महापालिकेच्या सुरक्षा विभागातील पदोन्नती वाद न्यायालयात- २०१७ बॅचच्या अधिकाऱ्यांचा अन्यायाचा आरोप

    24-May-2026
Total Views |
BMC Security Department
 
मुंबई : (BMC Security Department) मुंबई महापालिका सुरक्षा विभागातील पदोन्नतीचा वाद आता न्यायालयात पोहोचला असून, २०१७ मध्ये थेट भरती झालेल्या सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्वलक्षी प्रभावाने ज्येष्ठता देत २०२५ मध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना विभागीय सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नतीसाठी पुढे आणले जात असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.
 
प्रसाद डोके, सुशील साहनी, पूजा बुरांडे आणि दिलीप पवार हे अधिकारी २०१७ मध्ये खुल्या भरती प्रक्रियेतून सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून रुजू झाले होते. सध्या त्यांची सलग नऊ वर्षांची सेवा पूर्ण झाली असून विभागीय सुरक्षा अधिकारी पदासाठी ते पात्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
मात्र, १ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम सेवाज्येष्ठता यादीत बदल करून २०२५ मध्ये रुजू झालेल्या संजीव वाडकर, हसन खान आणि आशिष चित्रे यांना २०१३ पासून पूर्वलक्षी ज्येष्ठता देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.(BMC Security Department)
 
या निर्णयामुळे मूळ यादीतील २०१७ बॅचच्या अधिकाऱ्यांची क्रमवारी मागे गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांकडे प्रत्यक्ष सात वर्षांचा अनुभव नसतानाही त्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांची बाजू मांडली गेली नाही आणि त्यांना नोटीसही देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
 
 
संबंधित उमेदवारांनी आर्थिक लाभांचा त्याग करण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. ही प्रशासनाशी झालेली तडजोड असून त्यामुळे मूळ सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
या प्रकरणाविरोधात २०१७ बॅचच्या अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना घाईघाईने पदोन्नती देऊ नये, अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे.(BMC Security Department)