पतितपावन मंदिर आणि पूजा प्रशिक्षण वर्ग (अनुसूचित जाती व जनजाती कार्यकर्त्यांसाठी)

    28-May-2026
Total Views |

स्वा. वि. दा. सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना, हिंदू धर्मातील सर्वांना मंदिरप्रवेश, पतित पावन मंदिर स्थापना, 1929 मध्ये मालवण येथील ‘पूर्वास्पृश्य परिषदे’त पूर्वास्पृश्यांना वेदाध्ययन अधिकार व यज्ञोपवित (जानवे) वाटप असे समाजसुधारणेचे कार्य केले होते. आज 21व्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही अनुसूचित जाती व जनजाती समाजातील व्यक्तींसाठी ‘पूजा प्रशिक्षण वर्ग’ आयोजित करण्यात येतात. त्यानिमित्ताने या दोन्ही समाज-क्रांतिकारक कार्याविषयी माहिती देणारा हा लेख...

दुत्व, हिंदुराष्ट्र मांडणारे क्रांतिकारक वि. दा. सावरकर समाज-क्रांतिकारकही होते, हे विसरता कामा नये. ब्रिटिशांची परदेशी शृंखला झुगारून देण्यासाठी झटणारे क्रांतिकारक सावरकर त्याच त्वेषाने ‘वेदोक्तबंदी’, ‘व्यवसायबंदी’, ‘स्पर्शबंदी’, ‘सिंधुबंदी’, ‘शुद्धीबंदी’, ‘रोटीबंदी’ व ‘बेटीबंदी’ या सात स्वदेशी शृंखला तोडण्यासाठीही अविरत झटताना दिसतात. कारण, सावरकर हे कृतिशील विचारवंत होते. त्यामुळे ते केवळ लेखणीद्वारे विचार मांडून थांबले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीद्वारे अस्पृश्यता-निर्मूलनाचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.

पतितपावन मंदिर

पूर्वास्पृश्यांचे मंदिरप्रवेश आंदोलन हाती घेताना घाई न करता, सर्वप्रथम ‘दर्शनाने बाटतो तो देव कसला’ ही भावना जनमानसात दृढ व्हावी म्हणून सावरकरांनी प्रयत्न केले. एप्रिल 1925 मध्ये शिरगावच्या ‘गुरव’ समाजातील एका स्वतंत्र मंदिरात हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सावरकर गेले असता, त्यांनी गुरव बांधवांना अस्पृश्यता निवारणाचे महत्त्व व आवश्यकता पटवून देऊन भजनात पूर्वास्पृश्य बांधवांनाही एकत्र बसवून घेण्याचे मान्य करून घेतले. याप्रसंगी भाषण करताना सावरकर म्हणाले, “अस्पृश्य समजल्या जाणार्‍या हिंदूंस देवाची पूजा करण्याचा इतर हिंदूंप्रमाणेच निसर्गसिद्ध अधिकार आहे. तो त्यास उपभोगू देणे, हा खरा धर्म. देवाच्या पायावर वाटेल त्या हिंदूंस जेव्हा आपले डोके टेकण्याचा अधिकार मिळेल, तेव्हाच त्याला आपल्या धर्माविषयी, समाजाविषयी खरे ममत्व वाटू लागेल.”

यानंतर 1927 साली रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात ‘मिश्र हिंदुमेळा’ घेऊन सावरकरांनी मंदिरप्रवेशाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. नंतर विठ्ठल मंदिराचा गाभाराच पूर्वास्पृश्यांस मुक्त करून देण्यासाठी चर्चा करण्यासाठी दि. 29 नोव्हेंबर 1929 रोजी एक सभा आयोजित केली होती. त्या सभेत आपल्या कोटीक्रमाने आपले म्हणणे सावरकरांनी पटवून देऊन विजय मिळवला आणि कार्तिकी एकादशीला पूर्वास्पृश्यांसाठी श्रीविठ्ठल मंदिर खुले झाले.

