नव्या युगाचे नवे कौशल्य : स्वप्न ‘विकसित महाराष्ट्रा’चे!

    28-May-2026
Total Views |
Developed Maharashtra Skill Vision
 
आज महाराष्ट्र केवळ देशातील इतर राज्यांशी नव्हे, तर जगातील विकसित अर्थव्यवस्थांशीही स्पर्धा करीत आहे. मात्र, ‘विकसित महाराष्ट्रा’चे उद्दिष्ट साध्य करताना, केवळ नवीन रोजगारांची निर्मिती करणे पुरेसे नाही, तर उद्योगांची प्रत्यक्ष गरज आणि युवकांचे कौशल्य यांमधील तफावत दूर करणे, हे देखील राज्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एमजीएस २०३५ - महाराष्ट्र ग्रोथ अ‍ॅसेलरेटर’ या कार्यक्रमात राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकतामंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तिसर्‍या सत्रात ‘कौशल्य विकासातून महाराष्ट्राचे विकास मॉडेल’ या विषयावरील ‘व्हिजन’ उपस्थितांसमोर मांडले. ‘विवेक पार्क फाऊंडेशन’च्या महाराष्ट्र विभागप्रमुख मुग्धा महाबळ यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश...
 
महाराष्ट्राची २०३५ मधील अमृतमहोत्सवी वर्षाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. तेव्हा, आगामी नऊ-दहा वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे स्थान अव्वल दर्जाचे करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाची भूमिका नेमकी काय असेल? तसेच हे उद्दिष्ट गाठताना सध्या विभागासमोर कोणती मुख्य आव्हाने आहेत? आणि त्यावर कशी मात केली जात आहे?
 
महाराष्ट्राची पुढील दहा वर्षांतील वाटचाल कशी असेल, याचे ५१ टक्के काम आजच पूर्ण झाले आहे, असे आत्मविश्वासाने म्हणता येईल. कारण, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि प्रभावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मी कुठेही जाणार नाही, महाराष्ट्रातच राहून काम करणार आहे’ असे सांगितल्याने महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत निश्चिंत राहण्यास हरकत नाही. येत्या दशकात महाराष्ट्र अधिक वेगाने प्रगतिपथावर जाईल, याची खात्री वाटते. आज महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. राज्यात वेगाने उभे राहत असलेले आधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प, उद्योगस्नेही वातावरण आणि गुंतवणुकीसाठी सरकारकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. उद्योग, व्यापार आणि विकासासाठी आवश्यक असलेला सहभाग, सहकार्य आणि सुविधा महाराष्ट्रात अत्यंत उत्कृष्ट पातळीवर उपलब्ध आहेत. देशात किंवा विदेशात कोणालाही विचारले, तर गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून महाराष्ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
 
कौशल्य विकासाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि आगामी काळात ही आघाडी आणखी मजबूत होणार आहे. या यशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. सध्या राज्यात सुरू असलेली पायाभूत विकासाची कामे पुढील अनेक वर्षांसाठी महाराष्ट्राच्या प्रगतीचा मजबूत पाया ठरणार आहेत. ‘विकसित महाराष्ट्र’ हे केवळ घोषवाय किंवा वर्तमानपत्रांपुरते मर्यादित लक्ष्य नाही. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दैनंदिन कामकाजाकडे पाहिले, तर त्यांच्या बहुतांश बैठका या राजकारणापेक्षा विकासाभोवती केंद्रित असतात. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, कौशल्य वृद्धी, सिंचन व्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि उद्योगवाढ यांसारख्या विषयांवर ते तासन्तास चर्चा करतात. निर्णय घेण्यापूर्वी विविध घटकांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यानंतर घेतलेले निर्णय मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलेले दिसतात.
 
दहा वर्षांनंतर महाराष्ट्र देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही कौशल्य, उद्योग, अर्थव्यवस्था आणि विकासाच्या क्षेत्रांत अग्रस्थानी असेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्टपणे सांगितले होते की, महाराष्ट्राची स्पर्धा आता केवळ इतर राज्यांशी नाही; तर जगातील विकसित अर्थव्यवस्थांशी आहे. महाराष्ट्र आज स्वतंत्र अर्थव्यवस्था म्हणून पाहिला, तर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल आता जागतिक स्तरावरील स्पर्धेकडे सुरू झाली आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ हे स्वप्न केवळ सरकारचे नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील आकांक्षा आहे आणि हे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास आज निर्माण झाला आहे.
 
