मुंबई : (Nitesh Rane Statement) होळी आल्यावर सांगितलं जातं की, होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली पाहिजे, कोरडी होळी खेळली पाहिजे. दिवाळीच्या उत्सवात फटाके फोडू नयेत, असेही सांगितले जाते. असे सांगणाऱ्यांनी बकरीदही फक्त फोटो लावून साजरी करावी; अशी सूचना देखील त्यांनी करायला हवी, असे मत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. रविवारी ते कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अंबिका नाका परिसरात आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते.
हिंदू सणांवर उपदेश करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवर नितेश राणेंनी जोरदार टीका केली. पर्यावरणप्रेमींना आव्हान देताना त्यांनी म्हटले की, आता बकरीदच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणवाद्यांनी ‘व्हर्च्युअल’ सण साजरा करण्याची मागणी करावी. संगणकावर बकरी कापून सण साजरा करा. नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांना लक्ष्य करत मुस्लिमांना ‘व्हर्च्युअल बकरीद’ साजरी करण्याचा सल्ला दिला आहे.
बकरीदच्या काही दिवस आधीच गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी केलेली मागणी अनेक प्रमुख मुस्लिम संघटनांच्या पाठिंब्याने जोर धरत आहे. काही संघटना या मुद्द्यावर समाजात एकमत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची बाजू मांडत आहेत, तर काही या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती असलेल्या उत्तर प्रदेशात अशी मागणी यापूर्वी प्रामुख्याने हिंदू संघटनांकडून होत आली असल्याने ही पुढाकार विशेष महत्त्वाची मानली जात आहे.(Nitesh Rane Statement)
पुढे ते म्हणाले की, मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. हे मदरसे माझ्या रडारवर आहेत. देशद्रोही कारवायांसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत पुरवणाऱ्या मदरशांवर पोलिसांनी धाडी टाकाव्या, कारवाई करावी. जे या देशात राहून तिरंग्याचा सन्मान करणार नाहीत किंवा वंदे मातरम म्हणण्यास विरोध करतील, त्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रापेक्षा कुणीही मोठे नसल्याचेही मंत्री नितेश राणेंनी खडसावून सांगितले.(Nitesh Rane Statement)
हिंदू समाजाने जागरूक राहून एकजूट दाखवावी
समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. पण हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. हिंदू समाजाने जागरूक, संघटित आणि सजग राहणे ही काळाची गरज आहे. हिंदूंवर अन्याय अथवा अत्याचार झाल्यास संपूर्ण समाजाने एकजुटीने आणि ताकदीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
हिंदूंना हिंदूंमधीलच निष्क्रियतेपासून धोका
थोडे आमिष दाखवले की काही लोक धर्मांतराकडे वळतात. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. आपण त्यांच्या मावळ्यांप्रमाणे जगले पाहिजे. आमच्या धर्मात दुसऱ्या धर्माचा नाश करून स्वतःचा धर्म वाढवण्याची शिकवण नाही, मात्र इस्लाममध्ये तसे आहे. हिंदूंना मुस्लिमांपासून नव्हे तर हिंदूंमधीलच निष्क्रियतेपासून धोका असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.(Nitesh Rane Statement)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक