भारताला ज्ञानाबरोबरच, समृद्ध संस्कृतीचेही वरदान लाभले आहे. त्यामुळेच या देशातील अनेक सणांमध्ये ज्ञान आणि संस़्कृतीचा सुरेख व दुर्मीळ संगम आढळतो. सध्या सुरु असलेला अधिक मास याचे सर्वोत्तम उदाहरण! खगोलीय क्लिष्ट गणिताला, मानवी संवेदनांची गुंफण घालण्याची किमया फक्त भारतीय संस्कृतीच करु शकते. या अधिक मासाची महती, त्याचे अध्यात्मिक- भौतिक आयुष्यात असलेल्या महत्त्वाचा घेतलेला आढावा...
काळाची गती किती विलक्षण असते ना? कधी तो हातातील वाळूसारखा सरसर निसरून जातो, तर कधी एखाद्या संथ नदीसारखा मंद वाहतो. माणसांनी या अथांग काळाला मोजण्यासाठी सेकंद, मिनिटे, तास आणि महिन्यांची कुंपणे घातली. पण चौकटीत धावताना जेव्हा जीव थकतो, तेव्हा निसर्ग आणि आपली संस्कृती एक अतिरिक्त भेट देते. हा हक्काचा विसावा म्हणजे ‘अधिक मास.’ यालाच आपण कधी ‘मलमास’ म्हणून हिणवले, तर कधी ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून डोयावरही घेतले. दर तीन वर्षांनी येणारा हा महिना, केवळ पंचांगातील कोरडे गणित नसून, त्यामागे विज्ञानपरंपराही आहे.
या महिन्यामागचे खगोलशास्त्र समजून घेण्यासारखेच आहे. आपले भारतीय पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोन्हींच्या गतीवर आधारित आहे. सूर्याचे वर्ष साधारण ३६५ दिवसांचे, तर चंद्राचे वर्ष ३५४ दिवसांचे. म्हणजे, दरवर्षी या दोन गणितांमध्ये ११ दिवसांची तफावत निर्माण होते. ही तफावत जर दुरुस्त केली नाही, तर काही वर्षांत पावसाळा उन्हाळ्यात आणि दिवाळी कडक हिवाळ्यात येईल. ऋतूचक्र आणि सणवार यांचा ताळमेळ साधावा, म्हणूनच साधारणपणे दर ३२-३३ महिन्यांनी एक अतिरिक्त महिना पंचांगात समाविष्ट केला गेला, हाच तो अधिक मास. विज्ञानाच्या भाषेत त्याला अधिवर्षमहिना (ङशरि चेपींह) म्हणता येईल.
या महिन्याला एक पौराणिक पार्श्वभूमीही आहे. खगोलशास्त्रानुसार, ज्या महिन्यात सूर्याचे संक्रमण (संक्रांत) होत नाही, तो अधिक मास ठरतो. संक्रांत नाही, म्हणजे कोणतीही मोठी खगोलीय हालचाल नाही, जणू सगळे स्तब्धच. म्हणूनच जुन्या काळात, ज्योतिषशास्त्राने याला शुभकार्यांसाठी वर्ज्य मानले आणि त्याचे नाव पडले ‘मलमास’, अर्थात मलीन, टाकाऊ महिना. पुराणकथेनुसार, जगाने नाकारलेला हा महिना विष्णूंकडे गेला आणि विष्णूंनी त्याला आपले सर्वांत श्रेष्ठ नाव दिले ‘पुरुषोत्तम मास.’
या अतिरिक्त महिन्याला ‘पुरुषोत्तम’ हे बिरुद कसे मिळाले? वास्तवात, ही एका उपेक्षिताच्या गौरवाची गाथा आहे. विष्णूंनी या मासाला दिलेले स्वतःचे नाव म्हणजे, एका वैश्विक न्यायाचेच प्रतीक. ‘ज्याला जग नाकारते, त्याला ईश्वर स्वीकारतो; इतकेच नव्हे तर आपले सान्निध्यही प्रदान करतो,’ हा सुंदर विचार यातून अधोरेखित होतो. हा संदर्भ माणसाला अंतर्मुख करतो. आयुष्यात येणारे अपयश, तत्कालिक नकार किंवा उपेक्षा हे तुमचे अंतिम मूल्य ठरवू शकत नाही. आपण आपले सत्त्व टिकवून ठेवायचे असते; कारण योग्य वेळी काळालाही तुमचे श्रेष्ठत्व मान्य करावेच लागते, हा संदेश पुरुषोत्तम मास देतो. श्री विष्णूचा लाडका असणारा हा महिना, धार्मिक मंडळी श्री विष्णू सहस्रनामाचे नित्य पठण करून साजरा करतात.
