खेळामध्ये सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी तंदुरुस्तीवर विशेष मेहनत घ्यावी लागते, तंदुरुस्तीने खेळाचा दर्जा सुधारत असल्याचे विराट कोहलीने सिद्ध केले आहे. हॉकीमध्येही ही तंदुरुस्ती अतिविशेष दर्जाची राखली जाते. हॉकी आणि क्रिकेट या दोन खेळातील तंदुरुस्तीचा या लेखात घेतलेला आढावा...
भारतातील क्रिकेटच्या अनन्यसाधारण महत्त्वाची जाणीव, हॉकीसारख्या क्रिकेटेतर क्रीडापटूंना आहे. यातील अनेक हॉकीपटू क्रिकेटपटूंचे चाहतेही असतात. समाजमाध्यमांवर कोट्यवधी अनुयायी असलेल्यांच्या गळ्यातील ताईत असलेले आपण बघतो. देशातील चाहत्यांचे त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंवर जीवापाड प्रेम असते. समाजमाध्यमे किंवा प्रत्यक्ष भेटण्यासाठीही ते प्रचंड उत्सुक असतात. उदाहरणार्थ, भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू ऋतुजा पिसाळने तिच्या एका मुलाखतीत क्रिकेट आणि विराट कोहलीचा उल्लेख केला होता. देशातील इतर अनेक खेळाडूंप्रमाणेच, ऋतुजाही विराट कोहलीला आपला आदर्श मानते. कोहली सारखीच ’विराट’ कामगिरी, ऋतुजाला हॉकीमध्ये करायची आहे. अशाचप्रकारे क्रिकेटपटूंची मोहिनी हॉकीतील अनेक खेळाडूंवर आहे.
भारतीय क्रिकेटचा जगप्रसिद्ध फलंदाज विराट कोहलीने, भारतीय हॉकी खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या दर्जाचे कौतुक केले. त्याने याला, ‘खेळाच्या गरजा आणि त्याप्रति असलेल्या समर्पणाची पोचपावती’ असेही संबोधले. मंगळवार, दि. १९ मे रोजी आयोजित ‘आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’च्या कार्यक्रमादरम्यान, विराट कोहलीने हे विधान केले. या कार्यक्रमादरम्यान कोहली म्हणाला की, "आपल्या देशात क्रिकेट इतके केंद्रस्थानी असते की, आपण अनेकदा इतर खेळांकडे दुर्लक्ष करतो.” त्याने पुढे असेही नमूद केले की, "भारतीय हॉकीपटूंच्या तंदुरुस्तीच्या तुलनेत, क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती ही १५ टक्केही नसते.”
जगातील सर्वांत प्रसिद्ध खेळाडूंपैकी एकाने केलेल्या कौतुकामुळे, भारतीय हॉकीपटू भारावून गेले आहेत. महान भारतीय क्रिकेटपटू आणि ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ संघाचा आधारस्तंभ असलेल्या विराटने, हॉकीतील शारीरिक गरजांची दखल घेत, भारतीय हॉकीपटूंच्या तंदुरुस्तीच्या मानकांवर प्रकाशही टाकला. तसेच, अनेकदा दुर्लक्षित राहणार्या हॉकीच्या एका पैलूकडेही लक्ष वेधले. मंगळवारी झालेल्या ‘आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’च्या कार्यक्रमादरम्यान, कोहलीने खेळातील ‘फिटनेस’च्या महत्त्वावरही त्याचे विचार व्यक्त केले. त्यावेळी तो म्हणाला की, "मला माहीत आहे की, लोक कधीकधी फिटनेसकडे काहीतरी विलक्षण म्हणून पाहतात. पण, माझ्या कामाची ती एक गरज आहे. त्यामुळे ती एक सामान्य गोष्टच असायला हवी. आपल्या देशात क्रिकेटवर इतके लक्ष केंद्रित केले जाते की, आपण अनेकदा इतर खेळांकडे दुर्लक्ष करतो.”
"खरे सांगायचे तर, आम्हा क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती भारतीय हॉकीपटूच्या १५ टक्केसुद्धा नाही. जर हॉकीपटूंनी आमचे सराव सत्र पाहिले, तर ते कदाचित हसतील. कारण, त्यांच्या खेळात आमच्या पेक्षाही खूपच जास्त शारीरिक क्षमतेची गरज असते,” असेही विराटने या कार्यक्रमात म्हटले.
