मुंबई : (Legislative Council Elections) विधान परिषदेच्या १६ रिक्त जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी जाहीर झालेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपासंदर्भात जोरदार खलबते सुरु आहेत. यानिमित्ताने भेटीगाठींचे सत्रही वाढले आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री महायुतीची बैठक बोलवण्यात आली होती.
त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील दालनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत जागावाटपासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. विधानपरिषदेच्या (Legislative Council Elections) एकूण १७ जागांपैकी भाजपने १२ जागांवर दावा सांगत शिवसेनेला ४ तर, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) एका जागेची ऑफर दिली होती.
मात्र, या फॉर्म्युलाला शिवसेनेने नकार दिला असून, किमान ७ जागांची मागणी त्यांनी केली. शिवाय दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट घेतल्याचेही समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने ठाणे, पालघर, नाशिक, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या मतदारसंघांवर दावा केला आहे. तसेच रायगडच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांनी दावा केल्याचे समजते.
दुसरीकडे, भाजपने १२ जागांसाठी तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ४८ नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. पुढील २ ते ३ दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Legislative Council Elections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....