गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजले,निवडणूक कालावधी जाहीर

    25-May-2026
Total Views |
Gokul Election
 
मुंबई : (Gokul Election) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर म्हणजेच गोकुळच्या बहुचर्चेत असलेल्या पंचवार्षिक निवडणुक २०२६ ते २०३१ या कार्यक्रमाची घोषणा सोमवार दि.२५ रोजी राजकुमार पाटील,जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक ,सहकारी संस्था (दुग्ध ) पुणे विभाग,पुणे यांच्यावतीने करण्यात आली आहे. तशा प्रकारच्या माहितीची प्रत प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ( दुग्ध ) ,कोल्हापूर यांना पुणे विभागाच्या वतीने पाठवण्यात आली आहे.
 
यामध्ये सहकारी संस्थेच्या संलग्न सदस्य प्राथमिक सहकारी दूध संस्थांकडून मतदार यादीत समाविष्ट करण्याकरता संलग्न सदस्य प्राथमिक सहकारी दूध संस्थांना प्राधिकृत अधिकारी तथा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक ,सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर यांना पत्र पाठवण्याचा कालावधी २६ मे ते १ जून असा आहे.
 
तर संस्थेच्या संलग्न सदस्य प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबतचा ठराव सहकारी निवडणूक अधिकारी, सहकारी संस्था ( दुग्ध),कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्याचा कालावधीत २ जून ते १ जुलै असा देण्यात आलेला आहे.(Gokul Election)
 
हेही वाचा :  आय. पी. एल.प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी
 
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण गोकुळच्या निवडणुकीभोवती गेले काही दिवस फिरत होते.तसेच संचालक मंडळांची मुदत ४ मे रोजी संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती सुद्धा गोकुळवर करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक कधी लागणार याबाबतची उत्सुकता वाढली होती. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार धनंजय महाडिक व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते.
 
गोकुळच्या वाढीव १२०० सभासदांबाबत प्रकाश बेलवाडे व आमदार शिवाजी पाटील यांनी आवाज देखील उठवला होता. तर महायुतीच्या भूमिकेबाबत व गोकुळच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. २८ एप्रिल रोजी महायुतीच्या कोल्हापूर येथील प्रमुख नेत्यांची बैठक देखील मुंबईत पार पडली होती. आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेबाबतचा कालावधी समोर आल्याने पुन्हा गोकुळचे राजकारण तापणार हे नक्की झाले आहे.(Gokul Election)