भारत दूर, लाहोर मंजूर!

    26-May-2026
Total Views |
 
Bangladesh Pakistan Strategic Shift
 
बांगलादेशच्या प्रगतीचा वारू रोखून, त्याला धर्मांधतेचे व्यसन लावणार्‍या धर्मांध मोहम्मद युनूस यांची राजवट गेली. बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय झाला आणि तारिक रहेमान बांगलादेशचे पंतप्रधान झाले. अर्थात, त्यांच्यासमोर असलेल्या विरोधकांपेक्षा हे बरे, असे म्हणतच जनतेने त्यांना बांगलादेशच्या विकासासाठी अधिकारसूत्रे सोपवली. भारतानेही बांगलादेशला परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हरतर्‍हेने मदत केली. मात्र, सत्तेत आल्यापासून तारिक रहेमान यांनी सातत्याने भारताला डिवचण्याचाच एककलमी कार्यक्रम राबवला आहे. आधीच, रहेमान यांच्या सरकारने ते पहिला दौरा चीनचा करणार असल्याचे जाहीर करून, आमच्या पुढील राजकारणात चीनचे महत्त्व भारतापेक्षा अधिक राहणार असल्याचे सुप्त संकेत दिले होते. भारताने यावर बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. आता त्याच्याही पुढे जात बांगलादेशने त्यांच्या अधिकार्‍यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर बांगलादेशचे अधिकारी भारतात मसुरी येथे प्रशिक्षण घेत होते.
 
पाकिस्तानात बांगलादेशच्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय म्हणजे, निव्वळ जळते घर भाड्याने घेण्याचाच प्रकार आहे. मुळातच, एक देश दुसर्‍या देशात आपल्या अधिकार्‍यांना प्रशिक्षण घेण्यास पाठवतो, त्यामागे दोन कारणे स्पष्ट असतात. एक म्हणजे, त्या देशाशी संबंध अधिक दृढ करायचे असल्याने, त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेची माहिती आपल्या अधिकार्‍यांना मिळावी आणि दुसरे म्हणजे, समोरच्या देशातील प्रगत प्रशिक्षण पद्धतीचा लाभ आपल्या अधिकार्‍यांना व्हावा. पाकिस्तानच्या बाबतीत विचार केल्यास, त्यांच्याकडे राजनैतिक शहाणपणाची असलेली वानवा संपूर्ण जगाला ज्ञात झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे धोरणच या निर्णयामागे असावे, अशी अटकळ जागतिक राजकारणात मांडली जात आहे.
 
विनोद म्हणजे, बांगलादेशच्या या निर्णयामुळे सध्याची त्यांची स्थिती ‘आधीच झाले थोडे, त्यात व्याह्याने धाडले घोडे’ अशीच झाली आहे. बांगलादेशने या प्रशिक्षणाच्या पूर्ण खर्चाचा भार पाकिस्तानवरच टाकल्याने, आर्थिकसंकट गळ्यापर्यंत आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा श्वास गुदमरण्याची शक्यताच अधिक आहे.
 
इथे प्रश्न फक्त प्रशिक्षणाचाच नाही, तर गुणवत्तेचाही आहे. पाकिस्तानची अवस्था आज जगापासून लपून राहिलेली नाही. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश, सतत बदलणारी सरकारे, लष्कराचे वर्चस्व, धार्मिक कट्टरतेचा प्रभाव आणि दहशतवाद या सगळ्यांमुळे पाकिस्तानची प्रतिमा आज जगभरात मलिन आहे. अशा व्यवस्थेतून बांगलादेशचे अधिकारी, नेमके कोणते आधुनिक धडे घेणार? ज्या पाकिस्तानला स्वतःच्या देशात स्थैर्य टिकवता आले नाही, त्यांच्याकडून प्रगत लोकशाहीचे धडे मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे, मृगजळामागे धावण्यासारखे आहे. उलट, अशा प्रशिक्षणातून जिहादी आणि पाकिस्तानधार्जिणी मानसिकताच अधिक मजबूत होण्याची भीती आहे.
 
युनूस सरकारने बांगलादेशच्या वायुदलात जिहादी मानसिकतेचे सैन्य भरती केले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याबाबत बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांना सजग केल्याने, संबंधितांवर कारवाई झाली. मात्र, त्यानंतरच्या या निर्णयामुळे दोन्ही निर्णयांतील परस्परविरोधच अधोरेखित झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात, भारत-बांगलादेश संबंधांनी नवे शिखर गाठले होते. त्याचा लाभ बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला झाला. सध्या मात्र, स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली भारतापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न बांगलादेशकडून सुरू आहे.
 
परराष्ट्र धोरणात प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो. परंतु, त्याची एक किंमतही असते. पाकिस्तानकडे झुकण्याच्या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम, हे धोकादायकच असणार आहेत. भारताबरोबर सांधलेला विश्वासाचा सेतू कमकुवत करत, पाकिस्तानबरोबर उम्माचा फर्ज निभावणार्‍या बांगलादेशला, पाकिस्तानकडून आधुनिक प्रशासनाचे धडे मिळण्यापेक्षा ‘जिहाद’चा वारसाच मिळण्याची शयता अधिक आहे आणि हा जिहाद बांगलादेशच्या स्वप्नांची नक्कीच राखरांगोळी करणारा ठरेल, यात शंका नाही.
 
कौस्तुभ वीरकर