‘राष्ट्र सेविका समिति’च्या माजी अखिल भारतीय सहकार्यवाहिका तसेच अखिल भारतीय प्रचारिका प्रमुख आदरणीय रुक्मिणी अक्का यांचे दिनांक 21 मे 2 रोजी बंगळुरू येथे वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यांना या लेखातून शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
रुक्मिणी अक्का मूळच्या बंगळुरूच्या. वंदनीय मावशींच्या कार्यकाळापासून त्या राष्ट्र सेविका समितिशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी कर्नाटक प्रांत कार्यवाहिका, दक्षिणांचल कार्यवाहिका, अखिल भारतीय सहकार्यवाहिका, अखिल भारतीय प्रचारिका प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.
कुटुंबरुक्मिणी अक्का समितिचे कार्य करत होत्या. त्यांचे बंधू मा. सूर्यनारायणजी यांचे संघाच्या अखिल भारतीय स्तरावरील सेवाकार्यात मोठे योगदान होते. दुसरे बंधू आदरणीय नरहरीजी यांच्याकडेही संघात क्षेत्रस्तरीय जबाबदारी होती. तसेच ते शैक्षिक महासंघातही कार्यरत होते. रुक्मिणी अक्का यांनी बंगळुरूमधील आपले एक घर समिती कार्यालयासाठीही दिले आहे.
प्रचारिका प्रमुख
रुक्मिणी अक्का अखिल भारतीय प्रचारिका प्रमुख असताना प्रचारिका अभ्यासवर्गासाठी ‘संघटनात्मक अनुशासन’ या विषयावर त्यांनी एक छोटी पुस्तिका तयार केली होती, जी आजही अत्यंत उपयुक्त ठरते. त्यासोबत प्रचारिकांची दिनचर्या, आर्थिक विषयांमध्ये घ्यावयाची काळजी, प्रचारिकांचे गुण, शाखेद्वारे चालविले जाणारे सेवाकार्य अशा अनेक मार्गदर्शक पत्रकांची निर्मितीही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी अयोध्येत झालेल्या अखिल भारतीय प्रचारिका अभ्यासवर्गात या पत्रकांच्या आधारे चर्चा झाली होती. त्या प्रचारिकांशी अतिशय सहजतेने संवाद साधत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही सांगत - जसे की आरोग्याच्या दृष्टीने स्वतःचा साबण वापरावा. त्यांच्या समोर मनातील कोणतीही गोष्ट मोकळेपणाने सांगता येत असे.
संघटनात्मक चिंतन
एकदा अखिल भारतीय बैठकीतील प्रश्नोत्तरांच्या सत्रात एका कार्यकर्तीने समितीचा ध्वज आणि संघाचा ध्वज याबाबत प्रश्न विचारला. त्यावर रुक्मिणी अक्का म्हणाल्या, “हा संघाचा किंवा समितिचा ध्वज नाही; हा हिंदू धर्माचा ध्वज आहे, हे लक्षात ठेवा. तो आपला गुरु आहे.” अशाप्रकारे त्यांच्या विचारांमध्ये अशी स्पष्टता सदैव दिसून येत असे.
रुक्मिणी अक्का यांनी भारताच्या पूर्वांचल राज्यांत अनेक वर्षे सघन प्रवास केला. वर्तमानकाळात समितिच्या कार्यकर्त्यांनी कसा विचार करावा, काळानुरूप बदल कसे स्वीकारावेत, याविषयी त्यांचे विशेष लक्ष असे. त्या आपले विचार स्पष्टपणे मांडत. कार्य व्यवस्थित आणि उत्कृष्ट व्हावे, यासाठी त्यांचा आग्रह असे.
आज कर्नाटकमध्ये जे कार्य उभे आहे, त्यामध्ये रुक्मिणी अक्का यांचे मोठे योगदान आहे. कर्नाटकातील सेविकांनी त्यांच्यावर कन्नडमध्ये ‘समिति मत्तू नानू’ अर्थात ‘समिति आणि मी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
सरल, सहज व्यक्तिमत्व
त्यांच्या मनात सदैव सकारात्मकता होती. त्या फार बोलत नसत; पण जे बोलत, ते अत्यंत मार्मिक असे. चांगले कार्य केल्यास त्या मनापासून कौतुक व शाबासकी देत. त्यांना वाचनाची विशेष आवड होती. सुडोकू हा त्यांचा आवडता विषय होता आणि अखेरपर्यंत त्या ते सोडवत असत. कदाचित त्यामुळेच अनेक समस्यांची उत्तरे त्यांच्याकडे सहज उपलब्ध असत.
त्या अत्यंत सहज विनोद करत आणि त्यांच्या आसपास हास्याचे वातावरण निर्माण होत असे. कोणी विनोद केला तर त्या स्वतः मंद स्मित करत; पण इतरांना मात्र भरभरून हसवत असत.
विश्व विभाग
बंगळुरूमध्ये झालेल्या प्रथम विश्व संघ शिबिरात रुक्मिणी अक्का उपस्थित होत्या. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झालेल्या हिंदू संमेलनात त्या समितीच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्या होत्या. पुण्यात झालेल्या विश्व विभागाच्या प्रथम सेविका प्रशिक्षणवर्गातही त्यांची उपस्थिती होती.
इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि समजावून सांगण्याची सोपी पद्धत विशेष होती. विज्ञान आणि गणितातील उदाहरणांद्वारे त्या विषय स्पष्ट करत. विश्व विभाग वर्गाची मध्यवर्ती कल्पना ‘मां की पावन गोद में’ अशी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरही मातृवत वात्सल्य झळकत असे.
एकेदिवशी त्यांनी संपूर्ण प्रदर्शनी कक्षात कर्नाटकाची पारंपरिक रांगोळी काढली होती. तांदळाच्या पिठातूनही त्या सुंदर रांगोळी तयार करत आणि सेविकांना ती शिकवत. वर्गातील सेविकांसाठी त्यांनी एकदा स्वादिष्ट सांबारही बनवले होते.
अंतिम काळ
गेल्या वष संघाच्या प्रतिनिधी सभेच्या वेळी आम्ही सात कार्यकर्त्या त्यांना भेटायला गेलो होतो. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका लेखनाचा कन्नड अनुवाद केला होता. या वयातही त्यांची बौद्धिक सक्रियता पाहून आश्चर्य वाटले! त्या कधीही रिकाम्या बसत नसत. सतत काही ना काही कार्य करत राहणे, हेच त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते.
शाखेमध्ये एक गीत म्हणतात- कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...
त्यांचे संपूर्ण जीवन या ओळींप्रमाणेच होते. समितिच्या पायाभूत कार्यकर्त्यांपैकी एक, सतत कार्यमग्न, चिंतक, मार्गदर्शक आणि वात्सल्यमयी व्यक्तिमत्त्व आपण गमावले, याचे अतिशय दुःख आहे.श्रद्धेय रुक्मिणी अक्का यांना विनम्र श्रद्धांजली!
- भाग्यश्री (चंदा) साठ्ये