‘कौशल्य विकास विभागा’अंतर्गत युवकांना दिले जाणारे प्रशिक्षण आणि उद्योगांची प्रत्यक्ष गरज, यामध्ये अनेकदा मोठी तफावत दिसून येते. हा फरक दूर करण्यासाठी एका भक्कम आणि एकात्मिक परिसंस्थेची अत्यंत गरज आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ‘कौशल्य विकास विभाग’ नेमके कशा प्रकारे योगदान देण्याचे नियोजन करत आहे?
 
जे कौशल्य उपलब्ध आहे आणि ज्या नोकर्‍या उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये एक मोठी तफावत आहे. या तफावतीमध्ये मोठी समस्या आहेच. पण, त्याहूनही मोठी समस्या विचारांची आहे आणि त्याहूनही मोठी समस्या ‘दृष्टिकोना’ची आहे. नोकर्‍या नाहीत का? तर आज जितके उद्योगपती आहेत त्यांना विचारून बघा. असा एकही नसेल, ज्याला माणसांची गरज नाही. सर्वांना नवीन लोकांची गरज आहे. सर्वांकडे ‘एचआर’ विभाग आहे. सर्वांकडे जागा रिकाम्या आहेत. सगळेजण माणसांचा शोध घेत असतात. ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू अशी आहे की, भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे आणि महाराष्ट्र हे भारताचे सर्वांत तरुण राज्य आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्या महाराष्ट्रात आहे आणि इतकी मुले इथे शिकून-सवरून तयार बसली आहेत.
त्यांच्याकडे पूर्णवेळ नोकरी नाही. मग ही तफावत कशी भरून काढली जाते? ज्याला कर्मचारी हवा असतो, तो जाहिरात देतो, ‘एचआर’ला कामाला लावतो, ‘रिक्रूटमेंट एजन्सी’शी संपर्क साधतो आणि नोकरी मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. ५० लोकांची गरज असेल, तर ५०० लोक मुलाखतीसाठी येतात. पण, यात आपले महाराष्ट्रातील लोक बेरोजगार का आहेत? त्याचे कारण असे आहे की, कोणी बिहारचा, कोणी मध्य प्रदेशचा, कोणी छत्तीसगढचा, कोणी झारखंडचा; तर कोणी राजस्थानचा माणूस इथे येतो आणि नोकरी घेऊन जातो. इथपर्यंत तरी आपल्याला मान्य होते. पण, आता परिस्थिती याच्याही दोन पावले पुढे गेली आहे. तुम्ही ‘झोमॅटो’ घ्या, वाहनचालकांची कामे घ्या, काही प्रमाणात अगदी ‘जिम इन्स्ट्रटर्स’ घ्या, हे केस कापणारे घ्या, जे आपले मासे विकणारे किंवा भाजी विकणारे लोक होते, त्यांना मोजा. यांची संख्या अमर्याद आहे.
 
