खादी उद्योगाचा 1.87 लाख कोटी रुपयांचा विक्रम!- 2026-27साठी 2.51 लाख कोटींचे लक्ष्य
26-May-2026
Total Views |
मुंबई : (Khadi India) खादी आणि ग्रामोद्योगाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुमारे 1.87 लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय नोंदवल्यानंतर, आर्थिक वर्ष 2026-27 साठी 2.51 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. “आम्ही यावर्षी 2.51 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करुन नवा इतिहास घडवू,” असा विश्वास खादी आणि ग्रामोद्योगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी म्हटले आहे.
भारताच्या इतिहासामध्ये खादीचे महत्त्व स्वातंत्र्यचळवळीच्या काळापासून आहे. मात्र, संपुआच्या काळात दुर्लक्ष झालेल्या खादीला मोदी सरकारच्या काळामध्ये खर्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत. मोदी सरकारने खादी आणि ग्रामोद्योगाची एक परिसंस्था उभारतानाच, जागतिक स्तरावर एक ब्रॅण्ड म्हणूनही खादीचा प्रसार केला.
त्यामुळे जगभरातून आज खादी आणि ग्रामोद्योगाची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे खादी आणि ग्रामोद्योगाच्या व्यवसायातही वाढ झाली असून, आर्थिक वर्ष 2025-26मध्ये खादीने सुमारे 1.87 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा विक्रमही स्थापित केला. आता आर्थिक वर्ष 2026-27साठी खादीकडून 2.51 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाचे लक्ष्यनिर्धारण करण्यात आले आहे. (Khadi India)
खादीला सरकारी पातळीवरून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे व्यवसायवाढीबरोबरच, देशातील तरुणांना रोजगारही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. सध्या खादी उद्योगातून देशभरात दोन कोटींपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती झाली असून, अनेक अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती सातत्याने होत आहे. भविष्यात यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
या क्षेत्रातील कामगारांसाठी शाश्वत उपजीविका आणि बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी, खादी उत्पादने आणि विपणन परिसंस्था मजबूत करण्याचे काम सध्या खादी आणि ग्रामोद्योगाकडून सुरु असून, आज या क्षेत्रातील मालाला बाजारपेठ उपलब्द्ध झाली आहे. खादी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत असून, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गतही खादी उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच, विविध देशांशी केलेल्या मुक्त व्यापार कराराच्या माध्यमातूनही खादीला प्रोत्साहन दिले जात आहे.
तसेच, ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातूनही खादीचा प्रसार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, तरुण ऑनलाईन खरेदीदारांमध्ये खादी उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काळात एक विशेष ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय खादीकडून घेतला जाणार आहे. (Khadi India)
तरुणाईमध्ये आता खादीची फॅशन!
सध्या देशविदेशातील तरुणांमध्ये खादीची लोकप्रियता वाढली असून, 2014 पासून खादीची उत्पादने वापरण्याची एक फॅशन बाजारपेठेत पुढे आली आहे. जागतिक स्तरावरही खादीला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशात अनेक फॅशन शो आयोजित केले जात असून, अलीकडेच ‘मॉस्को फॅशन वीक’मध्येही खादीचा सहभाग होता. (Khadi India)