सिनेसृष्टीची कसोटी...

    25-May-2026   
Total Views |
AI Future Of Cinema
 
'कान्स’ चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेप्रेमींसाठी पर्वणी. दरवर्षी ‘कान्स’च्या यादीसाठी लाखो रसिक ताटकळलेले असतात. सिनेमा हे असे क्षेत्र आहे, जिथे जगभरात रोज नवनवीन प्रयोग घडत आहेत. कल्पनेच्या सर्व सीमा भेदून सिनेसृष्टीमध्ये एखादा नावीन्यपूर्ण प्रयोग होतो, तेव्हा अशा प्रयोगांची दखल घेणारे व्यासपीठ म्हणून लोक ‘कान्स’कडे बघतात. यावर्षीसुद्धा विविध कारणांसाठी हा महोत्सव चर्चेत होता. सिनेसृष्टीच्या अंतरंगामध्ये कुठल्या विषयाची चर्चा आहे? ज्यांच्याकडून अपेक्षा धरावी, असे नवे चेहरे कोणते आहेत? या आणि अशा अनेक विषयांबद्दल, वेळोवेळी ‘कान्स’मध्ये चर्चा होत असते. मात्र, यावेळी ‘सिनेमाचे भविष्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा विषय ‘कान्स’मध्ये सर्वाधिक चर्चिला गेला.
 
डॅरेन अर्नोफस्की हे नाव अमेरिकेतील सिनेसृष्टीमध्ये आजही काही महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक. ‘एआय फॉर टॅलेंट’ या चर्चासत्रामध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "एआय हा एक अतिशय चुकीचा शब्द आहे. कारण, तो अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी सरसकट वापरला जातो. जेव्हा आपण ‘चॅटजीपीटी’सोबत हवामानाबद्दल किंवा ‘कान्स’मध्ये तीन दिवस कसे घालवायचे याबद्दल बोलतो ते ‘एआय’ वेगळे आणि चित्रपट किंवा प्रतिमा तयार करण्यासाठी आपण जे ‘एआय’ वापरतो, ते पूर्णपणे वेगळे आहे. ते कोणाचीही नक्कल करत नाही, तर ते केवळ एक साधन आहे. अर्नोफस्की यांनी त्यांच्या ‘प्रिमॉर्डिअल सूप’ या नव्या स्टुडिओच्या माध्यमातून, ‘जनरेटिव्ह एआय प्रकल्प’ उभे करण्याचा घाट घातला आहे. या स्टुडिओद्वारे ‘गुडनाईट लॅम्बी’ या शॉर्ट-फिल्मची निर्मितीही करण्यात आली. या शॉर्ट-फिल्मचा प्रीमिअर यंदा ‘कान्स’मध्ये झाला. या तंत्रज्ञानाशिवाय हे चित्रपट अस्तित्वातच आले नसते. हे तंत्रज्ञान कोणाची जागा घेत नाही, तर ते चित्रपटनिर्मितीला अधिक समृद्ध करत असल्याचा दावाही अर्नोफस्की यांनी केला. ‘ऑस्कर’ विजेते दिग्दर्शक स्टीव्हन सॉडरबर्ग यांच्या ‘जॉन लेनिन : द लास्ट इंटरव्ह्यू’ या नव्या ‘डॉयुमेंट्री’मुळेही ‘एआय’ची जोरदार चर्चा झाली.
 
एका बाजूला ‘एआय’चा असा वापर, तर दुसर्‍या बाजूला कलाकृतीचे अस्सलपण टिकवू पाहणार्‍या लोकांनी मात्र ‘एआय’च्या वापरावर तीव्र नापसंती दर्शवली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ग्विलेर्मो डेल टोरो यांनीही या मुद्द्यावर, तीव्र नापसंती व्यक्त केली. काही स्टुडिओ प्रमुखांच्या मते, ’एआय’ आणि मानवी कौशल्यांच्या संकरित वापरामुळे, एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या बजेटमध्येच मध्यम बजेटचे अनेक चित्रपट तयार केले जाऊ शकतात. मात्र, गेल्या वर्षी ’टिली नॉरवूड’ या पूर्णपणे ’एआय’निर्मित ’अभिनेत्री’ची घोषणा झाल्यानंतर, कलाकारांच्या संघटनांनी याला विरोध केला होता. ’कान्स’च्या मुख्य स्पर्धेत ’एआय’निर्मित चित्रपटांवर पूर्णपणे बंदी असली, तरी दिग्गजांनी चित्रपटसृष्टीला या नव्या बदलाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे. संगणक लवकरच मानवी कथाकारांची जागा घेतील ही भीती काल्पनिक कथा असल्याचे सांगत, अरोनोफस्की यांनी या तंत्रज्ञानाची तुलना चित्रपटांमधील आवाजाचे आगमन, पोर्टेबल कॅमेरे आणि व्हिज्युअल इफेट्स यांसारख्या ऐतिहासिक बदलांशी केली.
 
या वर्षीच्या ’कान्स’ स्पर्धेच्या ज्युरी सदस्य असलेल्या अभिनेत्री डेमी मूर म्हणाल्या की, ”एआय आता आपल्या आयुष्यात आले असून, त्याच्याशी लढणे म्हणजेच आपण निश्चितपणे हरणारी लढाई लढण्यासारखे आहे. कलाकारांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या चिंतेशी त्यांनी सहमती दर्शवली, परंतु तंत्रज्ञान चित्रपट निर्मितीच्या केंद्रस्थानी असलेला मानवी आत्मा आणि भावना कधीही हिरावून घेऊ शकत नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
२०२३ साली ‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली, हॉलीवूडच्या लेखकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. अजमितीला प्रत्येक क्षेत्रात ’एआय’चा वापर अनिवार्य आहे. ’एआय’च्या माध्यमातून रचण्यात आलेले स्लॉप व्हिडीओज्, मागील काळात व्हायरल झाले होते. मनोरंजन म्हणून ते बघणारा, दर्शकांचा एक वर्गही तयार झाला होता. या पार्श्वभूमीवरच मनोरंजन क्षेत्रापुढे अनेक आव्हानं उभी आहेत. येणार्‍या काळात सिनेविश्वातील निर्मितीची गणितं पूर्णपणे बदलणार असून, कलाकार कितीही सर्जनशील असला तरी या परिवर्तनाकडे लक्ष्य दिल्याशिवाय, त्याला पुढे जाता येणार नाही, हे सत्यच!




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.