या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या लौकिक आणि सामाजिक सोहळ्यांना विश्रांती दिली जाते. हा काळ निसर्गाने अतिशय कौशल्याने निर्माण केलेली एक सुप्त आणि समृद्ध शांतता आहे. लग्नकार्यांची धावपळ, खरेदी किंवा व्यावहारिक ऊठबस या सगळ्या भौतिक कोलाहलात मिळालेली ही रिकामी जागा म्हणजेच, बाह्य जगाकडून अंतर्जगाकडे सहजतेने वळण्यासाठी लाभलेली एक हक्काची सवलत आहे. जसे शरीराच्या आरोग्यासाठी आपण उपवास करतो, तसेच मनाच्या शुद्धीकरणासाठी लाभलेला हा एक आध्यात्मिक विसावा आहे. नामस्मरण, ग्रंथवाचन आणि शांतता यांच्या माध्यमातून स्वतःला पुन्हा सावरत, लौकिक आनंदाकडून अलौकिक समाधानाचा प्रवास पूर्ण करणारी, साक्षात पुरुषोत्तामाच्या अधिष्ठानाने भरलेली एक ऊर्जामयी पर्वणी आहे.
या आत्मिक शुद्धीला आणि आंतरिक अध्यात्माला सामाजिकतेची सुंदर जोड दिली आहे, ती दानाने! या विशेष मासात दीपदान आणि अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते. इथे ‘दान’ म्हणजे केवळ संपत्तीचे प्रदर्शन नाही. तर, आपल्या मनातील ओलावा कृतीत उतरवताना आपल्याकडचे थोडे अधिकचे, समाजातील वंचित घटकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा तो एक सहृद्य प्रयत्न आहे.
अध्यात्माचा हा गंभीर आणि उदात्त विचार, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीने मात्र कमालीच्या लाघवी आणि कौटुंबिक रंगात रंगवला आहे. आपल्याकडे याला ‘धोंड्याचा महिना’ म्हणूनही ओळखले जाते. ‘धोंडा’ म्हणजे दगड, ज्याला सर्वसामान्य लोकभाषेत निष्क्रिय किंवा एका जागी पडून राहिलेला मानले जाते. त्यानुसार, जो महिना संक्रांतीशिवाय असाच संथ आणि सुप्त झाला; त्याला लोकांनी ‘धोंडा’ म्हटले. पण मराठी माणसाचे वैशिष्ट्य असे की, त्याने या निष्क्रियतेच्या कल्पनेतूनही एक नितांत गोड पदार्थ जन्माला घातला. गव्हाचे पीठ, गूळ आणि तूप यांच्या पाकात तळलेला हा सुग्रास पदार्थ म्हणजेच ‘धोंडस’ किंवा ’अनारसा’ होय. भौगोलिक रचनेनुसार काही प्रांतांत हे दोन वेगवेगळे पदार्थ मानले जातात, तर काही ठिकाणी ते एकच समजले जातात; कारण ही सांस्कृतिक परंपरा प्रदेशानुसार बदलत राहते.
या विशेष महिन्यात जावयाला सासूरवाडीला सन्मानाने बोलावण्याची, एक अतिशय लाघवी परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाच्या वेळी वधू-वरांना लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हटले जाते. तद्वतच जावई म्हणजे नारायण, अर्थात साक्षात पुरुषोत्तमाचेच रूप मानले जाते. म्हणूनच, या पुरुषोत्तम मासात त्यांच्या आदरातिथ्याला विशेष मान असतो. या दिवशी चांदीच्या किंवा तांब्याच्या पानात ३३ अनारसे ठेवून, त्यावर दिवा लावून जावयाला ओवाळण्याची प्रथा आहे. या परंपरेतील ‘३३’ या संख्येचे गणितही तितकेच रंजक. खगोलशास्त्रानुसार हा अतिरिक्त महिना साधारणपणे दर ३३व्या महिन्यात पंचांगात जोडला जातो. तर, धार्मिक संकल्पनेत ही संख्या सृष्टीतील ३३ प्रकारच्या दिव्य ऊर्जांचे म्हणजेच, ३३ कोटी देवतांचे प्रतीक मानली जाते. काही प्रांतांत याची ‘३० अधिक ३’ अशी फोड करून, महिन्याचे नेहमीचे ३० दिवस आणि त्रिदेवांचे अधिष्ठान लाभलेले उरलेले तीन दिवस यांच्यातील अद्वैतही साधले जाते. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात, जिथे धावपळीमुळे नात्यांमध्ये सुसंवादाला फारसा वेळ मिळत नाही, तिथे दोन कुटुंबांना विश्वासाच्या आणि आपुलकीच्या धाग्याने एकत्र आणणारा हा एक नितांत सुंदर कौटुंबिक उत्सव आहे.
पुरुषोत्तम मास हा केवळ गणित आणि भूगोलाची सांगड घालण्याचा प्रयास नसून, तो निसर्गाच्या नियमांचा आदर करायला शिकवणारा खगोलशास्त्रीय उपाय आहे. उपेक्षितांना ईश्वराचे अधिक सान्निध्य लाभते, हा अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक धडा आहे. निसर्गाने दिलेला हा जास्तीचा महिना आपण आपल्या आयुष्यात थोडे जास्त प्रेम, थोडी जास्त शांतता आणि थोडा जास्त सुसंवाद जपण्यासाठी वापरणे, हेच या पुरुषोत्तम मासाचे खरे फलित असेल!
आसावरी पाटणकर