मासिक पाळीच्या कानगोष्टी

    26-May-2026
Total Views |
 
Menstrual Health Women Awareness
 
मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक, जैविक आणि अपरिहार्य प्रक्रिया. ही प्रक्रिया तिच्या प्रजनन आरोग्याशी आणि संपूर्ण शरीराच्या समतोलाशी जोडली गेली आहे. असे असतानाही या विषयाभोवती अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आणि सामाजिक संकोच पाहायला मिळतो. मासिक पाळीत स्वच्छता, योग्य आहार, मानसिक आधार आणि वैज्ञानिक माहिती यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दि. २८ मे रोजी असलेल्या जागतिक मासिक पाळी आरोग्य दिना निमित्ताने मासिक पाळी विषयातील बारकाव्यांचा विविध अंगाने घेतलेल मागोवा...
 
दि. २८ मे हा जागतिक मासिक पाळी आरोग्य दिवस! मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करत असताना, मनातील अनेक कुशंकांची जळमटे स्वच्छ व्हायलाच हवीत. ‘स्त्री’ या शब्दाचाच अर्थ आहे ‘नवनिर्मितीची क्षमता.’ या नवनिर्मितीच्या प्रक्रियेचा मूलाधार म्हणजेच मासिक पाळी! मासिक पाळी हा स्त्री शरीराच्या सृजनशक्तीचा, अंतर्गत लयीचा आणि जैविक परिपक्वतेचा हा एक सुंदर अविष्कार आहे. तरीही, आजही मासिक पाळीभोवती भीती, गैरसमज, संकोच आणि अर्धवट माहितीचे धुके दाटलेले दिसते.
 
योग्य माहितीचा अभाव : एका स्त्रीकडून दुसर्‍या स्त्रीपर्यंत माहिती पोहोचते खरी; पण ती अनेकदा कानगोष्टी स्वरूपातच. अर्धसत्य, भीतीदायक किंवा चुकीच्या पद्धतीने. परिणामी, मुलींना स्वतःच्या शरीराशी मैत्री करण्याऐवजी, अपराधीपणाची भावना शिकवली जाते. म्हणूनच, आजच्या काळात या विषयाची खरी, वैज्ञानिक आणि संवेदनशील माहिती पोहोचवणे, ही समाजाची जबाबदारी आहे.
 
सीताबाईला न्हाणं आले : पूर्वीच्या काळी मुलीला पहिली पाळी आली की, तो दिवस विशेष साजरा केला जाई. यामागे केवळ परंपरा नव्हती, तर एक सुप्त आरोग्यदृष्टी होती. स्त्रीशरीर आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे, तिच्या शारीरिक-मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, हे समाज त्या विधीतून सांगत असे. आज आधुनिकतेच्या धावपळीत आपण तो सोहळा जरी विसरलो असलो; तरीही त्यामागची आरोग्यजाणीव मात्र आपण विसरता कामा नये.
 
मासिक पाळी फक्त रक्तस्रावच नाही, मासिक पाळी म्हणजे केवळ ‘डेट्स’ किंवा ‘प्रॉब्लेम’ नव्हे; ती स्त्रीच्या अंतर्स्रावी ग्रंथींच्या (Hormonal Health) आरोग्याचा आरसा आहे. मेंदूतील पिट्यूटरी ग्रंथी, थायरॉईड, बीजकोश, अधिवृक्क ग्रंथी या सर्वांचा एक सुंदर ताल म्हणजे नियमित मासिक पाळी होय. हा ताल बिघडला की, शरीर संकेत द्यायला सुरुवात करते. कधी जास्त रक्तस्राव, कधी अनियमित पाळी, कधी मानसिक चिडचिड, कधी अकाली पाळी बंद होणे. म्हणूनच, मासिक पाळी समजून घेणे, म्हणजे स्वतःचे शरीर समजून घेणे होय.
 
दवाखान्यात नेहमी येणारे हे काही अनुभव पुढीलप्रमाणे. इतकं रक्त जातं तरीही चालतं, हा गैरसमज अनेकदा असतो. अनेक मुलींना आणि महिलांना पाळीच्या वेळी नेमके किती रक्त जाणे सामान्य आहे, याचीच कल्पना नसते. मासिक पाळीमध्ये साधारणतः ३० ते ८० मिली रक्तस्राव हा सामान्य मानला जातो. सतत मोठ्या गाठी जाणे, तासाभरात पॅड पूर्ण भिजणे किंवा दीर्घ काळ चालणारा रक्तस्राव, हे शरीराने दिलेले धोयाचे संकेत असू शकतात.
 
