गोरेगावमध्ये उघड्यावर बकरी कुर्बानीला विरोध, शिवडीत अवैधरित्या ठेवलेल्या ४५ बकऱ्यांवर पालिकेची कारवाई

    28-May-2026
Total Views |
Goregaon Bakri Eid Protest 
 
मुंबई : (Goregaon Bakri Eid Protest) गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरात उघड्यावर बकरी कुर्बानीस परवानगी देण्यास विरोध सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक ५२ च्या नगरसेविका प्रीती साटम यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी कुर्बानीस परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिवडी येथील नेपोरेल टॉवरमध्ये अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या ४५ बकऱ्यांवर पालिकेने मोठी कारवाई करत त्यांना जप्त केले.(Goregaon Bakri Eid Protest)
 
नगरसेविका प्रीती मनोज साटम यांनी पी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरेगाव पूर्व येथील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील आझाद नगर डी-३ इमारत परिसरात उघड्यावर बकरी कुर्बानीस परवानगी देऊ नये. त्यांनी सांगितले की, पालिकेच्या विद्यमान धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी पशुवध करताना स्वच्छता, आरोग्य सुरक्षा, वाहतूक व्यवस्था तसेच शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांची संवेदनशीलता लक्षात घेणे आवश्यक आहे.(Goregaon Bakri Eid Protest)
 
संबंधित परिसरात शाळा आणि धार्मिक स्थळे असल्याने उघड्यावर कुर्बानी झाल्यास दुर्गंधी, अस्वच्छता, रोगराई पसरण्याचा धोका तसेच स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि सामाजिक सलोख्यावरही परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने संबंधित परवानगी रद्द केली होती, अशी माहितीही साटम यांनी दिली.(Goregaon Bakri Eid Protest)
 
दरम्यान, शिवडी येथे अवैधरित्या ठेवलेल्या बकऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांना मिळालेल्या निनावी तक्रारीच्या आधारे पालिका आणि रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीत संबंधित परिसरात सुमारे ४५ बकऱ्या विनापरवाना ठेवण्यात आल्याचे तसेच त्यांच्यासाठी बेकायदा तात्पुरते शेड उभारण्यात आल्याचे आढळून आले.(Goregaon Bakri Eid Protest)
 
यानंतर पालिकेच्या बाजार विभाग आणि एफ-दक्षिण विभागाने संयुक्त कारवाई करत सर्व बकऱ्या ताब्यात घेऊन देवनार कत्तलखान्यात पाठविल्या तसेच अवैध शेड हटविण्यात आले. या मोहिमेत १५ अधिकारी-कर्मचारी, २५ मजूर, दोन जेसीबी यंत्रे आणि एक डंपर सहभागी होता. कारवाईदरम्यान एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुळे, उपायुक्त प्रशांत सपकाळे, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.(Goregaon Bakri Eid Protest)