त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती अत्यंत ‘विस्फोटक’ आहे आणि यासाठी जिथे ‘कौशल्याची तफावत’ भरून काढण्याची गरज आहे, त्याचसोबत आपल्या मुलांची नोकरीप्रति ‘मानसिकता’ तयार करण्याचीही गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न एक संस्था आहे, जी पुण्यात काम करते. जी गेल्या सात-आठ वर्षांपासून पुण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीत, चाळीत जाऊन तिथल्या मुलांना सांगते की, तुमच्यासाठी नोकरी करणे का गरजेचे आहे. ती त्यांना केवळ मानसिक पातळीवर तयार करते की, तुम्ही नोकरीसाठी स्वतःला तयार करा. कौशल्य मिळवणे ही फार मोठी गोष्ट नाही. नोकरी मिळणे ही खूप मोठी समस्या नाही. सर्वांत मोठी समस्या दृष्टिकोन आणि ती नोकरी स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी ही आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे, भारतामध्ये श्रमाला फारसा सन्मान नाही. आपण लंडन किंवा अमेरिकेला जेव्हा जातो, तेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवत असू, तिथे शेजारी दोन लोक येऊन बसतात, ते गाडीतून उतरतात. तुम्ही त्यांना पाहता, ते गाडीतून उतरत आहेत, त्यांच्या कपड्यांना चुना लागलेला असतो, सिमेंट लागलेले असते. ते तुमच्या शेजारी बसून ‘फर्स्ट लास’ ऑर्डर देतात, टिपदेखील ठेवतात आणि गाडीत बसून निघून जातात. तुम्हाला ते अस्वाभाविक वाटत नाही. पण, आपल्या इथे असे काही घडले; तर आपल्या मनात येते की, हे कसले हॉटेल आहे? या हॉटेलचा दर्जा काय राहिलाय? हा आहे आपला कामगारांबद्दलचा, श्रमाबद्दलचा दृष्टिकोन.
त्यामुळे जोपर्यंत मेहनत करणार्‍यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलणार नाही, तोपर्यंत आपली मुले ते मेहनतीचे काम करणार नाहीत. हा जो ‘व्हाईट कॉलर जॉब’ आणि ‘ब्लू कॉलर जॉब’ यांच्यातील वाद आहे, तो तेव्हाच संपेल; जेव्हा समाज प्रत्येक मेहनत करणार्‍या व्यक्तीला त्याचा योग्य तो मान-सन्मान देईल, जो जगातील इतर ठिकाणी दिला जातो आणि जसा तो दिला जाऊ लागेल, तसा हा फरक मिटेल.
 
दुसरी गोष्ट म्हणजे, महिलांचा विषय. जिथे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे, तिथे महिलांना नोकरीसाठी पंतप्रधान मोदी आता ३५ टक्के आरक्षण करत आहेत. बाकीच्या ठिकाणी महिला नोकरीसाठी फारशा बाहेर पडत नाहीत आणि म्हणूनच, कौशल्याची तफावत भरून काढण्यासोबतच, कल (Aptitude) आणि दृष्टिकोन (Attitude) विकसित करणेही गरजेचे आहे. जेव्हा आपण या सर्व गोष्टी एकत्र करू, तेव्हाच आपण कौशल्याच्या क्षेत्रात अधिक चांगले काम करू शकू.
 
आगामी दहा वर्षांचा विचार करता, कोणत्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण होतील, असे आपल्याला वाटते? आजच्या तरुणांनी मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी त्यांनी आतापासूनच कोणते कौशल्य संच आत्मसात करणे गरजेचे आहे, याबद्दल आपले काय मत आहे?
 
मुंबईच्या आसपास सध्या जे काही सुरू आहे, त्यावरून आपण समजू शकतो की, सौरऊर्जेचे क्षेत्र खूप मोठे होणार आहे. इलेट्रिक वाहनांचे क्षेत्र खूप मोठे होईल. ‘डेटा सेंटर’चे काम मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ लोकांच्या कामाची गरज भासत आहे. असेच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गेटवे ऑफ इंडिया येथील एका कार्यक्रमातील भाषण मी ऐकत होतो. त्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली की, मी सात-आठ वर्षांपूर्वी एका मासिकात एक लेख वाचत होतो. त्या लेखात लिहिले होते की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगातील २६ कोटी नोकर्‍या जाणार आहेत. पण, त्याच्या पुढच्याच पानावरील लेखात असेही लिहिले होते की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे अर्थव्यवस्थेत जे बदल होतील, त्यातून जगात २८ कोटी नवीन नोकर्‍या निर्माण होतील. याचा अर्थ असा की, जेव्हा कधी कोणताही मोठा बदल होतो, तेव्हा जुन्या नोकर्‍या नक्कीच जातात. पण, त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या संख्येने नवीन नोकर्‍या निर्माण होतात. तुम्ही कल्पना करा, जेव्हा सुरुवातीला गाड्या आल्या, त्याआधी काय होते? लोक टांग्यातून, स्टीमरमधून किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे. गाड्या आल्यावर त्या सर्वांचे रोजगार गेले, हे खरे आहे. पण, गाड्या आणि ट्रस आल्यामुळे अर्थव्यवस्थेत किती मोठा आणि सकारात्मक बदल झाला. त्याचप्रमाणे, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे ज्या नवीन नोकर्‍या निर्माण होणार आहेत, त्यांची संख्या खूपखूप मोठी असेल. आपली मुले या बदलांना स्वीकारण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळे भविष्यात जे काही नवे बदल समोर दिसत आहेत, त्यासाठी जर आपल्या मुलांनी आजपासूनच स्वतःला तयार केले, तर दीर्घकाळात आपला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही.
 