मूळचे रत्नागिरीचे श्रीमंत भागोजी शेट कीर हे मुंबईचे सधन व्यावसायिक व शिवभक्त होते. पण, जातीमुळे त्यांना मंदिरात शिवाची पूजा करता येत नव्हती, म्हणून त्यांनी रत्नागिरीच्या किल्ल्यात स्वतःसाठी भागेश्वराचे देऊळ बांधले होते. या मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात महाशिवरात्रीचा उत्सव होत असे. 1928 सालातील या उत्सवाला कीर शेटजींनी सावरकरांना आमंत्रित केले होते. सावरकर त्यांना म्हणाले, “आपण धनाढ्य असल्याने हे शिवमंदिर बांधू शकलात. पण, त्या दीनदुबळ्या अस्पृश्यांचे काय? त्यांना देव नाही, देवालय नाही, देवदर्शनही नाही! अखिल हिंदुमात्रांस देवमूर्तीची पूजा व देवाची प्रार्थना सांघिकपणे, एकत्र समतेने करता यावी, असे एखादे मंदिर आपण बांधून दिलेत; तर सनातन्यांवरील आपला राग मी सार्थ समजेन.” (रत्नागिरी हिंदुसभेचे प्रतिवृत - खंड 2, प्रकाशक - डॉ. म. ग. शिंदे, 1937, पृष्ठ. 11)
याच भागोजी शेट कीर यांच्या आर्थिक सहकार्याने आणि सावरकरांच्या पुढाकाराने पतितपावन मंदिराच्या पायाची कोनशिला दि. 10 मार्च 1929 रोजी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या उपस्थितीत बसविली गेली. याप्रसंगी सावरकर म्हणाले, “वास्तविक काशी विश्वेश्वर, जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वर आदी सर्व मंदिरे सर्व हिंदूंना ठरावीक नियमांनी दर्शनासाठी मुक्त असली पाहिजेत. जन्मजात जातिभेदामुळे कोणाही हिंदूला मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध असू नये. पण, हे तत्त्व जोवर समाजाला मान्य होत नाही, तोवर तरी निदान सर्व हिंदूंना मुक्तद्वार असलेले एक मंदिर बांधावे, अशी कल्पना माझ्या मनात होती.”

1931 साली सर्व हिंदूंना खुले व ज्याच्या न्यासावर पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींचे पुढारी असतील असे ‘पतितपावन मंदिर’ स्थापन झाले. जुन्या देवळाचा प्रश्न नव्या देवळातील सांघिक पूजेच्या सवयीने अधिक लवकर सुटेल, हे जाणूनच पतितपावन मंदिर बांधण्यात आले होते. (समग्र सावरकर वाङ्मय - खंड 3, पृष्ठ 492 व मोरे, शेषराव, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग, राजहंस प्रकाशन, दुसरी आवृत्ती, 2010, पृष्ठ क्र. 173)

पतितपावन मंदिरात महार, चांभार, भंगी समाजातील मुलांना काही संस्कृत मंत्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मुलांसह शिकवून, या सर्व मुलांकरवी त्या वेदोक्त मंत्रांच्या सामुदायिक उद्घोषात श्रीविष्णूच्या मूर्तीवर ‘अखिल हिंदू वेदोक्त अभिषेक’ उत्सवप्रसंगी केला जाई. पूर्वास्पृश्यांसहित सकल हिंदू बांधवांना थेट गाभार्‍यात जाण्याची मुभा देणारे भारतातील प्रथम मंदिर म्हणजे हे ‘पतितपावन मंदिर’ होय. ‘पूजा करता येईल तो पुरोहित’ या तत्त्वाने ‘वेदोक्तबंदी’ मोडीत निघाली.

महाराष्ट्रातील स्त्रियांचे पाहिले सहभोजन दि. 21 सप्टेंबर 1931 रोजी या पतितपावन मंदिरात झाले. या पहिल्या सहभोजनास 75 स्त्रिया उपस्थित होत्या. यानंतर पाचच वर्षांत, म्हणजे 1936च्या गणेशोत्सवातील स्त्रियांच्या सहभोजनातील संख्या 400 पर्यंत वाढली होती. सावरकरांनी दि. 1 मे 1933 रोजी पतित मंदिराच्या आवारात सर्वांना मुक्त असलेले ‘अखिल हिंदू उपाहारगृह’ सुरू केले. येथे पूर्वास्पृश्य पदार्थवाटपाचे काम करत व सावरकर त्यांना भेटायला येणार्‍या व्यक्तीस आधी उपाहारगृहात जाऊन चहा पिऊन येण्याची अट घालत. या सहभोजन नि अखिल हिंदू उपाहारगृहामुळे ‘रोटीबंदी’ची बेडी तुटली. सावरकरांनी आपली पत्नी माई म्हणजे, यमुना सावरकरांकरवी पूर्वास्पृश्य स्त्रियांसाठी हळदी-कुंकू समारंभही घडवून आणले.

शिवू भंग्याला कीर्तन करायला लावून त्याच्या पायांवर ब्राह्मणादिकांनी डोके ठेवण्याच्या घटनेची दखल तर दि. 30 सप्टेंबर 1931च्या ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने घेतली होती. त्यातील वृत्तांत असा- “रत्नागिरी येथे वीर सावरकरनिर्मित पतितपावन मंदिरात भंगी जातीच्या बुवांनी कीर्तन करावयाचे व उच्चवर्णी हिंदूंनी त्यांचे गळ्यात हार घालून त्यांचे पायावर डोके ठेवायचे, ही आजवर कधीही न पडलेली प्रथा पाडून सावरकरांनी महान क्रांती केली आहे.”

त्यावेळी गायत्री मंत्र नि वेदमंत्र हे अधिकार ब्राह्मणांपुरतेच मर्यादित होते. मंदिराच्याच प्रांगणात काम सुरू असताना सावरकरांनी 1930 साली ‘अखिल हिंदू गणेशोत्सव’ सुरू केला होता. याच अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी हिंदूने गायत्री मंत्र नि वेदमंत्र म्हटले, या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते. (कीर, धनंजय, अनुवाद : द. पां. खांबेटे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, तिसरी आवृत्ती, 2009, पृष्ठ. क्र. 196)

पूजा प्रशिक्षण वर्ग (अनुसूचित जाती व जनजाती कार्यकर्त्यांसाठी)
पूजा प्रशिक्षणाची गरज

अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती क्षेत्रातील हिंदूंना बारसे, सत्यनारायण पूजा, मुहूर्त पाहणे, लग्नविधी, अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व इतर धार्मिक विधींसाठी पुरोहित उपलब्ध होत नसल्यामुळे लोक हिंदू संस्कृती व संस्कार विसरत चालले आहेत. या गोष्टीचा फायदा अन्य पंथांचे धर्मप्रसारक घेत आहेत व हिंदूंचे धर्मांतर खूप मोठ्या प्रमाणात करीत आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पूजा प्रशिक्षण देऊन हिंदू संस्कारांचे दृढीकरण करावे, असा विचार ‘धर्मजागरण समन्वय समिती’ समोर आला. या उपक्रमामुळे ब्राह्मणेतर समाजदेखील पूजाविधी सांगू शकेल व त्यामुळे समाजात समरसता निर्माण होईल व समाज एकसंध होईल, असा विचार ‘धर्मजागरण समन्वय समिती’ने केला. अशाप्रकारचे कार्य शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या ध्येय-धोरणांशी सुसंगत असल्याने ‘शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी न्यासा’ने पूजा प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

पूजा प्रशिक्षणाचे सामाजिक महत्त्व

ज्या नाशिक शहरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरप्रवेशासाठी आंदोलन केले होते; पण दुर्दैवाने तत्कालीन समाजाने त्यांना मंदिरप्रवेश दिला नाही. त्या शहरांमध्ये आता अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती समाजातील युवकांना पूजा प्रशिक्षण दिले जात आहे, ही निश्चितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेबांचा आंदोलन करण्यामागचा उद्देश सफल करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘धर्मजागरण समन्वय समिती’ व ‘शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी धर्मजागरण पीठ’ यांच्या समन्वयाने होत आहे, ही समस्त भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आता तर त्याही पुढची स्थिती म्हणजे, मंदिरात प्रवेश कोणाला द्यायचा, हे ठरवणार्‍या पुजार्‍यांच्या जागीच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती समाजाला स्थान मिळू लागले आहे व त्या समाजातून नवनवीन युवक पुढे येऊन पूजा प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेत झालेला हा बदल निश्चितच आनंददायी आहे. विविध संस्कारांसाठी आवश्यक असे कुशल पुजारी घडवण्यासाठी ‘डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ व ‘धर्मजागरण समन्वय समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 12 वर्षांपासून नाशिक येथे पूजा प्रशिक्षण वर्ग चालवला जात आहे.

