Padma Awards 2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर "पद्मविभूषण"

    25-May-2026
Total Views |

padma

मुंबई : (Padma Awards 2026) देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज दि. २५ मे रोजी सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे पार पडले. या समारंभात एकूण एकूण ६६ पद्म पुरस्कार प्रदान केले गेले, यामध्ये २ पद्मविभूषण, ६ पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित पद्म पुरस्कार नागरी सन्मान समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे.

या वर्षी, सरकारने एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा समावेश असून, १६ व्यक्तींना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जातील. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी मानले जातात. या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज चेहऱ्यांचा गौरव करण्यात आला. हिंदी चित्रपटसृष्टीचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला, त्यावेळी सभागृहात भावूक वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय प्रख्यात व्हायोलिन वादक एन. राजम यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.कला आणि संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मामुट्टी यांना 'पद्मभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९५४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर केली जाते. या पुरस्कारांचा उद्देश वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव करणे हा असून, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजकार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, तसेच व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांतील व शाखांमधील उत्कृष्ट तथा असामान्य कामगिरीसाठी पुरस्कार दिले जातात.