आपण जेव्हा मुंबई आणि परिसरातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ किंवा सौरऊर्जेसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाबद्दल बोलतो, तेव्हा तिथे अनेक प्रशिक्षण संस्था कार्यरत दिसतात. परंतु, मुंबई-पुणे-नाशिक पट्टा, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विकसित भागांच्या तुलनेत महाराष्ट्रातील इतर दुर्गम किंवा ग्रामीण भागांमध्ये ही आधुनिक कौशल्ये अजूनही पोहोचलेली नाहीत. उदाहरणार्थ, नंदुरबार, धाराशिव, अहिल्यानगर, गडचिरोली किंवा गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अद्याप ‘एआय’ किंवा ‘सौरऊर्जा’ क्षेत्रातील कौशल्यांचा विकास त्या प्रमाणात झालेला दिसत नाही. हा प्रादेशिक असमतोल दूर करून राज्यातील प्रत्येक भागातील तरुणांना रोजगाराच्या समान संधी देण्यासाठी आपली काय भूमिका आहे? हा प्रादेशिक समतोल राखण्यासाठी सरकार किंवा तुमचा विभाग नेमके काय प्रयत्न करत आहे?
 
प्रादेशिक समतोलाचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात, तो खराच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास विभागाला जे काही मार्गदर्शन केले आहे, त्यानुसार दोन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून आम्ही यात पूर्णपणे यशस्वी झालेलो नाही. पहिली गोष्ट म्हणजे, आम्ही ७० टक्के जुने कोर्सेस बंद केले आहेत आणि सर्व नवीन प्रगत कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, सौरऊर्जा, ‘ईव्ही’ तंत्रज्ञ, ड्रोन आणि इतर अनेक कोर्सेसचा समावेश आहे. प्रत्येक भागाच्या स्थानिक गरजेनुसार, आम्ही हे नवीन कोर्सेस सुरू केले आहेत. पण, फक्त एवढ्यानेच गोष्ट संपत नाही. कारण, प्रत्येक माणसाला नोकरीच करायची असते, असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे आपल्या मनात नेहमीच एक अभिमानाची भावना असते. म्हणूनच, आपण नेहमी असा विचार करतो की- ‘कमी कमवू, पण स्वतःचे काहीतरी करू!’ हा विचार खूप चांगला आहे आणि तसा तो असायलाच हवा. त्यामुळेच आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीएम महाफंड’ नावाची एक नवीन योजना सुरू करत आहोत. तशी ही योजना दि. १ जूनपासून सुरु होणार होती. पण, तिला थोडा उशीर झाला आहे. या योजनेअंतर्गत आम्ही महाराष्ट्रातील ३५ लाख मुलांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊ आणि त्यातून पाच लाख मुलांची निवड केली जाईल. या निवडलेल्या मुलांना आम्ही पाच लाखांपर्यंतचे कर्ज अवघ्या तीन टक्के व्याजदराने उपलब्ध करून देणार आहोत. पैशांचे फार मोठे मूल्य नाही, कर्ज आजकाल सगळीकडे मिळून जाते. पण, या कर्जासोबत आम्ही त्यांना पूर्ण ‘मार्गदर्शन’देखील देणार आहोत.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुयामध्ये आमची एक ‘आयटीआय’ आहे. अशा एकूण ४१८ ‘आयटीआय’ आमच्याकडे आहेत. या ‘आयटीआय’मध्ये आम्ही स्थानिक लोकांचा एक ‘मेंटॉर ग्रुप’ तयार केला आहे आणि तिथेच आम्ही त्यांना एक केंद्र बनवून देत आहोत, जिथे येऊन ते स्वतःचे काम शिकू शकतील आणि करू शकतील. कारण, प्रत्येकाच्या घरात एवढी जागा नसते की, त्यांनी काही विकसित करायचे ठरवले, तर ते करू शकतील.
 
