बाजारीकरणाच्या गर्तेत अडकलेली शिक्षण व्यवस्था आणि ढासळती सामाजिक मूल्ये!

    24-May-2026
Total Views |

‘नीट‌’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे संपूर्ण देशामध्ये जो प्रचंड गदारोळ चालू आहे आणि कमालीची अस्वस्थता पसरली आहे, त्याने आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत विदारक चित्र समाजासमोर आणले. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांच्या पालकांची स्वप्ने या घोटाळ्यांमुळे एका रात्रीत धुळीस मिळाली आहेत. परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्था, कोचिंग क्लासेसचे चालक आणि मध्यस्थ यांच्यामधील परस्परांचे एकमेकांशी असलेले साटेलोटे आता उघड होत आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

क्लासेसचे कनेक्शन आणि धक्कादायक ‌‘मोडस ऑपरेंडी‌’

या संपूर्ण प्रकरणातून पुढे आलेली सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, ज्या शिक्षकांवर समाज घडवण्याची आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी असते, त्याच कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांचा या गैरप्रकारांमधील थेट सहभाग समोर येत आहे. आज कोचिंग क्लासेस हे केवळ ज्ञानदानाचे केंद्र राहिले नसून, ते करोडो रुपयांची उलाढाल करणारे व्यावसायिक केंद्र बनले आहेत. बाजारपेठेत स्वतःच्या क्लासचे नाव मोठे व्हावे, आपल्या क्लासमधूनच ‌‘टॉपर‌’ निघावा आणि पुढच्या वर्षी कोट्यवधी रुपयांचे ‌‘ॲडमिशन‌’ मिळावेत, या व्यावसायिक हव्यासापोटी हे शिक्षक व चालक पेपरफुटीच्या जाळ्यात ओढले जातात.

वर्तमानपत्रांतून, तसेच विविध माहिती-स्रोतांतून आलेल्या बातम्यांवरून असे दिसते की, या चक्राची ‌‘मोडस ऑपरेंडी‌’ (कार्यपद्धती) अत्यंत नियोजनबद्ध, ‌‘हायटेक‌’ असते.

गोपनीय साखळी व रॅकेट : क्लासचालक आणि शिक्षक प्रथम परीक्षा नियंत्रण मंडळातील भ्रष्ट अधिकारी, छपाई केंद्र (प्रिंटिंग प्रेस) किंवा वाहतूक करणाऱ्या एजन्सींशी आर्थिक संधान साधतात. तेथून परीक्षेच्या काही तास किंवा दिवस आधी प्रश्नपत्रिका गोळा केल्या जातात.

गुप्त ‌‘सेफ हाऊस‌’ व पाठांतर सत्रे : पेपर हाती आल्यानंतर कोचिंग क्लासेसचे हे शिक्षक अत्यंत गुप्त ठिकाणी निवडक विद्यार्थ्यांची, ज्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळले आहेत, त्यांची बैठक घेतात. तिथे हे शिक्षक स्वतः रात्रीतून त्या प्रश्नपत्रिकांच्या अचूक उत्तरांची ‌‘आन्सर की‌’ तयार करतात आणि विद्यार्थ्यांकडून ती उत्तरे घोकून घेतात, पाठ करून घेतात.

डिजिटल गैरप्रकार : अनेकदा सोशल मीडियावरील ‌‘एन्क्रिप्टेड ॲप्स‌’चा (उदा. ‌‘टेलिग्राम‌’, ‌‘व्हॉट्सॲप‌’)वापर करून परीक्षेच्या काही मिनिटे आधी लाखो रुपयांना हे पेपर्स विकले जातात. गुणांच्या शर्यतीत आपल्या क्लासचा टक्का वाढवण्यासाठी शिक्षक स्वतःच गुणवत्तेचा लिलाव मांडतात, ही या व्यवस्थेतील सर्वांत मोठी शोकांतिका आहे.
या जाळ्याला आळा कसा घालता येईल?

या जीवघेण्या व्यावसायिक साखळीला, पेपरफुटीच्या रोगाला वेळीच आळा घालणे देशाच्या भविष्यासाठी अनिवार्य आहे. यासाठी काही उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे आहे, असे वाटते.

