बालकांवर होणारे अत्याचार हे कोणत्याही समाजाला मान खाली घालायला लावणारेच... असे असतानाही आज या अत्याचारांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. यावर उपाययोजना करताना, अत्याचार करणार्यांच्या कार्यपद्धतीचाही अभ्यास केला गेला. त्यातूनच ‘ग्रूमिंग’चे भयाण वास्तव समोर आले. अत्याचार्यांच्या वर्तनाचा आढावा घेणारा हा लेख...
बालकांवरील लैंगिक अत्याचार ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून, तो आपल्या मानवी व्यवस्थेचाच विदारक पराभव आहे. या विषयावरचे विविध अहवाल दर्शवतात की, बालकांवरील लैंगिक अत्याचार, त्यांच्या असुरक्षिततेचा गैरफायदा घेऊनच केले जातात. कोणत्याही विशिष्ट पार्श्वभूमीचे बालक या धोयापासून पूर्णपणे सुरक्षित नसले, तरीही गुन्हेगारांचे ‘सायकोलॉजिकल प्रोफाईलिंग’ आणि सामाजिक रचना काही बालकांना अधिक असुरक्षित करते. मुलांमधील भावनिक आणि सामाजिक असुरक्षिततेचाच गैरफायदा घेऊन, लैंगिक अत्याचार करणारे विकृत प्रवृत्तीचे लोक अत्यंत पद्धतशीरपणे हे काम करतात. गुन्हेगारी मानशास्त्रानुसार हे प्रेडेटर्स शारीरिक ताकदीपेक्षा, मुलांचा मानसिक कमकुवतपणा आणि असुरक्षिततेचाच ‘शस्त्र’ म्हणून वापर करतात.
मुलांमधील असुरक्षितता लैंगिक शोषणासाठी कशी कारणीभूत ठरते, यामागील मुख्य मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे खालीलप्रमाणे:
१. गुन्हेगारांची मानसिकता आणि ‘ग्रूमिंग’
संशोधनानुसार लैंगिक अत्याचाराचे बहुतांश गुन्हेगार हे अनोळखी नसून पीडितेच्या परिचयाचे, शेजारी किंवा कुटुंबाचे विश्वासूच असतात. हे ‘प्रेडेटर्स’ अत्यंत पद्धतशीरपणे जाळे निर्माण करतात. ज्या मुलांकडे कुटुंबाचे दुर्लक्ष होते, पालकांमध्ये सततचे वाद असतात किंवा ज्या मुलांना एकटेपणामुळे भावनिक असुरक्षितता असते, अशी मुले प्रेमासाठी आणि कौतुकासाठी भुकेलेली असतात. अशा मुलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी, गुन्हेगार ‘ग्रूमिंग’ या अत्यंत छुप्या आणि पद्धतशीर मार्गाचा वापर करतात. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील तीन टप्प्यांत चालते :
१. अति-काळजीचे नाटक : गुन्हेगार सुरुवातीला कुटुंबात आणि बालकाच्या अवतीभोवती वावरताना, अशा असुरक्षित मुलांना हेरतो आणि पटवतो. त्यानंतर तो मुलांवर विशेष लक्ष देणे, त्यांचे अवाजवी कौतुक करणे, त्यांना चॉकलेट्स, खेळणी किंवा भेटवस्तू देण्यास सुरूवात करतो. यामुळे मुलांमध्ये त्या व्यक्तीबद्दल जवळीक आणि विश्वास निर्माण होते.
२. कौटुंबिक घुसखोरी : गुन्हेगार केवळ मुलाशीच नाही, तर अत्यंत चलाखीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी हे विश्वासाचे नाते निर्माण करतो. तो घरात इतका बेमालूमपणे मिसळतो की, त्या कुटुंबाचाच एक महत्त्वाचा भाग वाटतो. यामुळेच पालकांना त्या व्यक्तीवर संशय येत नाही, आणि ते नकळत आपल्या मुलाला त्याच्यासोबत एकटे सोडण्याची चूक करतात.
३. भावनिक अवलंबित्व : हळूहळू मुलाना वाटू लागते की, ही व्यक्ती संपूर्ण जगात आपली सर्वांत मोठी हितचिंतक आणि उत्तम मित्र आहे. मूल भावनिकदृष्ट्याा त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहू लागते. एकदा का हे भावनिक जाळे घट्ट झाले की, गुन्हेगार त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन संवादाची पातळी बदलतो आणि हळूहळू अयोग्य स्पर्शाकडे वळतो.
ही संपूर्ण प्रक्रिया इतकी संथ आणि छुपी असते की, स्वतः बालक किंवा पालकांना सुरुवातीला त्यात काही अयोग्य किंवा गैर घडते आहे, याचा पुसटसाही अंदाज येत नाही. जेव्हा संशय येतो, तोपर्यंत गुन्हेगाराने मुलाच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला असतो.
