मुंबई मेट्रोमध्ये ‘पॅन्टोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली’ कार्यान्वित;भारताची पहिली स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित;देखभाल कार्यक्षमतेत ९० ते ९५ टक्क्यांनी वाढ

    26-May-2026
Total Views |
 Mumbai Metro AI Maintenance System
 
मुंबई : (Mumbai Metro AI Maintenance System) तंत्रज्ञानाधारित शहरी वाहतूक व्यवस्थेमध्ये आपले अग्रस्थान अधिक मजबूत करत एमएमआरडीएने भारतातील पहिली स्वयंचलित ‘पॅन्टोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली’ महा मुंबई मेट्रोमध्ये कार्यान्वित केली आहे. मेट्रो संचालनातील पूर्वानुमानाधारित देखभाल, स्मार्ट निरीक्षण आणि तांत्रिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 
ही अत्याधुनिक प्रणाली पारंपरिक मॅन्युअल तपासणी पद्धतीऐवजी सतत, रिअल-टाइम आणि डेटा-आधारित निरीक्षण प्रणालीकडे झालेला महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हाय-स्पीड लेझर स्कॅनिंग आणि प्रगत थ्रीडी इमेजिंग तंत्रज्ञानाचा मेट्रो संचालनात देखभाल कार्यक्षमतेसाठी वापर करून नवा मापदंड निर्माण केला आहे.
 
प्रत्येक विद्युतीकृत मेट्रो नेटवर्कमध्ये पॅन्टोग्राफ हा ट्रेन आणि ओव्हरहेड वीजपुरवठा प्रणाली यांमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. कार्बन स्ट्रिपची असमान झीज, तडे, संरचनात्मक विकृती किंवा अलाइनमेंटमधील त्रुटी यांसारखे किरकोळ दोष वेळेत निदर्शनास न आल्यास मोठ्या ऑपरेशनल अडचणी निर्माण होऊन पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते.
 
पूर्वी पॅन्टोग्राफ तपासणी नियोजित देखभाल चक्रांदरम्यान मॅन्युअली केली जात होती. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि वेळ लागत असे. मात्र नव्याने कार्यान्वित करण्यात आलेली प्रणाली ही प्रक्रिया पूर्णपणे बदलत असून, प्रत्येक धावत्या ट्रेनच्या पॅन्टोग्राफची रिअल-टाइममध्ये, कोणताही व्यत्यय न आणता आणि ऑपरेशनल वेगातच स्वयंचलित तपासणी करते.
 
 
या अभिनव उपक्रमाद्वारे एमएमआरडीएने भारतातील मेट्रो क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कार्यान्वित करत स्मार्ट रेल डायग्नॉस्टिक्स क्षेत्रात अग्रणी स्थान निर्माण केले आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी अधिक सुरक्षित, स्मार्ट, शाश्वत आणि जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या एमएमआरडीएच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला या उपक्रमामुळे आणखी बळ मिळाले आहे. (Mumbai Metro AI Maintenance System)
 
“आम्ही प्रवाशांना अधिक सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी मेट्रो पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल प्रणाली सातत्याने अद्ययावत करत आहोत. ही जागतिक दर्जाची स्मार्ट प्रणाली ट्रेन डाउनटाइममध्ये मोठी घट करेल, फ्लीट उपलब्धता वाढवेल, ऑपरेशनल विश्वसनीयता अधिक मजबूत करेल आणि सेवा व्यत्यय धोका कमी करेल ".
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए (Mumbai Metro AI Maintenance System)