कठोर कायदेशीर कारवाई व अजामीनपात्र गुन्हा:
पेपरफुटीमध्ये सामील असलेल्या कोचिंग क्लासेसच्या चालकांना, शिक्षकांना थेट अजामीनपात्र गुन्ह्याखाली अटक करून त्यांच्यावर कठोर कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे. दोषी आढळल्यास संबंधित क्लासेसचा परवाना कायमचा रद्द करून त्यांची मालमत्ता जप्त करावी.

परीक्षा पद्धतीत तांत्रिक बदल (डिजिटल सुरक्षा):
पारंपरिक छपाई, वाहतूक पद्धती बदलून ‌‘जस्ट इन टाईम‌’ डिजिटल प्रश्नपत्रिका प्रणाली वापरली जावी, जिथे थेट परीक्षेच्या दहा मिनिटे आधी ‌‘डिजिटल लॉकर‌’ उघडून पेपर थेट विद्यार्थ्यांच्या संगणकावर किंवा केंद्रावर प्रिंट होईल.

कोचिंग क्लासेसचे नियमन व ऑडिट :
देशातील सर्व कोचिंग क्लासेससाठी कडक नियमावली (Regulating Act) असायला हवी. त्यांच्या उत्पन्नाचे, विद्यार्थ्यांच्या वाढीव निकालांचे, संशयास्पद कामगिरीचे सरकारी पातळीवर नियमित ‌‘ऑडिट‌’ होणे गरजेचे आहे.

व्यावसायिक गणिते आणि पालकांची मानसिकताः आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात आपल्या मुलाला स्पर्धा परीक्षांमध्ये, मग ती ‌‘नीट‌’ असो, ‌‘जेईई‌’ असो वा ‌‘सीईटी‌’, उत्तम गुण मिळवून चांगल्या नामांकित विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळावा, ही प्रत्येक पालकाची प्रामाणिक इच्छा असते. आपली मुले मागे पडू नयेत म्हणून पालक कर्ज काढून, स्वतःच्या गरजांना मुरड घालून लाखो रुपये या कोचिंग क्लासेसना मोजतात. या पालकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत गेल्या काही वर्षांत, दोन-तीन दशकांत शिक्षण क्षेत्रात एक नवीनच ‌‘व्यापारी संस्कृती‌’ उदयाला आली आहे. अनेक नामांकित कॉलेजेसनी या कोचिंग क्लासेससोबत अंतर्गत हातमिळवणी (संगनमत) करून ‌‘इंटिग्रेटेड कोर्सेस‌’ सुरू केले आहेत, जिथे कॉलेजमध्ये न जाता थेट कोचिंग क्लासेसमध्येच हजेरी लावली जाते.

तसे पाहिले तर, आजकाल पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर अगदी ‌‘केजी‌’(बालवाडी)पासूनच लाखो रुपये खर्च करायला सुरुवात करतात. पुढे शाळा, हायस्कूल, उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत हा खर्च करोडोंच्या घरात पोहोचलेला असतो. यामागे पालकांचा एकच उद्देश असतो की, मुलाने इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर किंवा व्यवस्थापन (मॅनेजमेंट) यांसारख्या उच्च क्षेत्रात करिअर करावे आणि बक्कळ पैसा कमवावा.

‌‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट‌’ आणि नैतिक अधोगती

बाजारपेठेच्या नियमाप्रमाणे जेव्हा पालकांकडून शिक्षणात एवढी मोठी आर्थिक गुंतवणूक होते, तेव्हा साहजिकच ही गुंतवणूक लवकरात लवकर कशी परत मिळेल, म्हणजेच ‌‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट‌’ कशी साधता येईल, यावरच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे विचारचक्र सुरू होते. समाज घडवण्याच्या पवित्र उद्देशाऐवजी शिक्षणाकडे जेव्हा केवळ एक आर्थिक गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, तेव्हाच नैतिकतेचा बळी जातो. उच्चशिक्षण पूर्ण करून करिअर सुरू झाल्यानंतर मिळणारा पगार सर्वांनाच लाखो-करोडो रुपयांमध्ये नसतो, हे आजचे कटू वास्तव आहे.

संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा विचार केला, तर केवळ एक किंवा दोन टक्के विद्यार्थ्यांनाच अशा प्रचंड पगाराच्या नोकऱ्या मिळतात. उर्वरित मध्यमवगय किंवा सर्वसामान्य मुलांना ते डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले, तरी सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पगार मिळत नाही. इथेच मुलांच्या मानसिकतेवर प्रचंड ताण येतो. गुंतवलेला पैसा झटपट वसूल करण्यासाठी मग ‌‘शॉर्टकट‌’ शोधण्याचे विचारचक्र सुरू होते. यातूनच पुढे वैद्यकीय, व्यावसायिक क्षेत्रात ‌‘कट प्रॅक्टिसेस‌’, ‌‘कट मनी‌’, अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याच्या प्रवृत्ती बळावतात. जेव्हा शिक्षणाचा उद्देश केवळ गुंतवणूक आणि परतावा असा होतो, तेव्हा समाज घडवण्याची प्रक्रिया थांबते आणि तेथूनच नैतिक अधोगतीची सुरुवात होते, हे गंभीर वास्तव आहे.

सामाजिक मूल्यांचा ऱ्हास आणि भविष्यातील आव्हान

आपली सामाजिक मूल्ये किती वेगाने ढासळत चाललेली आहेत, याचे मूळ आजच्या बाजारीकरण झालेल्या शिक्षण पद्धतीत स्पष्ट दिसते. याला आणखी खतपाणी घालण्याचे काम सोशल मीडिया, ‌‘ओटीटी‌’ प्लॅटफॉर्म्स करत आहेत. या माध्यमांवरून सातत्याने दाखवली जाणारी विविध प्रलोभने, आलिशान व छानछोकीची जीवनशैली, खोट्या प्रतिष्ठेचा देखावा तरुणाईला भुरळ पाडत आहे. ही श्रीमंती, चकाचक आयुष्य आपल्याही वाट्याला यावे, यासाठी अफाट पैशांची गरज भासते. आधीच शिक्षणामध्ये करोडो रुपये खर्च झालेले असल्यामुळे तो पैसा लवकरात लवकर आणि कोणत्याही मार्गाने कसा मिळवता येईल, या विचारातून लोक वाममार्गाकडे वळतात. ही ‌‘नीट‌’ पेपरफुटीची प्रकरणे याच अनैतिक मानसिकतेचे अपत्य आहेत.

ज्या शिक्षकांकडे पाहून विद्यार्थ्यांनी, समाजाने आदर्श घ्यावा, तेच शिक्षक जर कोणत्याही नैतिकतेचा धरबंध न बाळगता; केवळ पैसा कमावण्याच्या उद्दिष्टाने शिक्षण क्षेत्राकडे पाहत असतील, तर हे आपल्या समाजाचे मोठे दुर्दैव आहे. अशा अनैतिक मार्गांचा अवलंब करून आज समाजात काही ‌‘शिक्षणसम्राट‌’ निर्माण झाले आहेत, जे समाजात मोठी (खोटी) प्रतिष्ठा मिरवत वावरत असतात. एकीकडे आपण भारताला जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील अनैतिकता यांसारख्या मूलभूत अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, याची जाणीव शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञमंडळींना वेळेत व्हायला हवी.

शिक्षण क्षेत्रातील नैतिकता एकदा का घसरू लागली, सर्वसामान्य जनतेचा परीक्षा पद्धतीवरील व एकूणच शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडू लागला, तर ते देशाच्या सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरेल. बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत झालेल्या शिक्षणाच्या या बाजारीकरणाला वेळीच वेसण घालण्याची गरज आहे. शिक्षणामुळेच समाज घडतो, म्हणूनच शालेय स्तरावर, प्रत्येक घराघरांमध्ये पालक व शिक्षकांनी मुलांना लहानपणापासूनच मूल्यांची, नैतिकतेची शिकवण दिली पाहिजे. केवळ गुणांच्या शर्यतीत धावणारे, पैशाच्या मागे लागणारे ‌‘रोबोट‌’ तयार करण्यापेक्षा, नैतिक मूल्यांची जपणूक करणारा ‌‘संवेदनशील नागरिक‌’ घडवणे, हेच या समस्येवरील खरे उत्तर आहे. तरच, भविष्यात एका सुदृढ, सशक्त, प्रामाणिक समाजाची निर्मिती शक्य होईल.

- सुहास बेलापूरकर