सर्व आस्मानी संकटांवर मात करत, गेटवे ऑफ इंडिया ते ट्रॉम्बे जेट्टीदरम्यानचा कठीण समुद्रीप्रवास९ तास ३९ मिनिटांत पूर्ण करणार्या स्वरा सावंत हिच्याविषयी...
स्वराचा जन्म दि. १९ नोव्हेंबर २००६ रोजी ठाण्यात झाला. तिचे मूळ गाव सिंधुदुर्गातल्या मालवणमधील हेदूळ. स्वराचे बालपण सुरुवातीला बदलापूर येथे गेले. स्वरा तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी. तिचे प्राथमिक शिक्षणही बदलापूरमधील कारमेल कॉन्व्हेंट स्कूलमध्येच झाले. स्वराला लहानपणापासूनच पाण्यात खेळण्याची आवड होती. त्यामुळेच स्वराला ‘स्विमिंग’ शिकण्याची इच्छा झाली. स्वराच्या लहानपणी, तिचे आई-वडील तिला घेऊन एकदा वॉटरपार्कला सहलीसाठी गेले होते. तेव्हा त्या वॉटरपार्कमध्ये जलक्रीडा करण्यात स्वरा पूर्णपणे रमली होती. त्यावेळी तिच्या पालकांनी स्वराला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वराने पाण्याबाहेर न येण्याचा हट्टच धरला. त्यातूनच स्वराला असलेली पाण्याची आवड पालकांच्या लक्षात आली. स्वराच्या आईवडिलांनी तिला जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले. त्यामुळे स्वराचा या क्षेत्रातील प्रशिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पण, बदलापूर येथे उत्तम जलतरण शिकण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, असे वाटल्याने स्वराच्या पालकांनी बदलापूर सोडून ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला. स्वराच्या छंदासाठी तिचे कुटुंब ठाण्यात स्थलांतरित झाले.
पुढे स्वराचे पाचवीपासूनचे शिक्षण ठाण्यातच झाले. घोडबंदर रोडवरील सरस्वती विद्यालयात स्वराचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे अकरावी आणि बारावीचे शिक्षण तिने शीव येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून पूर्ण केले. सध्या ती रामनारायण रुईया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे या दरम्यान एका बाजूला ‘स्विमिंग’चा सरावदेखील तिने सुरूच ठेवला होता.
स्वराचे वडील संदेश हे ग्राफीक डिझायनर आहेत. त्यांचा ठाण्यामध्ये ‘व्हिज्युअस ट्रिट’ या नावाने, स्वत:चा डिझाईन स्टुडिओदेखील आहे, तर स्वराची आई नीतादेखील ग्राफीक डिझायनर म्हणून ‘रेमंड होम’मध्ये कार्यरत आहेत.
स्वराने ‘रूपाली रेपाळे जलतरण अकादमी’ येथून , प्रशिक्षण घेतले आहे. रूपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक हे स्वराचे या क्षेत्रातील गुरु. स्वरा दररोज नित्यनेमाने सकाळी तीन ते चार तास सराव करते. हा सराव ती ‘रामचंद्र ठाकूर तरणतलाव, ठाणे’ आणि ‘ऑलिम्पिक क्रीडा केंद्र,’ ‘लेकशोर ग्रीन्स, डोंबिवली’ येथे चालतो. २०१७ मध्ये स्वराने, तिच्या जलतरण क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने आजवर कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला तिने ‘डीएसओ’ २०१८साली, ५० मीटर ‘बटरफ्लाय’ प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. पुढे २०१९साली याच प्रकारात दुसरा क्रमांक आणि २०२२च्या ‘डीएसओ’मध्ये पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला. २०२२ मध्ये ‘आदित्य ठाकरे चषक जलतरण स्पर्धे’तही तिने, ५० मीटर ‘फ्री-स्टाईल’ आणि ‘ब्रेस्टस्ट्रोक’ प्रकारात तिसरा क्रमांक पटकाविला. २०२३ सालच्या ‘डीएसओ’मध्ये १०० मीटर ‘बॅकस्ट्रोक’मध्ये, स्वराला रौप्य पदक मिळाले होते. यावेळी तिची विभागीय स्तरावर निवड झाली. २०२३च्याच विभागीय स्तरावरच्या १०० मीटर ‘बॅकस्ट्रोक’मध्ये, तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. याच कामगिरीमुळे तिची राज्यपातळीवरही निवड झाली.
पुण्यातील बालेवाडी येथे तिने सहावा क्रमांक पटकावला. २०२४ मध्येही तिने ‘बॅकस्ट्रोक’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘ब्रेस्टस्ट्रोक’ प्रकारात चांगली कामगिरी करत, तिसरा क्रमांक पटकावला. स्वराला ‘स्विमिंग’ स्पर्धेत आजवर कायमच दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागत होते. मात्र, २०२४च्या ‘डीएसओ’ स्पर्धेत १०० मीटर ‘फ्री-स्टाईल’ प्रकारात, स्वराने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर, ‘बॅकस्ट्रोक’ आणि ‘बटरफ्लाय’ प्रकारात तिला पुन्हा कांस्य पदक मिळाले. तर, विभागीय स्तरावर तिने तिसरा क्रमांक पटकावला. २०२५ मध्ये स्वरा आंतर विद्यापीठीय स्पर्धा खेळली. यात तिने २०० मीटर ‘बटरफ्लाय’ प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
राज्यपातळीवरही स्वराने गोवा येथे उत्तम कामगिरी करत, एक किलोमीटरच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. सुरुवातीला समुद्र पोहण्याच्या स्पर्धेत तिने, सिंधुदुर्ग येथे पाच किलोमीटरच्या स्पर्धेत नववे स्थान मिळवले. समुद्रात दीर्घ अंतर पोहणे, यात तिने धरमपूर जेट्टी, अलिबाग ते गेटवे हे अंतर २०२३ मध्ये पार केले. हे ३६ किलोमीटरचे अंतर तिने, अवघ्या ८ तास ५४ मिनिटांत पार करत सगळ्यांचीच वाहवा मिळविली.
२०२४ मध्ये स्वराने राष्ट्रीय पातळीवर तिच्या कलेची चुणूक दाखवली. भागीरथी नदीचा १९ किमीचा प्रवास तिने दोन तास, ४७ मिनिटांत पूर्ण केला. यावेळीही ती नवव्या स्थानावर होती. नुकताच स्वराने अरबी समुद्रात नवा इतिहास रचला आहे. स्वराने गेटवे ऑफ इंडिया ते ट्रॉम्बे जेट्टी आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडिया, असे तब्बल ४० किमीचे अंतर पोहून एका नव्या विक्रमाची नोंदही केली. समुद्रात पोहण्याचा एक नवा विक्रम करण्याचा, स्वराचा करायचा मानस आहे. या जलतरणपटूला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!