विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात तिन्ही पक्षांची चर्चा सुरु;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित बसून मार्ग काढू

    26-May-2026   
Total Views |
Vidhan Parishad Election
 
मुंबई : (Vidhan Parishad Election) विधानपरिषद निवडणूकीसंदर्भात आमच्या तिन्ही पक्षांची चर्चा सुरु आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरु आहे तर, पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु आहे. अजून यावर मार्ग निघाला नाही पण, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोमवारी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “१९५२ साली ज्या जवाहर बाल भवनचे उद्घाटन तत्कालिन राष्ट्रपतींनी केले होते त्याचे आता ७५ वर्षांनंतर सुंदर नुतनीकरण करण्यात आले आहे. लहान बालकांकरिता इथे सर्व प्रकारच्या सोयी आहेत. बाजूलाच असलेल्या उद्यानात ओपन सायन्स पार्क तयार करत आहोत. त्यामुळे बालकांकरिता सुंदर वास्तू तयार झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांना याठिकाणी आणावे आणि इथल्या वातावरणाचा आनंद घेण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी मुंबईच्या महापौर आणि आयुक्त यांना करणार आहे. महिन्याला १ लाख विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यासाठी मी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे अभिनंदन करतो.”
 
रायगड जिल्ह्यातील अपघातावर बोलताना ते म्हणाले की, “रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात ३ मृतदेह सापडले असून उर्वरित मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना असून यासंदर्भात पुढची कारवाई सुरु आहे.”
 
पुढची नीट परीक्षा योग्य पद्धतीने होणार
 
ते पुढे म्हणाले की, “ज्या लोकांनी नीट परिक्षेत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार आणि परीक्षा प्राधिकरणाने याची दखल घेतली असून याची पाळेमुळे खणून काढली आहेत. यासंदर्भात अटकही झाली आहे. पुढची नीटची परीक्षा योग्य पद्धतीने होईल, कुठल्याही प्रकारे कुणालाही गडबड करता येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
शेतकऱ्यांच्या नावे इंधनाची साठेबाजी होऊ नये
 
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, “जागतिक संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना आणि जगात अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलची आणीबाणी घोषित केली आहे. काही ठिकाणी दोन दोन दिवस लॉकडाऊन आहे. अशाही परिस्थितीत आपण आपल्याकडे पेट्रोल-डिझेल देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याने कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झाली. विशेषत: या ऋतूमध्ये शेतकरीसुद्धा डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात. एरवी आपण ते देत नाही पण या ऋतूत शेतकऱ्यांना आपण ती देतो. परंतू, शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्या कुणीतरी साठेबाजी करू नये, यादृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत.” (Vidhan Parishad Election)
 
२० टक्क्यांनी मागणीत वाढ
 
“साधारणपणे मागील वर्षी आपल्याकडे जेवढा कोटा होता जवळपास तेवढाच कोटा आता आहे. पण थोडी भीती असल्यामुळे २० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. परंतू, पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काही विशिष्ट ठिकाणी जास्त हिंसक प्रवृत्ती दिसत आहेत. पण विनाकारण हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना सांगितले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
 
सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मोदीजींच्या १२ वर्षांच्या काळात बहुतांश काळ महागाईचा निर्देशांक सर्वात खाली होता. जागतिक परिस्थितीमुळे काही प्रमाणात जगात महागाई वाढत असून त्याची झळ आपल्यालाही पोहोचते आहे. पण त्यावरही मोदीजीच उपाययोजना करत आहेत.” (Vidhan Parishad Election)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....