मुंबई : (Kaustubh Dhavse) बदलती भूराजकीय स्थिती, एआयमुळे निर्माण झालेली आव्हाने, ग्रीन ट्रान्झिशन या सगळ्यांचा एकूणच आगामी काळात राज्याच्या जडणघडणीवर परिणाम होतो आहे. या संपूर्ण परिस्थितीत आपण एक राज्य म्हणून आपली उत्तम छाप सोडली आहे. महाराष्ट्र हे ६६० अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे. आपली लोकसंख्या १२९ कोटी इतकी आहे. त्यातील ६५ टक्के लोक २७ वर्षांखालील आहे तर, ५० टक्के लोकसंख्या बालवाडी ते १२ वी पर्यंतची आहे.
त्यामुळे आपल्याकडे एक उत्तम लोकसांख्यिकीय लाभांश आहे. परंतू, जर आपल्याकडे राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर योग्य नेतृत्व नसेल आणि जर आपण लोकांना कुशल बनवले नाही, तर हा लोकसंख्याशास्त्रीय तफावत एका लोकसंख्याशास्त्रीय वक्रात बदलेल अर्थात ती शापही ठरू शकते.
त्यामुळे आपण वेगाने कृती करणे, कामांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणे आणि मूल्यनिर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्याच्या या युगात, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या बाबतीत इतर राज्यांकडून आपल्याला वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जर तुम्ही अधिक वेगाने कृती केली नाही, तर तुमचा निभाव लागणार नाही आणि जर तुम्ही व्यवसायाच्या गतीशी ताळमेळ राखत कृती केली नाही, तर तुम्ही कालबाह्य ठराल. म्हणूनच, त्या दिशेने काम करणे गरजेचे आहे, असे सांगत पुढील काही वर्षांत, एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणारे आपले पहिले राज्य असेल, असा विश्वास कौस्तुभ धवसे यांनी व्यक्त केला.(Kaustubh Dhavse)
ते म्हणाले की, २००० ते २०१०, २०१० ते २०१४ आणि २०१४ ते आतापर्यंतची तुलना केल्यास महाराष्ट्र राज्य, नोकरशाही, गुंतवणूकदार तेच आहेत मग बदलले काय? तर, वस्तुस्थिती अशी आहे की, एक व्यक्ती, त्यांची दूरदृष्टी, गुंतवणूकदारांवर प्रभाव पाडण्याची त्यांची क्षमता, प्रशासनाशी संवाद साधून त्यांना जनहिताची कामे मार्गी लावण्यास प्रवृत्त करणे या सर्व बाबींचा परिपाक म्हणूनच ही प्रचंड मोठी झेप शक्य झाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्राची ओळख अधोरेखित करणारा एकच निर्णायक घटक आहे आणि तो म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस.
एक व्यक्ती आली आणि तिने संपूर्ण महाराष्ट्राच बदलून टाकला. आज महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि प्रत्येक राज्य महाराष्ट्राशी स्पर्धा कशी करावी, याचा विचार करत आहे. हाच एक मूलभूत बदल आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पांबद्दल बोलताना ते म्हणाले, पायाभूत सुविधांचा विचार केल्यास मुंबईत आधीच्या सरकारच्या काळात वर्सोवा ते घाटकोपर ही ११ किमी मेट्रो ११ वर्षांत सुरु झाली. पण, २०१४ ते २०१९ या काळात फडणवीसांनी ३७२ किमी मेट्रोचे जाळे उभारले. देवेंद्र फडणवीसांनी पायाभूत सोयीसुविधांतून विकास साधला. राज्यातील प्रकल्प गतिमान करण्यासाठी आणि प्रशासनामधील समन्वयासाठी मुख्यमंत्री वॉररुम सुरु केली. ६ महिन्यांत टेंडर पूर्ण केले. त्यात हस्तक्षेप आणि बदल करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळेच आपण पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकलो. मोठे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर निघून जात होते, पण एकल खिडकी योजनेमुळे उद्योगधंदे वाढले.
यासोबतच कौस्तुभ धवसे (Kaustubh Dhavse) यांनी नवी मुंबई विमानतळ, आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, वाढती गुंतवणूक, उद्योगधंदे अशा अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले, नवी मुंबईत आपण आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी तयार करणार आहोत. आम्ही ७ परदेशी विद्यापीठांसोबत करार केला असून ते त्यांची सर्वोत्तम विद्यापीठे भारतात उभारणार आहेत. सर्वोत्कृष्ट ५० विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाने आपल्यासोबत करार केला आहे. २०३२ पर्यंत ३०० एकर भूभागावर नवी मुंबईत हा प्रकल्प उभा राहणार असून ७५ हजार विद्यार्थी तिथे शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थी जिथे शिकतात, तिथेच काम करतात.
त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्रातच शिक्षण घेऊ शकतील. यासोबतच आंतरराष्ट्रीय मेडिसिटी, सर्वोत्तम हेल्थकेअर इन्सिट्युशन हे दोन महत्वाचे प्रकल्प सध्या आमच्यापुढे आहेत. तिसरी मुंबई ही देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय असून तिथे आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, आंतरराष्ट्रीय मेडिसिटी, स्पोर्ट सिटी असेल. ही संपूर्ण परिसंस्था नवा महाराष्ट्र उभारणार आहे.(Kaustubh Dhavse)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....