टीकाकारांना सावरकर कधीच कळले किंवा झेपले नाहीत; सावरकर जयंतीनिमित्त राज ठाकरे यांची पोस्ट

    28-May-2026   
Total Views |
 
Raj Thackeray Savarkar Jayanti Post
 
मुंबई : (Raj Thackeray Savarkar Jayanti Post) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते. क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत की, त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावरकर जयंतीनिमित्त पोस्ट करत त्यांना अभिवादन केले. (Raj Thackeray Savarkar Jayanti Post)
 
राज ठाकरे म्हणाले की, "सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का, याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का, हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणे मान्य नव्हते. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय, ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचारही न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे." (Raj Thackeray Savarkar Jayanti Post)
 
महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणे सुरु
 
ते पुढे म्हणाले की, "याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचे दिसत आहे. आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे यात आपल्याला गुंतवून ठेवले जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणे सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणे सुरु आहे आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत." (Raj Thackeray Savarkar Jayanti Post)
 
आपण कोण होतो हे विसरल्यास पुढे जाण्याचा मार्ग कसा आखणार?
 
"उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचे कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचे याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत? यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचे कठीण आहे. आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतले जे उत्तम आहे ते घेणे, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणे हे करणे म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल," असेही ते म्हणाले. (Raj Thackeray Savarkar Jayanti Post)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....