गोकुळच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र; गोकुळ पुन्हा चर्चेत!

    28-May-2026
Total Views |
Gokul Halal Certificate Controversy
 
मुंबई : (Gokul Halal Certificate Controversy) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर म्हणजेच गोकुळच्या तूप, लोणी, दूध पावडर या उत्पादनांसाठी हलाल प्रमाणपत्र घेतले गेले आहे. मुंबईस्थित ‘ज्युहफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ (जमिअत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट) या संस्थेकडून हे प्रमाणपत्र वितरित झाले असून ज्याची वैधता १८ मार्च २०२८ पर्यंत आहे अशी माहिती समोर आली आहे.गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ असतानाच हे प्रमाणपत्र घेतले गेले आहे का असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतानाच निवडणूकीच्या तोंडावर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. वाढीव सभासद विरोधात न्यायालयात गेलेले याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनीही या प्रमाणपत्राची काय गरज होती असे प्रश्न उपस्थित केले आहेत.(Gokul Halal Certificate Controversy)
 
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवार दि.२७ रोजी माध्यमांशी बोलताना असे म्हटले आहे की,"मी घेतलेल्या माहितीप्रमाणे गोकुळतर्फे अनेक दिवसापासून अजरबैजान आणि आखाती देशांमध्ये आपण तूप,लोणी पाठवतो त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सेंटिमेंटची आवश्यकता असते.आणि त्यामुळे हे प्रमाणपत्र २०२२ सालीच काढलेले आहे. नविद मुश्रीफ तर त्यानंतर हल्लीच अध्यक्ष झाले आहेत. कशाला काहीही जोडले जाते याचे मला आश्चर्य वाटते.वास्तविक अशी माहिती प्रशासनास विचारली पाहिजे."(Gokul Halal Certificate Controversy)
 
"गोकुळसारख्या दूध संस्थेने हलाल प्रमाणपत्र घेणे ही दुर्दैवी गोष्ट आहे.आम्ही याचा निषेध करतो. गोकुळचे बहुसंख्य ग्राहक हिंदू असताना अशा प्रमाणपत्राची गरज काय आहे. याचा जाब आम्ही गोकुळच्या प्रतिनिधींना विचारणार आहोत. आणि वेळ पडली तर गोकुळच्या दुधावर बहिष्कार देखील घातला जाईल."अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे कोकण महामंत्री मोहन सालेकर यांनी गुरुवार दि.२७ रोजी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली आहे.(Gokul Halal Certificate Controversy)