यासोबतच, प्रादेशिक समतोलाचा जो तुमचा प्रश्न होता, त्यासाठी आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक भागाचा ‘कोटा’ निश्चित केला आहे. समजा, बुलढाण्याच्या एखाद्या ग्रामीण भागातील ‘आयटीआय’मध्ये २१२चा ‘कोटा’ असेल आणि तिथे फक्त १७ मुले आली; तर ती उर्वरित जागा तशीच रिकामी राहील; ती दुसर्‍या कोणाला दिली जाणार नाही, जोपर्यंत तिथली स्थानिक मुले येत नाहीत. यासाठी आम्ही अनेक प्रकारची तयारी केली आहे.
 
एकदा ही योजना पूर्णपणे लागू झाली की, पुढील पाच वर्षांत याचे चांगले परिणाम दिसतील. तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहे की- लहान गावे, छोट्या जागा किंवा जे आदिवासी भाग आहेत, तिथे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तर लांबची गोष्ट राहिली, अजून कौशल्याचा सुगंधही पोहोचलेला नाही. त्यांना अजून कौशल्याची गरजही माहीत नाही. इथे आम्ही कमी पडलो आहोत, आम्ही हरलो आहोत की, आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण, आता आम्ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न करीत आहोत की, प्रत्येक गावातील ज्या मुलाला काम करायचे आहे, त्याला पायाभूत सुविधा आम्ही तयार करून देऊ. येत्या काळात अधिक आकडेवारीसह याचे उत्तर मी नक्की देऊ शकेन.
 
बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या घुसखोरांविरोधात आपण सातत्याने आवाज उठवत आहात. गोराई परिसरातील अतिक्रमणांवर करण्यात आलेली कारवाई असो किंवा प्रशासनाला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडणे असो, आपल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. राज्य सरकार, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांकडून आता ठोस निर्णय घेतले जात आहेत. नुकत्याच वांद्रे परिसरात घडलेल्या घटनांमधूनही हीच भूमिका स्पष्टपणे दिसून आली. यालाच आपण ‘मालवणी पॅटर्न’ असे म्हणू शकतो का? आणि अशी कठोर भूमिका घेण्याची गरज नेमकी का भासली?
 