दहावीतली ऋचा सतत चिडचिडी झाली होती. अभ्यासात लक्ष लागत नव्हते. ती सतत दमलेलीच दिसे. घरच्यांना वाटले, स्वभावच तसा आहे. पण मूळ कारण होते, मासिक पाळीत होणारा अतिरक्तस्राव आणि त्यामुळे निर्माण झालेली रक्तक्षयाची समस्या. कमी हिमोग्लोबिनमुळे शरीरासोबत मनही थकते, हे लक्षातच आले नव्हते. कमी-जास्त चालायचेच,गैरसमज!
 
पस्तीशीच्या इराला दोन पाळींच्यामध्ये रक्तस्राव होत असे. कधीतरी होतंच असं म्हणून, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, तपासणीनंतर गंभीर विकार लक्षात आला. मात्र, थोद्या उशिराच समजला. पाळीची कटकट नसली, तर काय बिघडतंय? हा गैरसमजच अनुयाची पाळी अनियमित झाली आणि वयाच्या ३५व्या वर्षीच बंद झाली. अकाली बीजकोश क्षमता कमी होत असल्याचे संकेत शरीर देत होते; पण वेळ निघून गेल्यावरच ते स्पष्ट झाले. स्त्रीशरीर सतत बोलत असते. गरज असते, ती ते ऐकण्याची.
 
शूचिता : केवळ शरीराची नव्हे, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय. पण स्वच्छता म्हणजे, केवळ बाह्य शरीरस्वच्छता अभिप्रेत नाही. इथे संपूर्ण शरीराची, मनाची, आहाराची, विचारांची शूचिता अपेक्षित आहे. या काळात झोप, आहार, विश्रांती, भावनिक स्थैर्य यांची विशेष काळजी घेतली, तर हार्मोन्सचा समतोल राखण्यास मदत होते. विशेषतः पाळी चक्राचा शरीर, मन, भावना यांवर एकसारखा परिणाम होत असतो.
 
निसर्गाचा ताल : साधा रात्रभर जागरण, सतत स्क्रीनसमोर बसणे, प्रक्रिया केलेले अन्न, ताणतणाव, व्यायामाचा अभाव हे सर्वच, स्त्रीच्या जैविक लयीवर परिणाम करतात. निसर्गानुरूप जीवनशैली ही मासिक पाळीच्या आरोग्याची सर्वांत मोठी गुरुकिल्ली आहे. योग्य वेळी झोपणे, ऋतुनुसार आहार घेणे, सूर्यप्रकाशात वेळ घालवणे, नियमित व्यायाम, योगसाधना, प्राणायाम या साध्या गोष्टी, स्त्रीआरोग्याचा पाया मजबूत करतात. निसर्गाच्या जास्त जवळ जाण्याने, नैसर्गिक गोष्टी यथायोग्य सुरु राहतात.
 
स्त्रीआरोग्य आणि पुष्पौषधींचे भावनिक नाते : भारतीय संस्कृतीत फुले या केवळ सजावटीच्या वस्तू नसून, मनशांती, सौंदर्य, आरोग्य आणि सूक्ष्म ऊर्जेचे प्रतीके आहेत. विशेषतः, स्त्रीच्या शरीर-मनाच्या आरोग्यात पुष्पौषधींना एक अत्यंत नाजूक, पण प्रभावी स्थान आहे. मासिक पाळी हा केवळ शारीरिक बदल नसून हार्मोन्स, भावना, ऊर्जा आणि मनःस्थिती यांच्या लहरींशी जोडलेला काळ असतो. या काळात स्त्रीला कधी थकवा जाणवतो, कधी चिडचिड, कधी भावनिक अस्थिरता तर कधी उष्णतेची भावना. अशा वेळी काही पुष्पौषधी शरीराला शीतलता, मनाला स्थैर्य आणि अंतःस्रावी संस्थेला संतुलन देण्यासाठी उपयुक्त ठरतात.
 
जास्वंद - स्त्रीत्वाची लाल ऊर्जा
 
लाल जास्वंद हे स्त्रीआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फूल मानले जाते. आयुर्वेदात ते पित्तशामक, रक्तपोषक आणि स्त्रीप्रजनन संस्थेला पोषक मानले गेले आहे. जास्वंदाच्या फुलाचे सरबत किंवा पाक, उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. अतिरिक्त रक्तस्राव, अंगातील दाह, थकवा अशा तक्रारींमध्येही, त्याचा उपयोग सांगितला जातो. यातील नैसर्गिक रंगद्रव्ये आणि अ‍ॅण्टीऑसिडंट्स शरीराला पोषण देतात. लाल जास्वंदाकडे पाहताना, जणू स्त्रीच्या सृजनशक्तीचीच आठवण होते. नाजूक पण सामर्थ्यवान!
 
