली नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी अस्पृश्य म्हणून प्रवेश नाकारला. त्याचे परिमार्जन म्हणून ‘विश्व हिंदू परिषदे’ने अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा शिलान्यास एका तथाकथित पूर्वास्पृश्य असलेल्या कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते केला. 2005 साली त्याच काळाराम मंदिरापासून चार प्रांतांच्या ‘समरसता यात्रे’ची सुरुवात झाली. भिकूजी इदाते, रमेश पतंगे, मधुसूदन व्हटकर, सुनील भंडगे आदी तथाकथित बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देऊन महंत सुधीर महाराज पुजारी यांनी ‘माझ्या आजोबांनी केलेल्या अन्यायाचे मी परिमार्जन करतो’ असे जाहीर करत, काळारामाला क्षमायाचना करत, एक इतिहास घडवला. मे 2026 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याच काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला, हे सामाजिक समरसतेचे कृतिशील पाऊल म्हणावे लागेल.
‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या माध्यमातून कोट्यवधी भटके-विमुक्तांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य आजही चालू आहे. साहित्यामध्ये समाजाचा विचार दृढमूल आहेच, तो समरसतेच्या कृतीला वाहिलेला आहे, अशी सर्व समाजाला कवेत घेणारी 20 ‘समरसता साहित्य संमेलने’ योजून महाराष्ट्रातील साहित्यजगतामध्ये ‘सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक’ हा विचार रुजवला गेला.
- डॉ. सुनील भंडगे
9960500827