माझ्या लहानपणी राजस्थानातील जोधपूर येथे माझे वडील निवडणूक लढवत असत. त्यावेळी तेथील मुख्यमंत्री बरकतउल्ला खान होते आणि त्यांच्याविरोधात आमचे वडील निवडणूक लढत होते. मी त्यावेळी खूप लहान होतो. पण, निवडणुकीच्या वातावरणात कायम सहभागी असायचो. एकदा बरकतउल्ला खान अवघ्या २०० मतांच्या फरकाने जिंकले. पुढच्या वेळी त्यांनी त्यांच्या भावाला, लियाकतउल्ला खान यांना निवडणुकीत उभे केले. त्या काळात प्रत्येक निवडणुकीत हिंदू-मुस्लीम असा मुद्दा असायचा, दंगली व्हायच्या आणि त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. माझ्या मनावर एक घटना कायमची कोरली गेली. माझे वडील वकील होते. त्याकाळी वकिलांकडे ‘मुंशी’ म्हणून एकजण असायचे. आज जसे साहाय्यक असतात, तसेच ते कार्यालयाचे सर्व काम पाहायचे. वडील निवडणुकीसाठी प्रचाराला निघाले होते. रात्री सुमारे ९ वाजता तो मुंशी उभा राहिला आणि म्हणाला, "आपण आता जा. उद्या माझ्या मोहल्ल्यात तुमचा दौरा आहे.” माझे वडील म्हणाले, "हो, मी तुझ्या घरीच चहा प्यायला येईन.” त्यावर त्याने उत्तर दिले, "तुम्ही आमच्या मोहल्ल्यात या. पण, एक विनंती आहे, कृपया माझ्या घरी येऊ नका.” वडिलांनी विचारले, "का?” त्यावर तो म्हणाला, "तुम्ही माझ्या घरी आलात, तर पुढे माझा मोहल्ला माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहील.” नंतर त्याने माझ्या वडिलांना स्पष्ट सांगितले की, "मी तुम्हाला मत देणार नाही.” ही गोष्ट माझ्या मनात कायमची घर करून राहिली. जो माणूस आयुष्यभर आपल्या कुटुंबासोबत राहतो, तोसुद्धा मतदानाच्या वेळी धार्मिक दृष्टिकोनातून विचार करतो, हे मला तेव्हा प्रकर्षाने जाणवले. म्हणूनच, मला प्रश्न पडतो की, आपण बांगलादेशींना इतके डोयावर का घेतो? मालवणीमध्ये नुकतीच एका हिंदू महिलेच्या घरासमोर बेकायदेशीरपणे भिंत उभी करण्यात आली आणि स्थानिक आमदाराच्या मुलाने तिचे उद्घाटन केले, असा आरोप करण्यात आला. अशा प्रकारच्या घटना एक-दोन नाहीत; तर शेकडो आहेत, असा दावा केला जातो. हिंदूंना त्यांच्या भागातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचेही काही जणांचे मत आहे. पाकिस्तान तुमचा झाला आहे; दादागिरी करायची असेल, तर तिथे जाऊन करा. हिंदुस्तान आमचा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे!
 
या देशाचे नाव ‘हिंदुस्तान’ आहे आणि इथे येऊन जर तुम्ही दादागिरी कराल आणि दादागिरी केल्यानंतर म्हणाल की, ममतादीदींनी आम्हाला तिथे पासपोर्ट आणि आधारकार्ड उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे आम्ही भारताचे नागरिक आहोत; तर हे चालणार नाही. भारताचा जो मूळ नागरिक असेल, तो भारतात राहील. रोहिंग्या, बांगलादेशी मग ते कितीही लाल, पिवळे, काळे कपडे घालून आले, तरी त्यांना कधी ना कधी परत जावेच लागेल. कारण, आता हा अशा लोकांचा देश राहिलेला नाही, ज्यांना यांचे मत हवे आहे. आता हा अशा लोकांचा देश आहे, ज्यांना राम मंदिर हवे आहे, ज्यांना आझाद काश्मीर हवे आहे, ज्यांना भारतामध्ये प्रत्येक नागरिकासाठी स्वातंत्र्य हवे आहे, ज्यांना भारतीयांना राहण्यासाठी भारतीयतेची पद्धत हवी आहे.
त्यामुळे बांगलादेशींना हाकलून लावण्याचे जे काम मालवणीमध्ये सुरू झाले होते, ते हळूहळू सर्व लोकांनी मिळून, एका सामान्य माणसाने उभे राहून पूर्ण मुंबईभर सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी विशेष समिती बनवली आहे आणि मला विश्वास आहे की, जर इथे राहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावे लागेल आणि भारतामध्ये आता हे निश्चित झाले आहे की, जो हिंदू हित किंवा हिंदूची गोष्ट करेल, तोच देशावर राज करेल.
 
‘हिंदू’ म्हणणे हे जातीयवादी नाही, ‘हिंदू’ म्हणणे धार्मिक नाही. कारण, ‘हिंदू’ ही या देशाची संस्कृती आहे. हा भारत हिंदुस्तानापासून बनला आहे आणि पुढेही राहील. कितीतरी लोक आले आणि गेले. पण, ते भारताला ना धक्का लावू शकले, ना कमजोर करू शकले. आपल्याला जखमी नक्कीच केले. पण, त्यानंतर आपण स्वतःच्या जखमांवर पाय देऊन पुन्हा उभे राहिलो. आपण मजबुतीने उभे आहोत आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील ‘विश्वगुरू’ बनण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत.
 
(शब्दांकन : ओंकार मुळ्ये)