विराट कोहलीच्या वक्तव्यांचे भारतीय हॉकीवर्तुळात सकारात्मक पडसाद उमटले असून, खेळाडू या स्तुतीकडे अथक परिश्रमाची आणि शिस्तीची पोचपावती म्हणून पाहत आहेत. कोहलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनेही विराटबरोबरच्या एका भेटीची आठवण सांगितली. तो म्हणाला की, "विराटच्या शब्दांना या खेळासाठी खूपच महत्त्व आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान, आमची फिटनेसवर एक छान चर्चा झाली. त्याने मला सांगितले की, हॉकी हा खूप वेगवान खेळ आहे आणि त्याला आमच्या फिटनेसच्या मानकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. आम्ही ‘यो-यो टेस्ट’विषयी चर्चा केली. आणि जेव्हा मी त्याला सांगितले की, आमचे गोलरक्षकसुद्धा ‘यो-यो टेस्ट’मध्ये २०पेक्षा जास्त गुण मिळवतात, तेव्हा त्याला खरोखरच आश्चर्य वाटल्याचे” हरमनप्रीत सिंगने म्हटले. तसेच पुढे चर्चेविषयी सांगताना हरमनप्रीत सिंग म्हणाला की, ”आमची विविध विषयांवर एक उत्तम चर्चा झाली आणि आम्ही प्रशिक्षण व फिटनेसबद्दलचे अनुभवही एकमेकांना सांगितले. मी आभारी आहे की, विराटसारख्या व्यक्तीने हॉकीतील फिटनेस मानकांकडे लक्ष वेधले. कारण, आमचा खेळ हा जगातील सर्वांत वेगवान आणि शारीरिकदृष्ट्या सर्वांत आव्हानात्मक खेळांपैकी एक आहे. अशाप्रकारची प्रशंसा हॉकीसाठी खूप महत्त्वाची आहे,” असेही हरमनप्रीत म्हणाला.
शारीरिक तंदुरुस्तीबद्दल हे जरी सत्य असले, तरी भारतामध्ये क्रिकेटला असलेल्या अनन्यसाधारण महत्त्वाकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘फॅनॅटिक स्पोर्ट्स’ आणि ‘हुरून इंडिया’ यांनी नुकताच ‘मोस्ट व्हॅल्युएबल स्पोर्ट्स टीम्स २०२६’ हा अहवाल प्रसिद्ध केला. हा भारतातील पहिलाच ‘बहु-क्रीडा’ आणि ‘बहु-लीग’ अहवाल असून, यात अहवालामध्ये ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल), ‘विमेन्स प्रीमियर लीग’ (डब्ल्यूपीएल), ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल), ‘प्रो-कबड्डी लीग’ (पीकेएल), ‘हॉकी इंडिया लीग’ आणि ‘प्राईम व्हॉलीबॉल लीग’ या सहा भारतीय क्रीडा ‘लीग्स’मधील फ्रॅन्चायझींचे मूल्यांकन, खेळाडूंचे मापदंड, मालकीची संस्था आणि कामगिरीचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक कमाई करणार्या महिलांच्या यादीत, स्मृती मानधना पहिल्या स्थानावर आहे. पुरुषांमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली व हॉकीपटू हरमनप्रीत सिंग यांच्या कमाईतील फरकही, या अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, विराट कोहली २३० कोटी रुपये कमावतो, तर दुसरीकडे हरमनप्रीत सिंगने ‘हॉकी इंडिया लीग’मधून केवळ ७८ लाख रुपये कमावले आहेत. क्रिकेटपटू हे हॉकीपटूंपेक्षा आर्थिकदृष्ट्या अग्रेसर असले, तरी शारीरिक तंदुरुस्तीत हॉकीच सरस असल्याचे आढळते.
अनुभवी ‘मिडफिल्डर’ मनप्रीत सिंगनेही असेच मत व्यक्त केले असून, आधुनिक हॉकीमध्ये यश मिळवण्यासाठी उच्च दर्जाची तंदुरुस्ती का आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला. "आजचा हॉकीचा खेळ प्रचंड वेगवान झाला आहे. या खेळात चेंडू काही सेकंदातच एका टोकापासून, दुसर्या टोकापर्यंत जातो. यादरम्यान, खेळाडू सातत्याने वेगवान हालचाल करत, खेळातील योजनांना मूर्तरुप देत असतात. म्हणूनच या खेळासाठी, कमालीच्या उच्च अशा तंदुरुस्तीची आवश्यकता असते. कारण, हा खेळ वेग, क्षमता यावर अवलंबून असून, सातत्याने धावणे हाच खेळाचा गाभा आहे. या खेळासाठी लागणारी तंदुरुस्ती केवळ शारीरिकच नव्हे, तर तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मानसिकदृष्ट्याही तयार ठेवते,” असे मनप्रीत सिंग म्हणाला.
तसेच विराट कोहलीच्या वक्तव्याबाबत भाष्य करताना मनप्रीत सिंगन म्हणाला की, ”विराट जगातील सर्वांत तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक असून, त्याने भारतीय क्रिकेटमधील फिटनेस-संस्कृतीमध्ये क्रांती घडवली आहे. त्याची शिस्त, वचनबद्धता आणि जीवनशैली आज लाखो लोकांना प्रेरणा देते. त्याच्यासारख्या व्यक्तीने आमची मेहनत आणि फिटनेसची दखल घेणे, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याने आमच्या फिटनेसची गोष्त जगासमोर आणल्याने आम्ही त्याचे आभारी आहोत,” असेही मनप्रीत म्हणाला.