पूजा प्रशिक्षण अभ्यासक्रम

पूजा प्रशिक्षण वर्गात पंचांग परिचय, पंचांग वाचन, संस्कृत संभाषण, सर्व देवपूजा जसे की- गणपती, सत्यनारायण पूजा, कलशपूजन, नवग्रह पूजा, नामकरण संस्कार, विवाहविधी इथपासून ते थेट अंत्येष्टी कर्मापर्यंतचे विधी या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. वर्गाच्या शेवटी ‘नवग्रह स्तोत्र’ पूर्ण पाठ होईल, असे पाहिले जाते. प्रशिक्षणार्थी भोजन कसे करतात, भोजनापूर्वी म्हणावयाचे स्तोत्र, गणेशस्तोत्र अशा मूलभूत संस्कारांचे धडे तर गिरवतातच; पण त्याचबरोबर त्यांच्या हस्ते काळाराम मंदिराच्या सभामंडपात आरतीदेखील करण्यात येते. बालाजी मंदिरात गाभार्‍यात जाऊन देवाला तुळशीपत्र वाहण्याचे भाग्यसुद्धा प्रशिक्षणार्थींना लाभते.

मातृशक्तीचा सहभाग

सर्व मंत्र संस्कृतमध्ये असल्यामुळे संस्कृत उच्चार व पाठांतर करणे, हे एक मोठे आव्हानच. संस्कृत उच्चार व पाठांतर करून घेण्यासाठी महिला पुरोहितांचे मोठे योगदान असते. विद्यार्थ्यांचे तीन-चार गट करून उच्चारणाची स्पष्टता करून घेतली जाते. सुरुवातीपासूनच महिला पुरोहित विभाग प्रशिक्षण वर्गासाठी खूप चांगले सहकार्य करत आहे. महिला चार-चारच्या गटांनी येतात, या वर्गामध्ये 15 ते 20 महिलांचा सहभाग असतो. पुरोहित महिला काही अवघड संस्कृत शब्द विद्यार्थ्यांकडून दहा-दहा वेळा घोकून घेतात. सर्वच गुरुजन कोणताही मोबदला न घेता निःस्वार्थपणे सर्व विद्यार्थ्यांना पूजा कशी करायची, याचे प्रत्यक्ष धडे देतात.

पूजा प्रात्यक्षिक पूजक प्रतिज्ञा

सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सर्व शिक्षार्थी प्रातःकाळी सूर्याला व अग्नीला साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करतात की, “मी माझ्या पूजा ज्ञानाचा उपयोग केवळ यश व अर्थप्राप्तीसाठी न करता, सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करीन. स्वतःची कामे व विश्रांती यांपेक्षा धर्मकृत्यसेवेस नेहमीच प्राधान्य देईन. स्वार्थ व अर्थलाभासाठी कधीही समाजाचे अहित करणार नाही. अनैतिक वर्तनापासून दूर राहीन. माझ्या समाजातील कोणीही परधर्माचा, परमताचा आश्रय करणार नाही, याची जबाबदारी मी घेईन. हिंदू धर्मपरंपरांचे रक्षण व सर्व समाजाचे कल्याण, हे माझे ध्येय असेल.”

पूजा प्रशिक्षण वर्गाचे सातत्य

वर्ष 2012 पासून पूजा प्रशिक्षण वर्ग सातत्याने चालू आहेत. वर्ष 2026 पर्यंत महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील 58 अनुसूचित जाती व जनजाती समाजातील 459 विद्यार्थ्यांनी पूजा प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी धर्मजागरण पीठ’ प्रशस्तिपत्र सन्मानपूर्वक प्रदान करते.

पूजा प्रशिक्षण वर्गाची समाजातील उपयोगिता -

पूजा प्रशिक्षण घेतलेले पुष्कळसे शिक्षार्थी आपापल्या भौगोलिक क्षेत्रात पूजाविधी सांगण्याचे कार्य करत आहेत आणि हिंदू संस्कार व संस्कृती वृद्धिंगत करण्याचे काम अखंडपणे करत आहेत.

- विजय कुलकर्णी