मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) आज दुर्भाग्य असे की, जे भारत विरोधी आहेत ते हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीचा विचार करणाऱ्यांना संकुचित विचारांचे संबोधतात. हिंदुत्वाला चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न हा केवळ हिंदुत्वाविरोधातील नाही, तर मानवतेविरोधातील अन्याय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संघ शिक्षा वर्ग - सामान्य चा प्रकट समारोप शनिवार, दि. २३ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडांगण, शिवसृष्टी कुर्ला पूर्व येथे संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध व्यावसायिक जिमी मिस्त्री, मुंबई महानगर संघचालक सुरेशजी भगेरिया, महानगर कार्यवाह संजय नगरकर, संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी गुरुदास चोपडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
देशभक्ती ही कोणालाही वेगळी शिकवावी लागत नाही, ती प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वाभाविकपणे निर्माण होत असते, असे सांगताना रामलालजी यांनी संघ संस्थापक प.पू.डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतातील विविध प्रांत, भाषा, परंपरा आणि पूजापद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्वजण एका भारतमातेची संताने आहोत. हीच भावना राष्ट्रीय एकात्मतेचे खरे सूत्र ठरू शकते. समाजात विविधता असली तरी त्या विविधतेतून एकतेची भावना जागृत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
रामलालजी पुढे म्हणाले की, प्रत्येकाची पूजापद्धती वेगळी असू शकते; मात्र भारतीय संस्कृती सर्वांचा सन्मान करण्याची शिकवण देते. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि समाजहितासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करण्याची प्रेरणा देणे, हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात राष्ट्रीय भाव जागृत करून संघटित शक्ती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय संस्कृतीचा विचार मांडणारा संघ मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारतो, असे सांगताना त्यांनी हिंदू धर्म हा केवळ एखादा पंथ किंवा संप्रदाय नसून तो मानवधर्म असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुत्वाचा विचार हा सर्वसमावेशक असून तो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताला पुन्हा भारतीय गौरवाच्या शिखरावर नेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रहिताचा विचार करून कार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन करत त्यांनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh)शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक व विचारवंत जिमी मिस्त्री यांनी संघाच्या कार्यपद्धती, मूल्यव्यवस्था आणि समाजातील सकारात्मक विचारप्रवाह यावर भाष्य करताना संघकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. संघाने गेल्या शंभर वर्षांत केलेले कार्य हे केवळ संघटनात्मक विस्तार नसून ते ‘पर्पज’ आणि सशक्त ‘व्हॅल्यू सिस्टिम’चे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या उद्बोधनात ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षांच्या प्रवासात देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि समाजहित यांची जी मूल्यव्यवस्था जोपासली आहे, ती आजही तितक्याच ताकदीने आणि प्रामाणिकपणे टिकून आहे. बदलत्या काळात अनेक संस्था आणि विचारप्रवाहांमध्ये परिवर्तन झाले; मात्र संघाने आपल्या मूलभूत मूल्यांशी कायम निष्ठा ठेवली, हीच त्याची मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिमी मिस्त्री यांनी संघाच्या कार्याचा जागतिक स्तरावर योग्य पद्धतीने परिचय होण्याची आवश्यकता व्यक्त केली. संघातील कार्य, स्वयंसेवकांचे समर्पण, समाजजीवनातील विविध क्षेत्रांतील योगदान आणि संघाची विचारसरणी याविषयी अनेकदा चुकीचे किंवा अपूर्ण चित्र समाजासमोर मांडले जाते, त्यामुळे संघाविषयीचे ‘नरेशन’ अधिक प्रभावी आणि सकारात्मक पद्धतीने समाजासमोर जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी त्यांनी निगेटिव्ह नरेशनला उत्तर म्हणून पॉझिटिव्ह नरेशन उभे राहिले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी केवळ भावना पुरेशा नसून संवादकौशल्य, आधुनिक माध्यमांचा वापर, प्रभावी मांडणी आणि समाजाशी सातत्यपूर्ण संपर्क या अनेक बाबी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
संघ शिक्षा वर्गात एकूण १३६ शिक्षार्थी, ३५ शिक्षक, ६० व्यवस्था कार्यकर्ता उपस्थित होते. समारोप कार्यक्रमादरम्यान विविध प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली.(Rashtriya Swayamsevak Sangh)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक