‘टीबी’निदानाची नवी दिशा

    26-May-2026
Total Views |
New TB Diagnosis Method
 
आरोग्य व्यवस्थेत कोणत्याही आजाराचे लवकर आणि अचूक निदान होणे, हे सर्वांत महत्त्वाचे पाऊल मानले जाते. निदानाला झालेला विलंब आजार धोका वाढवणारा ठरतो. त्यामुळे जलद, सोपी आणि विश्वासार्ह चाचणी पद्धती आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवतात. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आता निदान प्रक्रिया अधिक वेगवान होत असून, असेच एक संशोधन ‘टीबी’ आजाराच्या चाचणीमध्ये झाले असून, त्यामुळे ‘टीबी’निर्मूलन कार्यक्रमाला बळ मिळणार आहे. त्या संशोधनाचा सर्वांगाने घेतलेला आढावा...
 
क्षयरोग अर्थात ‘टीबी’ हा आजही भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोरचा दीर्घकालीन प्रश्न आहे. वैद्यकीय विज्ञानात प्रगती होऊनही, या आजाराचे संपूर्ण उच्चाटन साध्य झालेले नाही. उलट, लोकसंख्येची घनता, सामाजिक-आर्थिक विषमता, कुपोषण आणि आरोग्य सुविधांतील असमतोलामुळे, हा आजार आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. अशा स्थितीत ‘टंग स्वॅब’ अर्थात जीभेवरील स्वॅबआधारित ‘टीबी’ चाचणी, आमूलाग्र बदल घडवणारी नवी दिशा ठरणार आहे.
 
‘टीबी’ हा ‘मायकोबॅटेरियम ट्युबरयुलोसिस’ या जिवाणुमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा जिवाणू मुख्यतः हवेतूनच पसरतो. ‘टीबी’ रुग्ण खोकताना, शिंकताना किंवा बोलताना, हवेत सूक्ष्म थेंब अर्थात ‘ड्रॉपलेट न्यूलिआई’ सोडतो. या थेंबांमधील जिवाणू दीर्घ काळ हवेत तरंगत राहू शकतात. निरोगी व्यक्तीने हे थेंब श्वासावाटे घेतल्यास संसर्गाचा धोका असतो. मात्र, संसर्ग झाला, म्हणजे लगेच आजार होतोच, असे नाही. शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास जिवाणू सुप्त अवस्थेत राहतो; परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यास तो सक्रिय होतो.
 
‘टीबी’ प्रामुख्याने फुप्फुसांवर परिणाम करत असला तरीही, हाडांचा ‘टीबी’, मेंदूचा ‘टीबी’, लिम्फ नोड्सचा ‘टीबी’ अशा विविध स्वरूपांत तो शरीरभर पसरण्याचा धोका असतो. दीर्घ काळ टिकणारा खोकला, कफातून रक्त येणे, वजन झपाट्याने घटणे, सततचा थकवा, भूक मंदावणे, संध्याकाळी ताप येणे आणि रात्री घाम येणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे. या लक्षणांची सुरुवात संथ गतीने होत असल्याने, अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्षच करतात.
 
भारत हा जगातील सर्वाधिक ‘टीबी’ असलेला देश आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अंदाजानुसार, दरवर्षी भारतात सुमारे २० ते २१ लाख नवीन रुग्ण आढळतात. विशेषतः ग्रामीण भाग, झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक आहेत. कुपोषण, मधुमेह, ‘एचआयव्ही’ संसर्ग, धूम्रपान आणि दारिद्य हीदेखील, या आजाराच्या वाढीमागील प्रमुख कारणे.
  
या आजारासाठीच्या सध्याच्या निदानपद्धती प्रामुख्याने थुंकीच्या नमुन्यावर आधारित आहेत. या नमुन्याची मायक्रोस्कोपिक तपासणी, कल्चर किंवा मॉलियुलर चाचण्या केल्या जातात. मात्र, या पद्धतींच्या अनेक मर्यादाही आहेत. सर्वच रुग्णांना पुरेशी थुंकी तयार करता येतेच, असे नाही. लहान मुले, वृद्ध किंवा गंभीर अवस्थेतील रुग्णांना ही अडचण जाणवते. तसेच, ग्रामीण भागात प्रयोगशाळांची कमतरता, वाहतूक व्यवस्था आणि निकाल मिळण्यास लागणारा वेळ, यामुळेही निदान प्रक्रियेत विलंब होतो. हा विलंब केवळ रुग्णासाठीच नव्हे, तर सार्वजनिक आरोग्यासाठीही धोकादायक ठरतो.
 
याच पार्श्वभूमीवर ‘टंग स्वॅब’आधारित ‘टीबी’ चाचणी ही महत्त्वाची ठरते. या पद्धतीत रुग्णाच्या जिभेवरून ‘स्वॅब’ घेतला जातो. त्यानंतर हा नमुना अत्याधुनिक मॉलियुलर तंत्रज्ञानाद्वारे तपासून, त्यातील ‘मायकोबॅटेरियम ट्युबरयुलोसिस’ जिवाणूंची उपस्थिती शोधली जाते. या चाचणीमध्ये कोणतीही सुई, वेदनादायक प्रक्रिया किंवा विशेष पथ्याची गरज नसल्याने, रुग्णांसाठी ती अत्यंत सुलभ ठरते.
 
या चाचणीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे वेग. पारंपरिक चाचण्यांना काही तास, काही वेळा दिवस लागतात. मात्र, ‘टंग स्वॅब चाचणी’ काही मिनिटांतच प्राथमिक निष्कर्ष देऊ शकते. काही आधुनिक प्रणालींमध्ये १५ ते ३० मिनिटांतच अहवाल मिळू शकतो. त्यामुळे रुग्णाला त्याच दिवशी उपचार सुरू करणे शय होते. अलीकडील संशोधनांनुसार या चाचणीची अचूकता सुमारे ८० टक्क्यांपर्यंत आढळली असून, काही सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास ही अचूकता आणखी वाढू शकते. त्यामुळे भविष्यात ही चाचणी प्राथमिक साधन म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
 
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीनेही या तंत्रज्ञानाचे परिणाम व्यापक आहेत. ग्रामीण आरोग्य केंद्र, मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिमांमध्ये या चाचणी पद्धतीचा वापर करणे सहज शक्य आहे. यामुळे प्रयोगशाळांवरील अवलंबित्व कमी होऊन, निदान अधिक जलद होते. तसेच, संसर्गाचे नियंत्रणही अधिक प्रभावीपणे करता येते. वेदनारहित, जलद आणि सोपी चाचणी असल्याने, लोक तपासणीसाठी पुढे येण्याची शयता वाढते. ही बाब ‘टीबी’सारख्या संसर्गजन्य आजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 
एकूणच पाहता, ‘टंग स्वॅब टीबी चाचणी’ ही भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत निदानाच्या संकल्पनेत बदल घडवणारी क्रांतिकारी पायरी आहे. भारत सरकारने ‘टीबी’निर्मूलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला असून, देशातून ‘टीबी’चे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ‘टीबी’च्या विरोधातील लढ्यात जलद तपासणी आणि वेळेवर उपचार ही दोन महत्त्वाची शस्त्रे ठरणार आहेत. ‘टंग स्वॅब चाचणी’ हे या कार्यक्रमाच्या यशसिद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल.
 
(प्रतिनिधी)