आपलेपणाच्या ओलाव्यातील 'वानोळा'

    24-May-2026
Total Views |

साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी करताना, वाचकासमोर एक नवीन विश्व उभं राहतं. माणसाचं माणूसपण शाबूत ठेवून, सर्जनशीलतेने हे विश्व उभं करण्याचं कसब काही मोजक्याच लेखकांकडे असतं. मराठी साहित्यातील असंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. ‌‘बनगरवाडी‌’, ‌‘माणदेशी माणसं‌’, ‌‘सत्तांतर‌’ अशा अलौकिक ग्रंथांमधून मराठी साहित्याचा मळा फुलवणारे माडगूळकर साहित्यिकांच्या मांदियाळीत उठून दिसतात. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या या व्यापक आणि बहुआयामी साहित्यिक प्रवासाचा घेतलेला हा मागोवा...

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ या गावी दि. 5 एप्रिल 1927 रोजी झाला. तात्विक अर्थाने दि. 5 एप्रिल 2026 रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. कोणत्याही एका क्षेत्रात मोठ्या भावाने जो नावलौकिक मिळवला, त्या नावलौकिकाच्या बरोबरीने किंवा किंचित त्यापुढे एक पाऊल असा प्रवास करणारे जे फार मोजके लोक आहेत, त्यामध्ये मला व्यंकटेश माडगूळकरांचे नाव आवर्जून घ्यावेसे वाटते. ‌‘आधुनिक वाल्मिकी‌’ म्हणून ज्यांचा आपण गौरव करतो असे ग. दि. माडगूळकर या मान्यता प्राप्त साहित्यिकाचे धाकटे बंधू असलेले व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी साहित्यात गदिमांच्या सावलीपलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण केली आणि गदिमांपेक्षा एक पाऊल पुढे म्हणजे ‌‘साहित्य अकादमी पुरस्कारा‌’वरही स्वतःची नाममुद्रा उमटविली. खरे म्हणजे, कोणताही पुरस्कार हा साहित्याचे परिमापन करणारे परिमाण नव्हे. मात्र, ‌‘साहित्य अकादमी‌’च्या मान्यता प्राप्त यादीमध्ये जाऊन बसण्याचा मान व्यंकटेश माडगूळकरांना मिळाला, ते मला महत्त्वाचे वाटते. व्यंकटेश माडगूळकरांनी कथा, कादंबऱ्या, व्यक्तिचित्रण आणि प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता. या जंगल सफारीतील अनुभव शब्दांकित केल्यामुळे त्यांची काही पुस्तके जंगलातील शिकारीच्या अनुभवावर असलेले आपल्याला दिसून येते.

लौकिक अर्थाने मॅट्रिकपर्यंतही शिक्षण न झालेल्या या लेखकाने साहित्य क्षेत्रात केलेली निर्मिती आणि स्व-प्रयत्नातून इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. इतकेच नव्हे, तर प्रसंगी त्यातील उत्कृष्ट लिखाणाचे अनुवादही केले. काही काळ ‌‘आकाशवाणी‌’मध्ये नोकरी आणि काही काळ पत्रकरिता केल्यानंतर मुंबई या मायानगरीमध्ये स्थिरावल्यावर त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखनाचे काम सुरू झाले.

त्यांनी लिहिलेली ‌’पुढचं पाऊल‌’ चित्रपटाची कथा एका दलित कलावंताच्या जीवनावरील या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय, त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून स्वतःची अस्मिता जपत स्वतःचे मार्ग शोधणारी संघर्षमय धडपड दाखवते. ‌‘जशास तसे‌’, ‌‘पुढचं पाऊल‌’, ‌‘रंगपंचमी‌’, ‌‘वंशाचा दिवा‌’ आणि ‌‘सांगत्ये ऐका‌’ अशा लोकप्रिय चित्रपटांच्या कथा किंवा पटकथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या या चित्रपट कथांमध्ये असलेले विषयवैविध्य पाहिले असता, मानवी जीवनाशी आणि तत्कालीन समाजजीवनाशी निगडित असून, तत्कालीन समाजरचनेचे प्रतिबिंब यामध्ये उमटलेले दिसून येते. त्यांनी नाटकेही लिहिली, ज्यामध्ये ‌‘तू वेडा कुंभार‌’, ‌‘सती‌’, ‌‘पति गेले गं काठेवाडी‌’ ही त्यांतील काही विशेष उल्लेखनीय असून ‌‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई‌’ आणि ‌‘बिनबियांचे झाड‌’ ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. कथा आणि कादंबरी प्रांतात नजरेत भरेल इतके यश मिळत असताना, तत्कालीन समाज मागणीनुसार लोकनाट्य किंवा नाटक प्रसंगी चित्रपटाच्या पटकथा अशा विविध पातळीवर व्यंकटेश माडगूळकर यांचा वावर राहिला. चित्रपट आणि नाटक यामुळे त्यांचे साहित्य आणि त्यातील विचार व्यापक प्रमाणात महाराष्ट्रभर पोहोचविल्या गेले.

