‘शास्त्रीय रील्स’चे यश...

    25-May-2026
Total Views |
Yash Salunke
 
पाश्चात्त्य संस्कृतीचे स्तोम माजले असताना, आर्य-संस्कृतीतील विविध शास्त्रांचे महत्त्व आणि उपयोजन ‘रील्स’च्या माध्यमातून समजावून सांगणार्‍या यश साळुंके याच्याविषयी...
 
सनातन आर्य-संस्कृतीला पूर्वीच्या काळी जगभरात मानाचे स्थान असताना, आज आपण ती संस्कृती सोडून पाश्चात्त्य संस्कृती आपलीशी करण्याच्या मागे का लागलो आहोत? परदेशी संशोधकांनी-अभ्यासकांनी आपल्याला सांगितलेल्या असंख्य गोष्टी आपल्याच ग्रंथांत काहीशे वर्षांपूर्वीच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवल्या आहेत. पण, दुर्दैवाने आपण आपली शास्त्रे न वाचता, परदेशी ज्ञानालाच आपले मानत आहोत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला आपल्या शास्त्रांचे महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्या पटवून देण्यासाठी एक तरुण रात्रंदिवस कष्ट करतोय. वेगवेगळी शास्त्रे अभ्यासून त्यांचा आपल्या आजच्या दैनंदिन जीवनाशी मेळ घालून दाखवतोय. तो तरुण म्हणजे, ‘रीलस्टार’ यश साळुंके!
 
यशचे बहुतांश शालेय शिक्षण ‘कॉन्व्हेंट’मध्ये झाल्यामुळे तेथे आर्य-संस्कृतीविषयी संस्कार होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. परंतु, त्याच्या घरात आध्यात्मिक वातावरण होते. यशच्या बालपणापासूनच त्याची आई नेमाने मंत्र-जप, ‘अथर्वशीर्ष’ पठण करत असे. यशलाही ‘भगवद्गीता’ आणि इतर आध्यात्मिक ग्रंथ वाचायला लावत असे; पाठांतर घेत असे. त्यावेळी यशला बहुतांशी गोष्टींचा अर्थ कळत नसे. पण, चालीवर म्हणायला त्याला आवडे आणि अंतिमतः मनाला शांतता मिळते, असा त्याचा दैनंदिन अनुभव होता. असे का वाटते? ही काय शक्ती आहे? असे असंख्य प्रश्न त्याला सतावत असत. ती उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती.
 
याच काळात त्याला एक गुरू भेटले. त्यांनी त्याला संस्कृत व्याकरणाची तोंडओळख करून दिली. आतापर्यंत फक्त घोकंपट्टी केलेल्या श्लोक-स्तोत्रांचा यशला सार्थ बोध होऊ लागला. पण, ते गुरुजी निवर्तले आणि यशचा संस्कृतचा अभ्यासही खुंटला.
त्यानंतर बराच काळ ‘संस्कृत’ जणू अडगळीच्या खोलीतच पडून राहिले. यशला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. आंतरशालेय स्पर्धांसाठी सकाळ-संध्याकाळ सराव आणि नववी-दहावीचा वाढता अभ्यास यातच त्याचा दिवस सरत असे.
 
खेळाच्या उत्तम संधी असणारे एक महाविद्यालय निवडून त्याने तिथे ‘बीकॉम’पर्यंत शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना त्याने क्रिकेटमध्ये राज्य स्तरावर नाव कमावले. पण, याच काळात ‘कोविड’मुळे ‘लॉकडाऊन’ लागले आणि यशचा क्रिकेटचा सराव तब्बल अडीच वर्षांसाठी बंद झाला.
 