भारतीय हॉकीचा ‘स्टार मिडफिल्डर’ हार्दिक सिंग यानेही विराटच्या वक्तव्यावर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, "कोहलीच्या वक्तव्यामुळे, हॉकीपटूंच्या मेहनतीला प्रसिद्धी मिळाली आहे. विराट कोहलीने अनेक वर्षे प्रचंड दबावाखाली भारतासाठी उत्तुंग कामगिरी केली आहे. त्याने तंदुरुस्तीचे असे मापदंड स्थापित केले आहेत की, ज्याकडे सर्व खेळांमधील खेळाडू आदरानेच पाहतात. त्यामुळे जेव्हा विराटसारखी व्यक्ती हॉकीविषयी असे म्हणते, तेव्हा हॉकीजगतासाठी ते खूप महत्त्वाचे ठरते.”
तसेच हॉकीमध्ये असलेल्या श्रमाविषयी भाष्य करताना हार्दिक सिंगने अधोरेखित केले की, ”हॉकी खेळाडूंच्या तंदुरुस्तीला कधीही कमी लेखू नये. आम्ही ‘प्रो-लीग’ आणि ‘ऑलिम्पिक’सारख्या स्पर्धांमध्ये, सलग सामने खेळतो. तिथे आम्हाला अवघ्य्या ११ दिवसांतच, सात सामने खेळावे लागतात. यासाठी सर्वोच्च तंदुरुस्ती आणि जलद विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे विराटसारख्या दिग्गजाचे शब्द, आम्हा सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहेत.”
आता कोहलीकडून कौतुक झाल्याने, भारतीय हॉकीचा फिटनेस अधिकच प्रकाशझोतात आला आहे. हे कौतुक या खेळाच्या सर्वोच्च पातळीवरील स्पर्धेत आवश्यक असलेली तीव्रता, शिस्त आणि तयारी यांचे प्रतिबिंब ठरते. हॉकीपटूंची मैदानावरील चपळता अत्यंत वेगवान, आक्रमक आणि सातत्याने दिशा बदलणारी असते. खेळादरम्यान, खेळाडूंना सतत पुढे-मागे आणि दोनही बाजूला लहान अंतराचे ‘स्प्रिंट्स’ मारावे लागतात. धावताना खेळाडूंचे शरीर नेहमीच पुढे झुकलेले असते. हॉकीच्या मैदानातील वेगाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे :
लहान अंतराचे स्प्रिंट्स : हॉकीत खेळाडू साधारणपणे १५ ते २० मीटर अंतराचे स्प्रिंट्स मारतात. हे स्प्रिंट्स प्रतिसेकंदात अतिशय वेगाने, ९० ते १०० टक्के क्षमतेने मारले जातात.
स्टॉप आणि स्टार्ट : हॉकीमध्ये सातत्याने धावणे आणि थांबणे आवश्यक असते. खेळाडू मैदानात एकाच लयीत पळण्याऐवजी, अचानक वेग वाढवून चेंडूवर ताबा मिळवण्याचा किंवा बचाव करण्याचाही प्रयत्न करतात.
चेंडूसमवेत धावणे : चेंडू हाताळताना धावणे, ही एक कला आहे. जेव्हा खेळाडू दोन हातांनी ‘स्टिक’ पकडतात, तेव्हा त्यांचा वेग नियंत्रित असतो. परंतु, एका हाताने ‘स्टिक’ पकडून धावताना, जास्त वेग मिळवणे शय होते.
दिशा बदलण्याची क्षमता : हॉकीपटूंचा खेळ फक्त सरळ रेषेत धावण्यावर अवलंबून नसतो. त्यांना प्रतिस्पर्ध्याला चकवण्यासाठी अचानक डावीकडे-उजवीकडेही वळावे लागते. यासाठी शारीरिक समतोल आणि पायांची ताकद अत्यंत महत्त्वाची ठरते.
पुरुष हॉकी संघासाठी ‘यो-यो’ची किमान मर्यादा २२ ते २३च्या दरम्यान असणे बंधनकारक असून, गोलरक्षकासाठी ती किमान २० आहे. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ‘मिडफिल्डर’ हार्दिक सिंग यांच्यासह, अनेक खेळाडू यात येतात. भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग यांनी, ‘यो-यो टेस्ट’मध्ये २१.४ हा सर्वोच्च स्तर नोंदवला होता. ज्युनिअर महिला हॉकी संघातील खेळाडू १७ ते १८ इतका स्तर नोंदवतात. हा स्तर क्रिकेटपटूंच्या सरासरी ‘यो-यो’ स्तराच्या बरोबरीचा आहे. शारीरिक तंदुरुस्ती खेळाडूंसाठी कशी महत्त्वाची असते, ते क्रीडाप्रेमींना या हरमनप्रीत-विराटच्या गोष्टीतून स्पष्ट होईल.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९३७०२९९५२९