मोगरा - मनशांतीचा सुगंध
 
मोगर्‍याचा सुगंध मनाला विलक्षण शांतता देतो. आज विज्ञानही मान्य करते की, सुगंधोपचार मेंदूतील भावनिक केंद्रांवर परिणाम करतो. मोगर्‍याच्या सुगंधामुळे मासिक पाळीपूर्वी मनाची होणारी चिडचिड, अस्वस्थता आपोआप निवळते. केसांत मोगर्‍याचा गजरा माळणे ही केवळ परंपराच नव्हती; ती स्त्रीमनाला प्रसन्न ठेवण्याची सूक्ष्म चिकित्साही होती.
 
प्राजक्त - पहाटेचा औषधी स्पर्श
 
प्राजक्ताची फुले पहाटे अलगद गळून पडतात. त्यांची शुभ्रता आणि मंद सुगंध मनाला शीतलता देतात. आयुर्वेदात प्राजक्ताच्या फुलाला वात-पित्त संतुलित करणारे मानले जाते. स्त्रियांच्या अंगदुखी, अशक्तपणा, सांधेदुखी अशा तक्रारींमध्ये, त्याचे उपयोग वर्णिले आहेत. पाळीच्या काळात थकलेल्या स्त्रीमनाला, प्राजक्ताचा सहवास हलकेपण देतो.
 
कमळ - संतुलन आणि निर्मळता
 
कमळ हे भारतीय तत्त्वज्ञानात शुद्धतेचे प्रतीक. चिखलात राहूनही निर्मळ फुलणारे कमळ, स्त्रीच्या अंतर्गत शक्तीची आठवण करून देते. कमळाच्या पाकळ्या आणि बिया, शीतल, मनःशामक आणि हृदयाला बलदायक मानल्या आहेत. अति ताण, मानसिक अस्थिरता आणि पित्तप्रधान प्रकृतीमध्ये, कमळ उपयुक्त समजले जाते.
 
चाफा आणि जाई - सौंदर्यापलीकडील आरोग्य
 
चाफ्याचा मंद गंध आणि जाईची कोमलता मनाला प्रसन्नता देतात. भावनिक स्थैर्य आणि शांत झोपेसाठी, भारतीय स्त्रिया पूर्वी घरात फुले ठेवत असत. हा फुलांचा सहवासच मनोपचाराचे कार्य करत असे. पुष्पौषधी म्हणजे फक्त औषध नव्हे, त्या स्त्रीला निसर्गाशी पुन्हा जोडणारा सेतू आहेत. आजच्या कृत्रिम सुगंधांनी भरलेल्या, बंद वातानुकूलित जीवनात स्त्रीशरीर निसर्गाच्या या सूक्ष्म उपचारांपासून दूर जात आहे. फुलांचा सुगंध, त्यांचे रंग, त्यांचा स्पर्श, त्यांच्याभोवतीची शांतता हे सर्व मनातील ताण कमी करून, हार्मोनल संतुलनासाठी साहाय्यक ठरू शकते. म्हणूनच मासिक पाळीच्या आरोग्याविषयी बोलताना केवळ औषधेच नव्हे, तर जीवनशैली, निसर्ग, सुगंध, शांतता आणि पुष्पौषधींचा कोमल स्पर्शही समजून घ्यायला हवा.
 
दि. २८ मे - एक सन्मानाचा दिवस
 
साधारण २८ दिवसांच्या चक्रानंतर पाच दिवस येणार्‍या मासिक पाळीच्या सन्मानार्थ, दि. २८ मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो. हा दिवस केवळ स्वच्छतेचा नाही; तो स्त्रीच्या शरीराचा आदर करण्याचा दिवस आहे, संकोचाऐवजी संवाद निर्माण करण्याचा दिवस आहे. ‘पाळी’ या शब्दाभोवतीचे कुजबुजणारे कानगोष्टींचे वलय दूर करून, वैज्ञानिक आणि संवेदनशील दृष्टी देण्याचा दिवस आहे. कारण, मासिक पाळी ही लाज नाही, ती स्त्रीत्वाची लय आहे, सृजनाची नांदी आहे आणि निसर्गाने स्त्रीला दिलेला एक अद्भुत उत्सव आहे.
 
डॉ. मधुरा कुलकर्णी
(‘आरोग्य भारती’ कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)