‘लॉकडाऊन’मध्ये सर्वांनीच केलेले पहिले काम म्हणजे कपाटे आवरणे! त्यातच यशला त्याच्या गुरूंनी दिलेली संस्कृतविषयक पुस्तके मिळाली. त्यातील सामान्य माहिती वाचून त्याला भारतीय ‘वैद्यकशास्त्र’, ‘योगशास्त्र’ इत्यादी पुरातन शास्त्रांविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्याने ‘गूगल’वर शोधले, तर पुरातन ग्रंथ जतन करणार्‍या अशा अनेक साईट्सवर त्याला बरेच साहित्य वाचायला मिळाले. आर्यभट्टांचा शून्याचा शोध आणि आपल्या शास्त्रकारांनी लिहिलेले असे असंख्य ग्रंथ यशने ‘लॉकडाऊन विरंगुळा’ म्हणून दिवस-रात्र तहान-भूक हरपून अभ्यासले. आध्यात्मिक ग्रंथ वाचत असल्यामुळे संस्कृत वाचनाची सवय होतीच. शिवाय, काही पुस्तकांची भाषांतरेदेखील उपलब्ध होती. पण, तरीही त्याला असे जाणवले की, आजच्या काळात वापरली जाणारी आणि पूर्वीच्या ग्रंथांमधली संस्कृत भाषा यांत खूप फरक आहे. पूर्वीची भाषा समजून घेण्यासाठी यशने संस्कृतचे जाणकार आणि गणिताचे प्राध्यापक के. बालसुब्रमण्यम् यांच्या युट्यूब चॅनेलची मदत घेतली. असे स्वयंअध्ययन करता-करता यशला ‘पायथागोरसचा सिद्धांत’देखील आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये लिहिलेला सापडला आहे.
 
यावर चिंतन करता, यशला असे जाणवले की, काही वैज्ञानिक संकल्पना, ‘भगवद्गीता’ यांचा आजच्या काळातही आपण जसाच्या तसा वापर करतोय किंवा नक्कीच करू शकतो. अत्तरनिर्मितीचे तंत्र आणि त्यातील वैविध्य वाचून तर यशला असे वाटले की, आपण परदेशी तंत्रांनी बनलेले ‘पर्फ्युम’ का वापरतो?
 
आपल्या शास्त्रांचे महत्त्व पाश्चात्त्य संस्कृतीकडे ओढल्या जाणार्‍या आजच्या तरुण पिढीला पटवून द्यायलाच हवे, असे यशच्या मनात आले. त्यासाठी त्याने कालानुरूप असा ‘रील्स’चा मार्ग निवडला. विषय अवजड असल्यामुळे अर्थातच, ‘रील्स’ची शृंखला करतो. कठीण विषय असेल, तर तो हिंदी किंवा इंग्रजीतून मांडतो. पण, विनोदी रील्स करताना मात्र संस्कृतमध्येच बोलण्यास प्राधान्य देतो. भाषेचा अडसर न ठेवता विषय लोकांपर्यंत पोहोचवणे, हेच यशचे ध्येय आहे.
 
ग्रंथ अभ्यासून ‘रील’ची स्क्रिप्ट लिहिणे, फोटो-ग्राफिक्स, शूटिंग, एडिटिंग, डबिंग हे सगळे तो एकटेच करत असल्यामुळे त्याचा आवाका मर्यादित राहतो. पण, तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्या ‘शास्त्रीय रील’ उपक्रमाला आता दीड वर्ष पूर्ण होत आहेत. यशची लवकरच ‘भगवद्गीते’विषयीची शृंखला येत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये यश साळुंकेच्या ‘रील्स’चा केलेला उल्लेख, हीच तो त्याच्या कामाची पोचपावती मानतो.
 
आपली शास्त्रे आपल्याला केवळ विषयाचेच ज्ञान देत नाहीत, तर जीवनाकडे पाहण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन देतात; एक चांगला माणूस बनवतात. प्रत्येक हिंदूला आपल्या शास्त्रांची किमान तोंडओळख असलीच पाहिजे, असे यशचे मत. त्यासाठीच तो खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. यशला त्याच्या कार्यात उत्तरोत्तर यश मिळत जावो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

ओवी लेले
९८६९३४५७५३