व्यंकटेश माडगूळकरांची खरी ओळख कादंबरीकार आणि कथाकार म्हणून जास्त आहे, यात शंका नाही. ‌‘माणदेशी माणसे‌’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यातील व्यक्तिचित्रणातून आणि कथानकातून ग्रामीण जीवनाचे जे पैलू त्यांनी वाचकांसमोर ठेवले, ते पाहून मराठी वाचक विस्मय चकित झाला. शंकर पाटील आणि बाजीराव पाटील यांच्यासारख्या मोजक्या ग्रामीण लेखकाच्या लेखणीतून ग्रामीण जीवन मराठी वाचकांपर्यंत पोहोचत असले, तरी त्याला विनोदी साहित्य म्हणून जास्त पाहिले जात असे, जीवनातील अस्सलता आणि भेदक अनुभव व्यंकटेश माडगूळकरांनी सूक्ष्मपणे टिपले आणि त्याच लहेजामध्ये शब्दांकित केले. पु. ल. देशपांडे यांच्या ‌‘व्यक्ती आणि वल्ली‌’चे जे गारुड मराठी वाचकांच्या मनावर कोरलेले होते, त्याच्या पल्याड जाऊन जीवनातील अस्सलता मराठी साहित्यात रुजवण्याचे काम त्यांनी केले. ‌‘धर्मा रामोशी‌’, ‌‘झेल्या‌’, ‌‘नाम्या मास्तर‌’ असे अगदी गावखेड्यात सहज दिसणारे व्यक्तिमत्त्व माडगूळकरांच्या कथेमध्ये असल्याने ग्रामीण वाचकही साहित्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी आहे, या भावनेतून साहित्याकडे ओढला गेला. यातील ‌‘झेल्या‌’ नावाची कथा गुरु-शिष्य परंपरेत आधुनिक उदाहरण म्हणून देण्यासारखी उत्कृष्ट कथा आहे, असे मला वाटते. त्यानंतर ‌‘गावाकडच्या गोष्टी‌’, ‌‘हस्ताचा पाऊस‌’ यातील ‌‘देवा सटवा महार‌’ सारख्या कथा अगदी अंगावर येतात. ‌‘सीताराम एकनाथ‌’, ‌‘काळी आई‌’, ‌‘जांभळीचे दिवस‌’ यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. विस्मृतीत गेलेले प्रेम पाहुणपणासाठी गावात परत येणे किंवा आला तिच्या परिस्थितीत असलेल्या गुरुजींनी मुलासाठी सायकल विकत घेतल्यावरती हरवणे, अशा विविध उदाहरणातील आंबट-गोड कथा म्हणजे ‌‘जांभळाचे दिवस‌’ होय. व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या कथालेखनात ग्रामीण जीवनातील असे विविध अनुभव ज्या स्वाभाविक शैलीत दिले आहेत तसे उदाहरण फार दुर्मीळ आहे. त्यांच्या कथांचे विविध जागतिक भाषांत अनुवादही झाले. ‌‘ओझं‌’ या नावाने त्यांच्या सर्व कथांमधून दलित जीवनावरील कथा एकत्रित करून गो. मा. पवार यांनी जे संपादन केले आहे, त्या ग्रामीण दलित कथा होत. मात्र, इतक्या ताकदीच्या दलित कथा देऊनही दलित साहित्यात व्यंकटेश माडगूळकर ओळखले जात नाहीत. व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांमधून संपूर्ण गावगाडा उभा राहतो, असे म्हंटले जाते. त्यामागे त्यांनी त्यांच्या जीवनात सर्व जातीधर्माच्या आणि ‌‘बारा बलुतेदार‌’ किंवा ‌‘अठरा अलुतेदार‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व घटकांशी जे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे नाते जोपासले, त्या नात्याची घट्ट वीण कामी आली, असे मला वाटते.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या क्षेत्रातही माडगूळकरांचे मोलाचे योगदान आहे. ‌‘बनगरवाडी‌’ या कादंबरीतील ‌‘मास्तर‌’ असो ‌‘कारभारी‌’ असो की दुष्काळ पडल्यावर गाय वासरासोबत मरायला थांबलेला एखादा म्हातारा असो किंवा बैलाच्या बरोबरीने खांद्यावर नांगर घेऊन शेताची नांगरणी करणारी स्त्री असो, ती सर्व पात्र आपल्याला अस्वस्थ करून सोडतात तितकीच ते काळजात जास्त रुतून राहतात. ‌‘वावटळ‌’, ‌‘पुढचं पाऊल‌’, ‌‘कोवळे दिवस‌’, ‌‘करुणाष्टक‌’ आणि ‌‘साहित्य अकादमी‌’ प्राप्त असलेली ‌‘सत्तांतर‌’ या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यांत ‌’गावाकडील गोष्टी‌’, ‌’काळी आई‌’ यांसारखे कथासंग्रह, ‌’बनगरवाडी‌’ ही कादंबरी आणि ‌’सती‌’ ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो.