२. नाकारले जाण्याची भीती : असुरक्षित मुलांना नेहमीच अशी भीती वाटते की, जर आपण समोरच्या व्यक्तीचे ऐकले नाही, तर तो आपल्यावर रागवेल किंवा आपले कौतुक करणे, प्रेम करणे बंद करेल. गुन्हेगार याच भीतीचा पुरेपूर फायदा घेतात. ते मुलांना सांगतात, "जर तू माझं ऐकलं नाहीस, तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही किंवा तुझे लाड करणे सोडून देईन.” आधीच एकटेपणा आणि असुरक्षिततेचा सामना करणारे मूल, हे प्रेम गमावण्याच्या भीतीने शांत राहते आणि अत्याचाराला विरोध करू शकत नाही.
३. खास असण्याची मानसिकता : गुन्हेगार अनेकदा असुरक्षित मुलांना असे भासवतात की, ते इतर मुलांपेक्षा खूप वेगळे, हुशार आणि प्रौढ आहेत. ते मुलांसोबत काही गुपितेही शेअर करतात आणि सांगतात, "हे फक्त आपल्या दोघांमधलं गुपित आहे, कारण तू खूप समजूतदार आहेस. हे घरात कोणाला सांगू नको, नाहीतर ते तुला ओरडतील.” असुरक्षित मुलाला या गुपितामुळे स्वतःबद्दल, आपण कोणीतरी महत्त्वाचे असल्याची भावना निर्माण होते. आपण कोणीतरी विशेष आहोत, या नादात ते अत्याचाराची माहिती पालकांपासून लपवून ठेवतात.
४. कमी आत्मसन्मान: असुरक्षित मुलांचा आत्मविश्वास खूपच कमी असतो. बरेचदा शोषणाची सुरुवात झाल्यावर, गुन्हेगार त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतो. गुन्हेगार मुलाला पटवून देतो की, "यात तुझीही चूक आहे किंवा तूच माझ्या जवळ आला होतास. म्हणून हे घडलं.” आत्मसन्मान कमी असल्यामुळे, मूल स्वतःलाच दोषी मानते. त्यांना वाटते की, जर त्यांनी हे कोणाला सांगितले, तर समाज किंवा पालक त्यांनाच बोल लावतील आणि त्यांनाच शिक्षा होईल.
५. अधिकाराची/हुकूमशाहीची भीती: लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश लोक हे कुटुंबातील, शेजारील किंवा मुलाच्या ओळखीचेच असतात. असुरक्षित मुलांच्या मनात मोठ्या व्यक्तींबद्दल आणि अधिकारावर असलेल्या लोकांविषयी, उपजतच भीतीयुक्त आदरभाव असतो.
गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून, ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हेगार मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला हिंसेची किंवा सामाजिक बदनामीची धमकी देऊन गप्प ठेवतात. गुन्हेगार धमकी देतो की, "मी मोठा आहे, माझं कोणीही ऐकेल, तुझं ऐकणार नाही. किंवा जर तू घरी सांगितलंस, तर मी तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेन किंवा त्यांना नोकरीवरून काढून टाकेन.” मुलांमधील आर्थिक किंवा कौटुंबिक असुरक्षितता उदा. गरीब पार्श्वभूमी किंवा पालकांचे आजारपणामुळे, मूल या धमयांना खरे मानते आणि भीतीखालीच जीवन जगते.
असुरक्षिततेचे सर्वसामान्य घटक - वय, लिंग आणि सामाजिक स्तर
वय आणि लिंग : मुलींवर अत्याचार होण्याची शयता, मुलांपेक्षा पाचपटींनी जास्त असते. वयाच्या सात ते १३ वर्षांदरम्यान, मुले सर्वांत जास्त असुरक्षित असतात. तर, शोषणाचे सरासरी वय नऊ वर्षे असल्याचे समोर आले आहे.
आर्थिक आणि सामाजिक स्थिती : कमी उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्य रेषेखालील कुटुंबांतील मुले, तीन पटींनी अधिक असुरक्षित असतात. पालकांकडे रोजगार नसणे, अमली पदार्थ, दारूचे व्यसन किंवा घरगुती हिंसाचारांमुळे मुलांवरचे लक्ष कमी झाल्याने गुन्हेगारांचे फावते.
ग्रामीण भाग : ग्रामीण भागात राहणारी मुले, शहरी भागातील मुलांपेक्षा जवळपास दोन पटींनी जास्त या विकृतीला बळी पडतात. कारण, तिथे सामाजिक पाळत आणि कायदेशीर मदत मिळण्यात अडचणी असतात. गुन्हेगार सहसा अशीच मुले निवडतात, जी शांत, एकलकोंडी, संकोची किंवा कौटुंबिक तणावाखाली जगत आहेत.