गोवंश तस्करी रोखणाऱ्या बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात; हल्ला घडवून आणल्याचा बजरंग दलाचा दावा

    25-May-2026
Total Views |
Bajrang Dal Activist
 
मुंबई : (Bajrang Dal Activist) गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे असे मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पिकअप वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी अवैध तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार गजानन सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचला होता.
 
दरम्यान, संशयित वाहन दिसताच गजानन सुरोशे यांनी त्यांच्या कारमधून त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. मात्र, तस्करांनी आपले वाहन उमरखेडपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील सुकळी गावाच्या दिशेने वळवले. याच ठिकाणी आधीपासून दबा धरून बसलेल्या तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या वाहनाला वेढा घातल्याचे समोर आले आहे.(Bajrang Dal Activist)
 
त्यानंतर गजानन सुरोशे यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर ओढून दगड आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
 
 
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची चर्चा परिसरात आहे. या मागे संघटित आणि क्रूर तस्कर टोळी सक्रिय असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
 
विशेष म्हणजे, पाठलाग सुरू असताना तस्करांनी वाहन मुद्दाम सुकळी गावाकडे वळवणे आणि तेथे आधीच जमाव तयार असणे, यावरून हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अचानक झालेल्या वादातून नव्हे, तर नियोजनपूर्वक हा हल्ला घडवून आणल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
सदर प्रकरणी मुख्य आरोपी शेख सुलतान अलावली याच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), १०३ (१) आणि ३ (५) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके हैदराबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असून आणखी काही आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी माहिती आहे.(Bajrang Dal Activist)