‌‘बनगरवाडी‌’सारख्या मेंढपाळाच्या वस्तीवर लिहिलेल्या कादंबरीच्या थोडीच तोड अशा ‌‘वावटळ‌’, ‌‘करुणाष्टक‌’ आणि ‌‘कोवळे दिवस‌’ या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. मात्र, त्या आत्मचरित्रपर आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात ज्या दंगली आणि जाळपोळ यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची कथा म्हणजे ‌‘वावटळ‌’ ही कादंबरी होय. करुणाष्टकात दारिद्य्राने ग्रासलेली आठ मुलांची दुःखी आई, तिचे दुःख आणि त्या कुटुंबाचा सर्व संघर्ष त्यांनी चितारला आहे. ‌‘कोवळे दिवस‌’ या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.

‌‘साहित्य अकादमी‌’ पुरस्कार मिळालेली त्यांची एक कादंबरी म्हणजे ‌‘सत्तांतर.‌’ ‌‘सत्तांतर‌’मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म चित्रण आहे. टोळीचे क्षेत्र, परस्परांच्या हद्दीत घुसखोरी, संघर्ष तेही नरानरांतले, तर कधी माद्यामाद्यांतले इतर हिंस्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या, यांचे विलक्षण परिणामकारक वर्णन या कादंबरीत आहे. ‌‘सत्तांतर‌’ म्हणजे टोळीचा एक राजा जाऊन तेथे दुसरा राजा येणे. हे कसे घडते, हे या कादंबरीचे कथानक होय. मानवी जीवनाला लागू होणारे हे कथानक वानरांच्या कथेतून मानवी जगातील वृत्तिप्रवृत्तींचीही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. ‌‘काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो‌’ या वाक्यात माडगूळकर सत्तालालसेबाबत महत्त्वाचे अधोरेखन आहे.

व्यंकटेश माडगूळकर यांनी ललित लेखनही मोठ्या प्रमाणात केले. त्यांच्या ललित लेखनाला चिंतनाची डूब आणि निरीक्षणाचा साज आणखी शृंगारित करतो, असे ते वाचताना आढळते. शिकारीनिमित्त जंगल सफारी करणाऱ्या व्यंकटेश माडगूळकर यांनी ‌‘नागझिरा‌’, ‌‘पांढरी मेंढरे‌’, ‌‘हिरवी कुरणे‌’, ‌‘पांढऱ्यावर काळे‌’, ‌‘रानमेवा‌’, ‌‘चित्रे आणि चरित्रे‌’ असे विपुल ललित गद्य लिहिले आहे. शब्दावर जितके प्रभुत्व तितकेच प्रभुत्व चित्रकलेवर असल्यामुळे यांच्या कुंचल्यातून निर्माण होणारे चित्र सजीव होऊन बोलणारे आणि त्यांचे शब्दचित्र अत्यंत लाघवीपणे मनाला मोह होणारे होते. ‌‘सिंहाच्या प्रदेशात‌’ या त्यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकात झेब्रा आणि सिंह या दोन प्राण्यांच्या वाताहतीची, जीवनसंघर्षाची कथा आणि व्यथा मूळ लेखकांनी ज्या ताकतीने मांडली आहे, तिचा विसर पडून तिच्यावर व्यंकटेश माडगूळकर यांची लेखनमुद्रा ठळकपणे आढळून येते. यावरून अनुवाद करतानाही त्यांनी किती असोशीने आपले कौशल्य त्यात उतरवले ते कळते. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी चित्रकला सध्या केली, तसेच जागतिक कीतच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा अभ्यास केला. ‌‘पांढरी मेंढरं‌’, ‌‘हिरवी कुरण‌’ अशा प्रवासवर्णनांची नोंदही त्यांच्या नावावर आहे. ‌‘प्रवास एका लेखकाचा‌’ हे त्यांचे आत्मकथनही प्रभावी आहे. मात्र, त्याच्या कथा आणि कादंबरीचा प्रभाव इतका गडद राहिला की त्यांच्या इतर साहित्याकडे जास्त लक्ष दिले गेले नाही.

1983 मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या या उत्तुंग अश्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.

- किरण डोंगरदिवे
7588565576