मुंबई : (Siddhivinayak Temple) मुंबईतील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट करण्यासाठी भव्य कॉरिडोर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सोमवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भुमिपूजन पार पडले.
श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः मंगळवार, संकष्टी चतुर्थी, गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होत असते. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसराचा हा महत्त्वाकांक्षी कॉरिडोर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्ग विकसित करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, भाविकांसाठी स्वतंत्र प्रतिक्षा व्यवस्था, भूमिगत पार्किंग तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय मंदिर परिसराला आधुनिक स्वरूप देतानाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५०० कोटी रुपयांदरम्यान सांगितला जात आहे. उज्जैन कॉरिडोरच्या धर्तीवर हे कॉरिडोर तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून, भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे.(Siddhivinayak Temple)
कॉरिडोर प्रकल्पाचे आकर्षक फोटो समोर
या नव्या कॉरिडोर प्रकल्पाचे फोटो समोर आले असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंदिराला अक्षरश: सुंदर आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहे. भव्य प्रवेशद्वार, पारंपरिक वास्तुकलेची झलक आणि आधुनिक सुविधांचा संगम या डिझाइनमध्ये पाहायला मिळते. आकर्षक कमानी, नक्षीकाम केलेले खांब, विस्तीर्ण प्रवेशमार्ग आणि गणेशमूर्तींनी सजवलेले दर्शनी भाग यामुळे संपूर्ण परिसराला आध्यात्मिक आणि दिव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.
तसेच गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था, सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा आणि भाविकांसाठी प्रतीक्षा सुविधा विकसित करण्यात येणार आहे. यामुळे मंदिर परिसर केवळ दर्शनाचे ठिकाण न राहता धार्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.(Siddhivinayak Temple)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....