श्रीक्षेत्र शिर्डी आता भक्तिभूमीसोबतच नव्या ‘डिफेन्स लस्टर’च्या माध्यमातून देशाची मोठी शक्तिभूमी ठरणार आहे. शस्त्रास्त्र निर्यातीतील महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण झेप आणि राज्यातील विकासाच्या विस्तारामुळे, ‘श्री’ अर्थात लक्ष्मी या न्यायाने, हा संपूर्ण परिसर खर्या अर्थाने आर्थिक समृद्धीचे ‘श्री’क्षेत्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.
काही दशकांपूर्वी भारताची ओळख जगातील ‘सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश’ अशी होती. मात्र, आता हे चित्र वेगाने बदलते आहे. संरक्षण उत्पादनात ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याच्या दिशेने राज्याने टाकलेले पाऊल, ऐतिहासिक असेच. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, ‘निबे’ समूहाच्या तब्बल तीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या ‘डिफेन्स लस्टर’चे लोकार्पण नुकतेच पार पडले. या लस्टरमध्ये ‘सूर्यास्त्र’, ‘त्र्यंबक’, ‘पिनाका रॉकेट प्रणाली’ यांसारखी, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वर्षाला पाच लाख तोफगोळे तयार होणार आहेत. भारत आज स्वतःची गरज भागवून, शस्त्रास्त्र निर्यातीतही मोठी झेप घेत आहे. देश शस्त्रास्त्रे निर्यात करतो, तेव्हा जागतिक राजकारणात त्याचा दबदबा वाढतो. या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा वाढल्याने, विदेशी चलन थेट राज्याच्या तिजोरीत जमा होणार आहे. फ्रान्स, अमेरिका, इस्रायल यांसारख्या देशांतील संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्या, आता गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देत आहेत. यामागे राज्यातील दळणवळण, समृद्धी महामार्ग, ‘जेएनपीटी’सारखी आंतरराष्ट्रीय बंदरे आणि कुशल मनुष्यबळ ही प्रमुख कारणे आहेत.
आजवर महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पुणे या ‘सुवर्ण त्रिकोणा’पुरता मर्यादित होता. त्यामुळे या महानगरांवर लोकसंख्येचा आणि पायाभूत सुविधांचा प्रचंड ताण आला. राज्य सरकारने आता विकासाच्या आडव्या विस्ताराला गती दिली आहे. संरक्षण आणि ‘एरोस्पेस’ उद्योगांना विस्तीर्ण जागेची आवश्यकता असते, जी महानगरांमध्ये उपलब्ध नसते. त्यामुळे हे मोठे उद्योग आता नैसर्गिकरीत्या शिर्डी, अहिल्यानगर, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांकडे वळत आहेत. विकासाचे हे विकेंद्रीकरण, खर्या अर्थाने राज्याच्या शाश्वत विकासाची नांदी आहे. यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांचे, रोजगारासाठी महानगरांकडे होणारे स्थलांतर थांबेल आणि राज्याचा प्रादेशिक असमतोल दूर होण्यासही मोठी मदत मिळेल.
कोणताही मोठा प्रकल्प कधीही एकटा नसतो; तो स्वतःसोबत एक संपूर्ण औद्योगिक परिसंस्था घेऊन येतो. शिर्डीतील या ‘डिफेन्स लस्टर’चा सर्वांत मोठा आणि दूरगामी फायदा, आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशाला होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला ‘लष्करी छावणी’चा आणि ‘रणगाडा प्रशिक्षण केंद्रा’चा मोठा इतिहास आहे. पारंपरिक ऊस आणि साखर कारखानदारीवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला, आता उच्च तंत्रज्ञान आणि संरक्षण उद्योगाची भक्कम जोड मिळेल. नाशिकमध्ये आधीपासूनच ‘एचएएल’चा मोठा संरक्षण उपक्रम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ऑरिक सिटी’सारखी जागतिक दर्जाची औद्योगिक वसाहत आहे. शिर्डीत ‘डिफेन्स लस्टर’ आल्यामुळे, नाशिक, शिर्डी आणि संभाजीनगर असा एक नवा औद्योगिक ‘सुवर्ण त्रिकोण’ तयार होईल. या भागात शस्त्रास्त्रांचे सुटे भाग, ‘सेन्सर्स’ आणि इलेट्रॉनिसची निर्मिती करणारे शेकडो सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग उभे राहतील. पुण्यासारखे ‘आयटी हब’ जवळ असल्याने, या शस्त्रास्त्रांच्या संशोधन आणि डिझाईनसाठी पुण्यातील कंपन्यांनाही मोठीच कंत्राटे मिळतील.
महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासात याआधीही काही निवडक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी, दुय्यम व तृतीय श्रेणीतील शहरांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. याचा आढावा घेतल्यास आपल्याला शिर्डीच्या उज्ज्वल भविष्याची नक्कीच प्रचिती येते. ‘संत्र्यांचे शहर’ अशी ओळख असणार्या नागपूरला, ‘मिहान’ प्रकल्पाने देशाचे ‘लॉजिस्टिक’ व ‘एव्हिएशन हब’ बनवले. ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर’अंतर्गत उभारलेल्या ‘ऑरिक सिटी’ने, मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला थेट जागतिक स्तरावर नेले. नाशिकमधील ‘एचएएल’ कारखान्यामुळे तर, आजूबाजूला एक संपूर्ण औद्योगिक परिसंस्थाच उभी राहिली व मोठ्या प्रमाणावर रोजगारही वाढला. बारामती आणि रांजणगाव यांसारख्या शेतीवर अवलंबून असलेल्या पट्ट्यात जागतिक स्तरावरील ऑटो आणि इलेट्रॉनिस कंपन्या आल्याने, तिथली स्थानिक अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलली. याच धर्तीवर आता शिर्डीचाही कायापालट होणार आहे.
या नव्या ‘लस्टर’चा सर्वांत मोठा लाभ, स्थानिक पातळीवरची रोजगारनिर्मिती. या भागातील तरुणांना उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा बंगळुरूकडे जावे लागत होते. आता हजारो अभियंते, तंत्रज्ञ आणि संशोधकांना थेट आपल्याच मातीत नोकर्या मिळतील. कारखान्याला लागणारे सुटे भाग बनवणे, वाहतूक आणि सुरक्षा यांतून अप्रत्यक्ष रोजगाराची मोठी साखळीच निर्माण होईल. स्थानिक ‘आयटीआय’ आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयांनाही आता संरक्षण उत्पादन क्षेत्राचे अभ्यासक्रम सुरू करून, तरुणांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ बनवण्याची मोठी संधी आहे.
आजवर ‘श्री’ म्हणजे, आध्यात्मिक पावित्र्य आणि भक्ती असाच अर्थ शिर्डीच्या संदर्भात घेतला जात होता. परंतु, ‘श्री’ या शब्दाचा मुख्य आणि व्यापक अर्थ, लक्ष्मी किंवा आर्थिक समृद्धी असाही आहे. या तीन हजार कोटींच्या ‘डिफेन्स लस्टर’मुळे उच्च-तंत्रज्ञान, विदेशी चलन आणि भरघोस वेतनाचा रोजगार या माध्यमातून, खर्या अर्थाने लक्ष्मी येथे कायमस्वरूपी वास करणार आहे. या प्रकल्पामुळे शिर्डी आणि परिसराची अर्थव्यवस्था, आता दोन भक्कम खांद्यांवर उभी राहील. एकीकडे दरवर्षी येणार्या लाखो भाविकांमुळे चालणारे पारंपरिक सेवा क्षेत्र आणि दुसरीकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रनिर्मितीतून उभे राहणारे आधुनिक उत्पादन क्षेत्र. गरिबी आणि बेरोजगारीचे सावट दूर होऊन, जेव्हा हा संपूर्ण प्रदेश आणि इथला तरुण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होईल, तेव्हा खर्या अर्थाने शिर्डी ‘श्री’क्षेत्र होईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी, याच महाराष्ट्राच्या भूमीत शस्त्रास्त्रे आणि आरमाराची निर्मिती केली होती. महाराजांचा तोच स्वयंपूर्णतेचा आणि सुरक्षेचा वारसा, आज नव्या आधुनिक रूपात शिर्डीच्या भूमीत अवतरत आहे. भारत शस्त्रास्त्र उत्पादनांचा सर्वांत मोठा निर्यातदार होणार, हा संरक्षणमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यात महाराष्ट्र नेहमीप्रमाणेच सिंहाचा वाटा उचलत आहे. भक्तीच्या माध्यमातून मनाला शांती देणारी शिर्डी, आता संरक्षण उत्पादनातून देशाला आणि अर्थव्यवस्थेला एक अभेद्य शक्तीही देणार आहे. या नव्या शक्तिभूमीला आणि त्यातून जन्म घेणार्या महाराष्ट्राच्या नव्या आर्थिकयुगाची समृद्धी ही थक्क करणारी अशीच!