गीतासार भाग १५

    28-May-2026
Total Views |
Geetasar Pandava Symbolism Explained
 
युधिष्ठिर
 
कुंतीचे एकूण चार पुत्र. त्यांपैकी कुंतीच्या कौमार्य अवस्थेतील कर्ण हा पहिला. नंतर पंडुबरोबर विवाह झाल्यानंतर, तिला तीन पुत्र झाले. हे तीन पांडव पंडुला कुंतीद्वारे नियोगाने प्राप्त झाले. नियोग म्हणजे तत्त्वचिंतनाने प्राप्त झालेली त्या तत्त्वाची एकरूपता होय. अष्टांगयोगातील यम-नियम धर्माशी पतिव्रतेप्रमाणे एकनिष्ठ राहून, कुंतीला धर्म, तर मरुत् म्हणजे वायू तत्त्वाशी एकरूप होऊन प्रकांड शक्तिशाली भीम आणि उच्च अवस्थेतून आपोआप वर येणारा ब्रह्माशी शरसंधान करणारा इंद्रियांचा स्वामी अशा इंद्राचा पुत्र अर्जुन, कुंतीला नियोगाने प्राप्त होतो. रोधापासून जसा निरोध शब्द उत्पन्न होतो, तद्वत् योगापासून नियोग शब्द उत्पन्न होतो. नियोग म्हणजे शरीरभोग नव्हे!
 
‘योगः चित्तवृत्तिनिरोधः’
 
असा नियोग कुंती देवतुल्य तत्त्वांशी करते. वृत्तींना कौशल्याने उन्नयनित करणे, म्हणजेच निरोध होय. तद्वत् योगायोगाने प्राप्त होणार्‍या दिव्य अवस्थांना अधिक दिव्यतर बनविणे म्हणजे नियोग होय. व्यासांनी असल्याच नियोगाने अंबा, अंबिका आणि अंबालिका वृत्तींशी नियोग करून धृतराष्ट्र, पंडु आणि विदुराची उत्पत्ती केली. ऋषी दुर्वासांच्या मंत्रसामर्थ्याने माद्रीला झालेल्या दोन पुत्रामुळे एकूण पांडव संख्येने सहा झाले, जे षड्दर्शनाची आठवण करून देतात. कुंतीला पंडुसोबत विवाहानंतर झालेल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव युधिष्ठिर अथवा धर्म! हा तिला यमधर्माला आपला पती मानूनच झाला. पांडवांची उत्पत्ती देवतांपासून मंत्राने झाली. म्हणूनच त्यात व्यासांद्वारे नियोजित काही गूढ असले पाहिजे.
 
युधिष्ठिराचा पिता यमधर्म आहे. ही सारी सृष्टी एक नियतधर्माने चालते. ज्यामुळे प्रत्येक पदार्थ आणि अवस्था, पूर्वी होती तशीच मिळते. या विज्ञानाला आज ‘संभवशास्त्र’ म्हणतात. मूळ प्रकृती एकच आहे. परंतु, विभिन्न यम, क्रम, अवस्था व शक्तीद्वारे त्या एकापासून अनेक बनतात. ओत एक असतो, परंतु त्या ओताचे विभिन्न स्थान, काळ आणि संख्याद्वारे विभिन्न मूल पदार्थ होतात. जसा प्रत्येक पदार्थाचा एक धर्म वा स्वभाव असतो, तसाच प्रत्येक प्राण्याचाही असतो. दगड आकाशात फेकल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे खालीच येतो. गुरुत्वाकर्षण शक्ती ज्या दगडावर कार्य करीत आहे, त्या दगडाचा तो धर्म आहे. मानवाचासुद्धा प्रेम आणि परोपकार हा एक नियत धर्म असून, त्यालाच व्यास धर्मराज म्हणतात. हा युधिष्ठिराचे युद्ध चांगल्या वाईट वृत्तींचे आहे. हेच महाभारतातले कौरवपांडव युद्ध!
 
धर्मराज वृत्तीयुद्धात स्थिर राहतो, म्हणूनच वेदव्यास त्याला युधिष्ठिर म्हणतात. या युधिष्ठिराचा पिता प्रकृतीतील यमधर्म आहे. ही प्रकृती नियत धर्माने चालली आहे. प्रकृतीचा धर्म त्याच्या यमानेच निश्चित होतो, यामुळेच प्रकृती विभिन्न अवस्थेद्वारे गतिमान दिसते. कुंती आणि पंडु अवस्थांचा हा प्रथमच नियोग पुत्र आहे. प्रखर योगसाधनेने प्राप्त फळाला पहिला नियोगपुत्र धर्म असे म्हणतात.
 
भीम
 
भीम कुंतीचा दुसरा नियोगपुत्र! स्वतःच्या धर्मसाधनेद्वारे साध्य, साधकातील प्रकांडशक्ती म्हणजे भीम. योगसाधकाची शारीरिक आणि मानसिक शक्ती अन्य व्यक्तींपेक्षा पुष्कळ अधिक असते, कारण तो प्रकृतीच्या मूळ स्वरूपाशी एकरूप असतो. त्यामुळेच त्याच्या शरीरात प्रकृतिच्या मूल अवस्थेतील असीम शक्ती असते. असीम शक्ती परमाणु फोडल्यानंतरच मिळते. तिकडे कौरव पक्षातील भीष्मही प्रकांड शक्तीचे दाखविले आहेत; परंतु त्यांची शक्ती वाईट कामासाठी वापरला गेला. यासाठी युद्धकाळात कौरवांच्या बाजूने प्रथम सेनापती भीष्म होते, तर पांडवांच्या बाजूने प्रथम सेनापती भीम होता.
 
भीमाच्या काळात भीमाइतका शक्तिशाली कोणीच नव्हता. कुंतीने मरुत् देवाद्वारे, भीमाची प्राप्ती करविली. याचा आशय असा की, वायू तत्त्वाच्या अवस्थेशी कुंतिरूप साधक एकरूप होऊन, त्याने असीम शक्ती प्राप्त केली. वायू तत्त्वाची गती, प्रकाशापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. म्हणूनच, परमाणु फोडल्यानंतर जी भयानक शक्ती आणि प्रकाश मिळतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पट शक्ती वायू तत्त्वाची प्राप्ती करणार्‍या महान साधकाला मिळते. वायू तत्त्वाचा पुत्र हनुमानालाही महाबलीच दाखविले आहे. म्हणूनच भीमही महाबलीच आहे. भीम हा दुसरा पांडव आहे.
 
अर्जुन
 
तिसरा पांडव अर्जुन हा महाभारताचे प्रमुख पात्र आहे. ‘अर्जुन’ शब्द वेदांमध्ये अनेक ठिकाणी आला आहे. ‘अर्’ म्हणजे चिरीत पुढे जाणे. ‘अर्जुन’ म्हणजे, कोणत्याही अडचणींवर मात करत साधनेमध्ये प्रगती करणारा साधक होय! या ‘अर्’ शब्दापासूनच ‘आर्य’ शब्द आला, जो प्रगतिशील उद्योगी मानवाचे विशेषण आहे. ‘आर्य’ नावाचा कोठला वंश अथवा जमात नाही; पण आज उगाचच आर्य-अनार्यवाद भडकवला जात आहे. दक्षिण भारतात आजसुद्धा अय्यर, नय्यर, मुदलीअय्यर, राव हे शब्द, ‘आर्य’ या शब्दाचे अपभ्रंश म्हणून वापरले जात आहेत. उत्तर भारतात याच ‘आर्य’ शब्दाचा अपभ्रंश ‘आज्ज’, ‘आजी’ आणि ‘जी’ अशा स्वरूपात होतो. जर्मन लोक स्वतःला ‘हर’ ही, आर्य उपाधी लावण्यात धन्यता मानतात. ‘ह’चा ‘स’ होऊनच, इंग्लंडमध्ये सभ्य गृहस्थ स्वतःला ‘सायर’ अथवा ‘सर’ ही उपाधी लावतात. आयर्लंडमध्ये तर आयरिश लोक स्वतःला, ‘सेरोस्तेत आयर’च म्हणतात. ‘सारस्वत आर्य’चा अपभ्रंश ‘सेरोस्तेत आयर’ आहे. एके काळी सारे विश्वच वैदिक म्हणजे ज्ञानमय, आर्यमय होते. तसेच आज पुनः व्हायला हवे, ज्यामुळे सर्व भांडणे मिटतील. (क्रमशः)
 
योगिराज हरकरे 
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७