पश्चिम बंगालच्या विजयाने हिंदू समाजाचा आत्मविश्वास उंचावला : भाऊ तोरसेकर; हिंदू हितसंवर्धन संमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद

    25-May-2026   
Total Views |
Bhau Torsekar
 
मुंबई: (Bhau Torsekar) पश्चिम बंगालचा विजय केवळ राजकीय नाही. तो केवळ एका पक्षाचा विजय नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा विजय हा हिंदू समाजाने दहशत झुगारून घेतलेल्या पुढाकाराचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या विजयाने हिंदू समाजाचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, तज्ज्ञ् विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केले.
 
ठाणे पश्चिम येथील शहराचा जुना आणि सामाजिक -सांस्कृतिक दृष्ट्या सजग असलेल्या नौपाडा येथील हिंदू कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, सहकार कॉलनी, शिवाजी नगर, साठे वाडी आणि गोखले रोड, महात्मा गांधी मार्ग परिसरातील नागरिकांच्या वतीने रविवार, २४ मे रोजी भव्य हिंदू हितसंवर्धन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. "हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवू या" असा संदेश देणारा हे हिंदू हितसंवर्धन संमेलन सायंकाळी सहा वाजता ब्राह्मण सोसायटीतील हितवर्धिनी सभेच्या मैदानात झाले.(Bhau Torsekar)
 
या हिंदू हितसंवर्धन संमेलनात भाऊ तोरसेकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हिंदू समाजापुढील आव्हाने आणि संधी याविषयावर बोलताना भाऊ तोरसेकर यांनी पश्चिम बंगाल येथील हिंदू समाजाच्या स्थितीचा संदर्भ देऊन मानसिकतेत होणाऱ्या बदलावर भाष्य केले. "जय श्रीराम" चा अर्थ व्यापक समजून घेणे आवश्यक आहे असे भाऊ तोरसेकर यांनी सांगितले. हिंदूंची कोंडी करण्याच्या प्रयत्नाला सातत्यपूर्ण हिंदू जागरण आणि प्रबोधन आवश्यक आहे असे भाऊ तोरसेकर यांनी सांगितले.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित हिंदू हितसंवर्धन संमेलनात व्यासपीठावर संघाचे ठाणे जिल्हा संघचालक राजेंद्र गोडबोले, हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष प्रशांत नवरंगे, संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, उपाध्यक्ष स्मिता नामजोशी उपस्थित होते. पुरुषोत्तम आगवण यांनी एका कवितेच्या माध्यमातून हिंदू समाजापुढील प्रश्न आणि त्यावरील उपाय सोप्या पद्धतीने मांडले.(Bhau Torsekar)
 
संमेलनात छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रदर्शनी मांडली होती. तसेच, शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. ही दोन्ही प्रदर्शन लक्षवेधी ठरली. संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात ऋतुजा फडके हिने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. पुनीत करमरकर आणि हर्ष केळकर, श्रीकांत यल्लत्तीकर, सुनील ऐगळीकर, आरिश गोंधळेकर आणि संजय लगड सुरेख बासरी वादन सादर केले. त्याला अर्णव बेहेरे यांनी तबल्यावर साथ केली. संविक प्रस्तुत श्रीशिवगान हा कार्यक्रम झाला.
 
यात गायक उत्कर्ष जोशी, गायिका आणि निवेदिका सौ. फाल्गुनी जोशी-नातू यांच्या स्वरांनी रंग भरला, तर आर्यन पाटील (ढोलकी/तबला) आणि अर्चित जोशी (सिंथेसायजर) यांनी साथ दिली. ऋतुजा फडके, श्वेता भरडकर, युगा दांडेकर, अन्वय मुळे, रणवीर खाडे, गिरीजा फडके, वरद घाणेकर, पूर्णा घाणेकर आणि श्रेयांश कोतवाल या कलाकारांनी एक देशभक्तीपर नृत्य नाटिका सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन डॉ. मधुरा फडके यांनी केले. संस्कृती, परंपरा याला कृत्रिम बुद्धिमत्ता जोडून कार्यक्रम झाले.(Bhau Torsekar)
 
लाठी-काठी आणि शस्त्र प्रात्यक्षिक हे हिंदू हितसंवर्धन संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. अभिषेक धर्माधिकारी, गौरांग दिनेश कुचेकर, पार्थ मिलिंद कोळंबे, गीत वळवंडे , प्रशिक गाडे, निशा जगाडे यांनी चितथरारक, नेत्रदीपक अशी प्रात्यक्षिक केली. या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
 
पत्रकार, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह, राष्ट्रीय मतदाता मंचाचे सदस्य, संमेलन आयोजन समिती सदस्य मकरंद मुळे यांनी प्रास्ताविकात हिंदू हितवर्धन संमेलनात सामाजिक समरसता, नागरिकांची कर्तव्य, पर्यावरण, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंच सूत्रांची याची माहिती दिली.
 
या आधारे आपला दैनंदिन व्यवहार करून वैयक्तिक आणि सामाजिकस्तरावर बदल घडवण्याचे आवाहन केले. जिहादचे विविध पारकर आणि कार्यपद्धती याची माहिती देऊन आपला परिसर विकृतीमुक्त आणि विवेकयुक्त करण्यासाठी एकत्र येण्याची गरज संमेलनातून अधोरेखित झाल्याचे सांगितले. आपल्या परिसरातील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी संघटितपणे पुढाकार घेण्याचा उपयोग असल्याचे मकरंद मुळे यांनी सांगितले.
 
संमेलनाची सुरुवात सामूहिक रामरक्षेने करण्यात आली. ह. भ. प. दिलीपबुवा नामजोशी यांनी आपल्या सुरेल आवाजात रामरक्षा पठण करून घेतले. या संमेलनाला परिसरातील सातशे पन्नास विविध वयोगटातील महिला-पुरुष उपस्थित होते. सदर संमेलन परिसरातील नागरिकांनी मिळून यशस्वी केले. पन्नास जणांच्या स्थानिक समितीने सलग आठवडे विशेष परिश्रम संमेलन यशस्वी केले. आयोजनातील महिला सहभाग विशेष उल्लेखनीय होता.(Bhau Torsekar)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक