‘श्रीस्थानक‌’ ते ठाणे - महानगराच्या अंतरंगाचा प्रवास (पूर्वार्ध)

    24-May-2026   
Total Views |

उद्योगनगरीचा वसा घेऊन जगणाऱ्या ठाण्याने, मागच्या काही दशकांमध्ये परिवर्तनाच्या असंख्य लाटा बघितल्या, पचवल्या आणि रिचवल्याही. काळाच्या ओघात ठाणे शहर बदलत गेले, आतासुद्धा क्षणाक्षणाला हे शहर बदलते आहे, विस्तारत आहे, कात टाकते आहे. मात्र, या शहरात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजसुद्धा जशाच्या तशा टिकून आहेत. तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या इतिहासाचा घेतलेला हा मागोवा...

ठाणे आणि मामलेदार मिसळ‌’ हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू! पण, आज जिथे खवय्यांची गद होते, त्या जागेचा इतिहास थक्क करणारा आहे. मराठेशाहीत याच ठिकाणी ‌‘हिराकोट‌’ नावाचा एक छोटासा किल्ला होता. ठाणे खाडीच्या किनाऱ्यावर टेहळणी करण्यासाठी आणि संरक्षणासाठी उभारलेली ती एक लष्करी चौकी होती. मराठ्यांच्या काळात या ‌‘हिराकोट‌’चा उपयोग तुरुंग म्हणून केला जात असे; जिथे कैद्यांना ठेवले जाई. याच किल्ल्याच्या आवाराबाहेर एक आंब्याचेही झाड होते, ज्याला जुने ठाणेकर ‌‘काळा आंबा‌’ म्हणत. पेशवेकाळात गुन्हेगारांना याच झाडावर फाशी दिली जात असल्याने, त्याला हे नाव पडले होते.

पुढे ब्रिटिशांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर, मराठ्यांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा मिटवण्यास सुरुवात केली. त्यांनी ‌‘हिराकोट‌’मधील हे कारागृह पोर्तुगीजकालीन मुख्य ठाणे किल्ल्यात हलवले, जे आज ‌‘ठाणे सेंट्रल जेल‌’ म्हणून ओळखले जाते. रिक्त झालेल्या ‌‘हिराकोट‌’च्या वास्तूत अंतर्गत बदल करून, ब्रिटिशांनी तिथे मामलेदार कचेरी अर्थात तहसीलदार कार्यालय सुरू केले. कालांतराने किल्ल्याची ओळख पुसली गेली, आणि ‌‘मामलेदार कचेरी‌’ म्हणूनच ती पुढे जनमानसात रूढ झाली. पुढे तिथेच सुरू झालेल्या शासकीय कॅन्टीनमधील मिसळीने इतकी लोकप्रियता मिळवली की, आज त्या ऐतिहासिक ‌‘हिराकोट‌’ची ओळख केवळ ‌‘मामलेदार मिसळ‌’ एवढीच उरली आहे.

भौगोलिक आणि प्रशासकीय सोयीसाठी, प्राचीन काळी कोकणाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडले होते. यातील उत्तर कोकणाची राजधानी असण्याचे भाग्य लाभले ते ठाणे शहराला! ‌‘शिलाहार‌’ राजांच्या काळातच ठाण्याला हे वैभव प्राप्त झाले. ‌‘शिलाहार‌’ हे राष्ट्रकूटांचे मांडलिक राजे होते. राष्ट्रकूटांनी जेव्हा उत्तर कोकणाचा कारभार ‌‘शिलाहार‌’ वंशाचे संस्थापक राजे ‌‘कपद‌’ (पहिले) यांच्याकडे सोपवला, तेव्हा त्यांनी राजधानी म्हणून ठाण्याचीच निवड केली आणि या परिसराला ‌‘श्रीस्थानक‌’ असे नाव दिले.

‌‘श्री‌’ म्हणजे लक्ष्मी; जिथे लक्ष्मीचा अखंड वास आहे ते स्थान! त्याकाळी बेटासारखे असलेले ठाणे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले अत्यंत समृद्ध बंदर होते. येथूनच इंडोनेशिया, आफ्रिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये जहाजे जात. भारतभरातून आलेला माल आणि ठाण्यातील उत्पादने येथूनच निर्यात होत. कापड, चामडे, सोने यांसोबतच, ठाण्यात विणले जाणारे विशेष रेशमी कापड, ज्याला परदेशात ‌‘थाना सिल्क‌’ म्हटले जाई. त्याची प्रचंड निर्यातही होत असे. ‌‘शिलाहार‌’ राजांनी येथे जवळपास 400 वर्षे राज्य केले. पुढे देवगिरीच्या यादवांनी शिलाहारांचा पराभव केला. तरीही, ठाण्याचे हे व्यापारी वैभव कायम राहिले.

आजचा ठाण्यातील ‌‘राबोडी‌’ परिसर म्हणजे जुना ‌‘खत्रीवाडा‌’ होय. ‌‘खत्री‌’ म्हणजे पारंपरिक विणकर समाज. या संपूर्ण वस्तीमध्ये कोष्ट्यांची घरे होती. त्याकाळी येथील जवळपास एक हजार कारागीर फक्त ‌‘रेशमी कापड‌’ विणायचे, तर 500 कारागीर सुती कापड विणत असत. ठाण्याच्या या ‌‘सिल्क‌’चे वेड थेट युरोपपर्यंत होते. युरोपमधून भारतात येणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना पोपच्या लेखी सूचना असायच्या की, परत येताना माझ्यासाठी ठाण्याचे ‌‘थाना सिल्क‌’ घेऊनच या. हे सिल्क इतके राजेशाही आणि दर्जेदार असे की, त्याचे वस्त्र परिधान करणे प्रतिष्ठेचे मानले जाई.

व्यापाराच्या बाबतीत ठाण्याची समृद्धी दाखवणारी आणखी एक रंजक नोंद म्हणजे ‌‘तबाशीर‌’चा व्यापार! ‌‘तबाशीर‌’ म्हणजे, बांबूच्या आतल्या गाभ्यापासून तयार होणारा औषधी पदार्थ, ज्याला संस्कृतमध्ये ‌‘वंशलोचन‌’ किंवा ‌‘वंशशर्करा‌’ म्हणतात. परदेशी प्रवाशांच्या नोंदींनुसार, ठाण्यामध्ये ‌‘तबाशीर‌’ तयार करण्याचे मोठे कारखाने होते. नाणेघाटातून कल्याणमार्गे येणारे व्यापारी काफिले आणि संपूर्ण कोकणातील व्यापारी आपला माल घेऊन ठाणे बंदरात येत असत. कोकणचा सुवासिक तांदूळ, केरळम्‌चे मसाले आणि देशाच्या विविध भागांतील मौल्यवान वस्तू, ठाणे बंदरातूनच जगभर पाठवल्या जात. थोडक्यात सांगायचे तर, आजचे ठाणे हे ऐतिहासिक काळापासूनच आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संपन्न व वैभवशाली शहर होते. म्हणूनच की काय, इ.स. 636 मध्ये बहरीनचा जो गव्हर्नर अर्थात वजीर होता, त्याने अरबी जहाजांचा काफिला ठाणे लुटण्यासाठीच पाठवल्याची नोंद आढळते. तेव्हा कोकणावर म्हणजेच, ठाण्यावर राष्ट्रकूटांचे (जे शिलाहारांचे मालक (राजे) होते) वर्चस्व होते. त्यांनी त्या अरबी काफिल्याचा पराभव करत, त्यांना पिटाळून लावले. परंतु, इ.स. 660 मध्ये अरब लुटारू पुन्हा आले आणि त्यांनी ठाणे लुटले. एखादे गाव लुटण्यासाठी हजारो किलोमीटरचा जलप्रवास करून दुसरे कुठलेतरी लुटारू येतात, यावरूनच त्या गावाची समृद्धी लक्षात येते.

‌‘श्रीस्थानका‌’चा दुसरा एक अर्थ लावला जातो, तो म्हणजे परमेश्वराच वसतिस्थान म्हणून ‌‘श्रीस्थानक‌’. कारण, इथे अनेक मंदिरे आहेत.

कोपिनेश्वर हे ठाणे शहराचे आराध्य दैवतच मानले जाते. शहराच्या मुख्य भागात वसलेल्या या भव्य मंदिराच्या स्थापनेविषयी, कोणतेही ठोस लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. हे मंदिर नेमके कोणत्या शतकात किंवा कोणत्या राजवटीत बांधले गेले, याबाबतचा इतिहास मौनच आहे. मात्र, ऐतिहासिक दाखल्यांवरून काही तर्क निश्चितच मांडता येतात. शिलाहार राजे हे परम शिवभक्त होते आणि त्यांनी आपल्या सत्ताकाळात महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिव मंदिरे उभारली. ठाण्यानजीकचे अंबरनाथचे शिव मंदिर हे त्याचे जाज्वल्य उदाहरण! याच पार्श्वभूमीवर कोपिनेश्वर मंदिराचीही स्थापना, शिवभक्त शिलाहार राजांच्या काळात झाली असावी, असा कयास बांधला जातो.

शिलाहारांनंतरच्या काळात, दिल्लीच्या सुलतानांच्या राजवटीतही या मंदिराचे अस्तित्व सुरक्षित राहिले. मात्र, पोर्तुगीजांच्या आगमनाने या परिसराचे चित्र बदलले. आपल्या धर्मप्रसाराच्या आक्रमक धोरणामुळे, पोर्तुगीजांनी ठाण्यातील मंदिरे आणि मूर्तिभंजन करण्याचा उद्योग सुरू केला. यामध्ये कोपिनेश्वर मंदिराची मूळ वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मात्र, गाभाऱ्यातील ज्या विस्तीर्ण पिंडीचे आज आपण दर्शन घेतो, जी महाराष्ट्रातील सर्वांत मोठे शिवलिंग मानली जाते, ती पोर्तुगीजांना भंग करता आली नाही. त्याकाळी आजच्यासारखा मंदिर आणि मासुंदा तलावाच्या मध्ये रस्ता नव्हता, तर मंदिराच्या पायऱ्याच थेट तलावात उतरत असत. पोर्तुगीजांनी मंदिराचा विध्वंस करून तलावाचे पाणी गाभऱ्यात घुसवले. त्यामुळे ते भग्न मंदिर आणि अद्वितीय शिवलिंग, कित्येक काळ मासुंदा तलावाच्या डोहातच विस्मरणात बुडून राहिले.

ऐतिहासिक स्थित्यंतरानंतर, इ.स. 1737 मध्ये पेशव्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ठाणे काबीज केले आणि सुभेदार बिवलकरांवर कल्याण-ठाण्याची जबाबदारी सोपवली. ठाण्याचा कारभार पाहत असताना, बिवलकरांना तलावाच्या पाण्यात अंशतः बुडलेले ते अवाढव्य शिवलिंग आणि भग्न मंदिर दिसले. चौकशीअंती हे प्राचीन कोपिनेश्वर मंदिर असल्याचे स्पष्ट झाले. ‌‘बिंब‌’ राजवट किंवा ‌‘शिलाहार‌’ काळातील या दैवताचा, बिवलकरांनी जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. आज जे कोपिनेश्वर मंदिर आपण पाहतो, त्याचा गाभारा सरदार बिवलकरांनी इ.स. 1760 मध्ये बांधला आहे. याचा अर्थ, आजची वास्तू जेवढी जुनी आहे, त्यातील मुख्य शिवलिंग त्याहूनही कित्येक शतके प्राचीन आहे. ढोबळमानाने, गेल्या 800 वर्षांपासून कोपिनेश्वराचे अस्तित्व ठाण्यात अबाधित आहे. काळाच्या ओघात मूळ रूप नष्ट झाले असले तरी शिलाहारकालीन नागरशैली आणि कोरीव कामाचे वैभव पाहता, हे मूळ मंदिर अत्यंत देखणे आणि भव्य दिव्य असावे, यात तिळमात्र शंका नाही.

ठाणे शहराचा इतिहास जितका शिलाहार आणि हिंदू राजवटींच्या वैभवशाली कालखंडाशी जोडलेला आहे, तितकाच तो धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचा एक जिवंत दस्तऐवजही आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले, तर ठाणे रेल्वे स्टेशनपासून ते टेंभीनाक्यापर्यंतचा जो साधारण दीड किलोमीटरचा रस्ता हा निव्वळ एक रस्ता नसून, विविध संस्कृतींना जोडणारा एक सेतूही आहे. या दीड किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या पाच ते सहा धर्मांची प्राचीन उपासनास्थळे, गेल्या 300 ते 500 वर्षांपासून गुण्यागोविंदाने उभी आहेत. ठाणे हे प्राचीन काळातील एक समृद्ध बंदर असल्यामुळे, जगभरातून विविध धर्मांचे व्यापारी आणि नागरिक येथे आले, स्थायिक झाले आणि त्यांनी आपली संस्कृती इथेच रुजवली.

या ऐतिहासिक मार्गाची सुरुवात कोपिनेश्वर मंदिराने होते, ज्याच्या अगदी जवळ पेशवेकालीन (इ.स. 1770च्या दशकातील) विठ्ठल मंदिरही आहे. कोपिनेश्वर मंदिराकडून आपण जेव्हा टेंभीनाक्याकडे जातो, तेव्हा ‌‘महागिरी‌’ परिसरातील ऐतिहासिक मशीदही लागते. ही मशीद 14व्या किंवा 15व्या शतकातील असावी, असा अंदाज आहे. निश्चित काळाचा ठावठिकाणा नसला, तरी ही ठाण्यातील सर्वांत जुनी मशीद मानली जाते. तिथूनच थोडे पुढे गेल्यावर आपल्याला पारशी समाजाची ‌‘अग्यारी‌’ही दिसते. ब्रिटिशांनी ठाण्यात आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर, प्रशासनात मदत करण्यासाठी पारशी लोकांना आणले आणि त्यापैकीच एक अग्रगण्य नाव असलेल्या कावसाजी जहांगीरजी यांनी, इ.स. 1780 मध्ये ही ‌‘अग्यारी‌’ उभारली.

या प्रवासात पुढे लागते ते आदिनाथांचे साधारण 300 वर्षे जुने जैन मंदिर आणि तिथून हाकेच्या अंतरावर असलेले ज्यू बांधवांचे 300 वर्षे प्राचीन ‌‘सिनेगॉग‌’. येथूनच पुढे गेल्यावर ब्रिटिशांनी बांधलेले 200 वर्षे जुने ‌‘सेंट जेम्स चर्च‌’देखील पाहायला मिळते. या यादीत मासुंदा तलावाकाठच्या ‌‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च‌’चा उल्लेख अनिवार्य ठरतो. पोर्तुगीजांनी इ.स. 1580 मध्ये बांधलेले हे ठाण्यातील पहिलेच मोठे चर्च आहे. ऐतिहासिक दाखले पाहिले, तर जगातील सातवे आश्चर्य असलेला आग्र्याचा ‌‘ताजमहाल‌’ साकारण्यापूव, ठाण्यातील हे ‌‘सेंट जॉन चर्च‌’ दिमाखात उभे राहिले होते.

प्राचीनतेचा असा अद्भुत वारसा लाभूनही, काळाच्या ओघात झालेल्या बदलांमुळे या वास्तूंचे मूळ स्वरूप जतन करता आले नाही. परिणामी, आजच्या पिढीला या शहराच्या प्राचीनतेचा अंदाजच येत नाही. आज हजारो ठाणेकर मासुंदा तलावाच्या काठावर विरंगुळ्यासाठी येतात, भेळ खातात किंवा दिवाळी पाडव्याला आणि गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेला जल्लोषही करतात. पण, ज्या मासुंदा तलावाच्या काठावर ते उभे असतात, तिथेच 900 वर्षांपूव एका राजाने आपला ऐतिहासिक विजयोत्सव साजरा केला होता, हा देदीप्यमान इतिहास मात्र काळाच्या पडद्याआड गेला आहे.

- मकरंद जोशी
(शब्दांकन - मुकुल आव्हाड)






मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.