मुंबई : (MHADA) गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर वसाहतींमधील नव्याने उभ्या राहत असलेली अनधिकृत बांधकामांबाबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (म्हाडा) सातत्याने स्थानिक रहिवाशांकडून तक्रारी येत आहेत. या तक्रारींमुळे ही बांधकामे व अतिक्रमण हटवण्याचे काम म्हाडाने हाती घेतले आहे.
“मागील आठवड्यात वसाहतींमधील काही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून पुढील काळात अशा प्रकारची कारवाई आणखी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळू शकेल,” असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या महिन्याच्या प्रारंभी मोतीलाल नगर क्र. ३ मधील चाळ क्र. ६१ येथे एका मूळ २४० चौ. फुटांच्या जागेवर आसपासच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करून तब्बल २४०० चौ. फुटाचे बांधकाम झाल्याची तक्रार एका स्थानिक रहिवाशाने म्हाडाला पत्र लिहून केली होती.(MHADA)
या निवासी जागेचा वापर व्यवसायाकरिता केला जात असल्याचे सांगत वसाहतीचा पुनर्विकास होत असतानाही ही नवी अतिक्रमणे होत असल्याचे यातून निदर्शनास आणून देण्यात आले होते. या तक्रारीला न्याय देत म्हाडाने मागील आठवड्यात येथे कारवाई करत हे बांधकाम जमीनदोस्त केले. अशा पद्धतीच्या तक्रारी म्हाडाकडे सातत्याने येत असल्याने याची दखल घेऊन आणखी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हाडाने सांगितले.(MHADA)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.