जगात आज सगळीकडेच ‘एआय’ची चर्चा सुरू असताना, पाश्चात्त्य जगातील प्रमुख धर्मसंस्था असलेल्या चर्चने ‘एआय’ला काल विरोध जाहीर केला. ख्रिश्चन धर्मसंस्थेचे प्रमुख असलेल्या १४वे पोप लिओ यांनी ‘एआय’च्या वाढत्या वापराविषयी चिंता व्यक्त करतानाच, ‘एआय’ला शक्तिहीन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांच्या ४२ हजार, ३०० शब्दांच्या ‘मॅग्निफिका ह्युमॅनिटास’ या पोपपत्रातून केले. १४वे पोप लिओ यांनी पोपपदाची जबाबदारी स्वीकारताच, दुसर्या दिवसापासूनच ‘एआय’च्या विरोधात दंड थोपटले होते. आधुनिक तंत्रज्ञानाबाबत नैतिक प्रश्न उपस्थित करणे आवश्यकच. मात्र, या भूमिकेकडे पाहताना पाश्चिमात्य धर्मसत्तांचा इतिहासही लक्षात घ्यावा लागतो. कारण, स्वतःला ‘सुधारणावादी’, ‘प्रगत’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते’ म्हणून सादर करणार्या याच पाश्चिमात्य संस्कृतीने, आजवर नव्या विचारांना आणि वैज्ञानिक सुधारणांना कठोर विरोध केलेला आहे.
आजवरचा ‘चर्च’ या धर्मसंस्थेचा इतिहास लक्षात घेता; जे-जे नवीन, त्या प्रत्येकालाच प्रारंभी विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रमच चर्चने राबवलेला दिसतो. यामध्ये ‘सूर्य हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे,’ या गॅलेलिओच्या खगोलशास्त्रीय शोधालाही चर्चने विरोध केला. तसेच आज जगभरातील ख्रिश्चन धर्मियांसाठी श्रद्धेचा स्रोत असलेल्या ‘बायबल’चे जेव्हा स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्याची मागणी वाढली, तेव्हाही चर्चने या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध केल्याचे इतिहास सांगतो. १८व्या आणि १९व्या शतकात युरोपमध्ये लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उदय झाला. फ्रान्ससारख्या देशांमध्ये चर्च आणि राज्य वेगळे करण्याचे कायदे लागू करण्यात आले, यालाही चर्चने तीव्र आक्षेप नोंदवला. डार्विनच्या ‘उत्क्रांतीवादा’पासून, आधुनिक काळात स्त्रियांचे अधिकार, गर्भनिरोधक साधने, घटस्फोट यांसारख्या अनेक प्रश्नांवरही चर्चची भूमिका दीर्घकाळ विरोधाचीच राहिल्याचे दिसते. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा युरोपात समाजव्यवस्था झपाट्याने बदलू लागली, तेव्हाही चर्चने त्या आधुनिकतेकडे साशंक दृष्टीनेच पाहिले. आणि आज हेच चर्च ‘एआय’च्या विरोधात शड्डू थोपटून उभे राहिले आहे.
१४वे पोप लिओ यांनी ‘एआय’विषयीची भूमिका जगातील अनेक घटकांनी आधीच मांडली असल्याने, ती अवास्तव असल्याचे नक्कीच म्हणता येणार नाही. तसेच प्रत्येक आधुनिक गोष्टीला चर्च विरोध का करते? या प्रश्नाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. स्वयंचलित यंत्रणा वाढल्यास रोजगारांवर परिणाम होऊच शकतो. अफवा, माहितीवरील नियंत्रण यांसारखे प्रश्नही गंभीर आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानावर नैतिक बंधने आणि लोकशाही शासन व्यवस्थेचे नियंत्रण असणे आवश्यकच. परंतु, प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाकडे केवळ ‘धर्मसंस्थेचा शत्रू’ म्हणून पाहण्याची वृत्ती ही घातकच! तसेच पोप यांचे हे आवाहन कॅथलिक देश, कॅथिलक कंपन्या, त्यांचे मालक हे तरी गांभीर्याने घेणार का? मागे ‘ट्रम्प विरुद्ध पोप’ अशा रंगलेल्या संघर्षावरुन चर्चच्या धार्मिक सत्तेला राजसत्ता किती जुमानतात, हे स्पष्ट झाले होतेच.
अधोरेखित करण्यासारखा दुसरा मुद्दा म्हणजे, आजवर याच चर्चच्या प्रभावाखाली असलेल्या पाश्चात्त्य जगताने हिंदू संस्कृतीला ‘मागास’ म्हणून हिणवण्याचे एकमुखी कार्य केले. हिंदू धर्मातील चालीरीतींना अवैज्ञानिक ठरवण्यातच या पाश्चात्त्य संस्कृतीने धन्यता मानली. मात्र, हिंदू संस्कृतीवर अंधश्रद्धाळू असल्याची टीका केली जात असताना, चर्चच्या प्रतिगामी भूमिकांवर तेवढ्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. परिणामी, पाश्चिमात्यांचे प्रगतपण बेगडीपणाच असल्याचे अधोरेखित होते.
काल पोप यांनी व्यक्त केलेली भीती, आजवरच्या अनेक सुधारणांच्या वेळी व्यक्त केल्याचेही इतिहास सांगतो. औद्योगिक यंत्रसामग्री आल्यावर मानवी श्रम नष्ट होतील, संगणक आणि इंटरनेटच्या आगमनानंतरही रोजगार संपतील, सामाजिक नातेसंबंध कोलमडतील, अशी भविष्यवाणी चर्चने केली. प्रत्यक्षात या तंत्रज्ञानांनी अर्थव्यवस्थेची नवी दालने उघडली. मात्र, या सगळ्यालाच त्या-त्या काळी चर्चने विरोध केला. त्यामुळे चर्चची आजची भूमिका ही मागील पानावरून पुढे अशीच! पाश्चात्त्य संस्कृतीने कायमच दुसर्याकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली. मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याबाबत, चर्चने हिंदू संस्कृतीकडून शिकण्याची नितांत आवश्यकता आहे, हेच खरे!
कौस्तुभ वीरकर