भुलेश्वर म्हटले की, मुंबईकरांसमोर येथील कापडाची सुप्रसिद्ध बाजारपेठ, मुंबादेवी मंदिराचा परिसर चटकन डोळ्यासमोर येतो. परंतु, प्राचीन असे भुलेश्वर मंदिर हे पुण्याच्या पुरंदर जिल्ह्यात ‘मंगळगड’ किल्ल्याच्या शिखरावर स्थित आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या किल्ल्याच्या आवरणाखाली लपलेल्या या शिल्पविश्वाची सैर घडविणारा आजचा लेख...
पुणे-सोलापूर महामार्गावर यवतजवळ एक फाटा लागतो, तो दहा किलोमीटर आत जातो आणि एका उजाड, करड्या डोंगराच्या माथ्यावर आपल्याला घेऊन जातो. हा डोंगर म्हणजे एकेकाळचा ‘मंगळगड’ किंवा ‘दौलतमंगळ किल्ला.’ आणि त्याच्या शिखरावर उभे आहे एक असे मंदिर, जे पहिल्या दर्शनात मंदिरच वाटत नाही.
उंच दगडी भिंती, बुरुजासारखे कोपरे, अरुंद प्रवेशद्वार - भुलेश्वर मंदिराचे बाह्यरूप पाहून क्षणभर भ्रम होतो की, आपण कुठल्या तरी मध्ययुगीन किल्ल्यात शिरत आहोत. परंतु, आत पाऊल टाकताच हा भ्रम विरतो आणि एक वेगळेच, अनपेक्षित जग उलगडत जाते. दगडावर दगड रचलेल्या या वास्तूच्या आतल्या भिंती म्हणजे, जणू एक जिवंत शिल्पकोश आहे, जिथे देवता नृत्य करतात, अप्सरा मृदंग वाजवतात आणि पुराणकथा दगडात गोठलेल्या आहेत. भुलेश्वर हे केवळ एक प्राचीन शिवमंदिर नाही, ते महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत बहुस्तरीय, गुंतागुंतीच्या कालखंडाचे मूक साक्षीदार आहे.
भुलेश्वर मंदिर समजण्यासाठी आधी त्याचे तीन वेगवेगळे ऐतिहासिक थर समजून घेणे आवश्यक आहे. यादव राजा महादेव किंवा रामचंद्र यांच्या काळात सुमारे इसवी सन 1230च्या आसपास, मूळ मंदिराचा जीर्णोद्धार झाला - काळ्या बेसाल्ट दगडात. हा मूळ यादवकालीन गाभा आजही आतून स्पष्ट ओळखता येतो. दुसरा थर आहे इसवी सन 1629चा - आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव पंडित याने या मंदिराच्या भोवती दौलतमंगळ किल्ला बांधला. पुण्यावर नजर ठेवण्यासाठी उभारलेल्या या तटबंदीमुळे मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले. तिसरा थर आहे मराठा-पेशवे काळातील - शिखराचे चुना-जिप्समचे बांधकाम त्या काळात झाले. म्हणूनच मंदिराचे शिखर आणि भिंती या दोन वेगळ्या रंगांचे, दोन वेगळ्या दगडांचे दिसतात.
भुलेश्वरच्या स्थापत्यावर गुजरात-मालव्याच्या चालुक्य आणि परमार परंपरेचा प्रभाव आहे - हिऱ्याच्या आकाराचे अलंकार, वेलबुट्टी आणि खांबांवरील पिलास्टर्स हे सर्व त्या परंपरेतून आलेले आहेत. पण, त्याचवेळी शिखराची भूमिज शैली ही मध्य भारताच्या परमार मंदिरांशी नाते सांगणारी आहे. म्हणजे भुलेश्वर हे एकाच वेळी महाराष्ट्र, गुजरात आणि मालव्याच्या स्थापत्य परंपरांचा त्रिवेणी संगम आहे.
मंदिरात प्रवेश करताना अरुंद पायऱ्या चढाव्या लागतात. वर आल्यावर नंदीमंडपात एक भव्य, शाबूत नंदी आपले स्वागत करतो - शांत, स्थिर, डोळे गर्भगृहाकडे रोखलेले. येथून पुढे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे पारंपरिक भाग येतात. परंतु, भुलेश्वरमध्ये एक वेगळीच गोष्ट घडते - मंदिराच्या रचनेमुळे गर्भगृहाच्या एका बाजूला सजवलेल्या भिंती आणि दुसऱ्या बाजूला देवकोष्ठ असलेली नंतरच्या काळातली भिंत अशी एक भव्य वाट तयार होते. या वाटेत जेव्हा बाहेरचा सूर्यप्रकाश तिरका येतो, तेव्हा दगडावरील शिल्पे जिवंत झाल्यासारखी वाटतात - सावल्या हलतात, मूतचे भाव बदलतात. हा प्रकाशाचा खेळ छायाचित्रकार आणि कलाकारांसाठी एक विलक्षण अनुभव आहे. हे अकस्मात नाही, यादवकालीन शिल्पींनी हे जाणीवपूर्वक रचले होते. प्रकाश हाच या शिल्पांचा चौथा आयाम आहे.
सभामंडपाच्या वेदी-भिंतींवर महाभारत आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. नृत्यांगनांच्या मूत, अप्सरा, मृदंग आणि वीणा वाजवणाऱ्या गंधर्विणी - प्रत्येक कोरीवकाम इतके सूक्ष्म आहे की, त्यांच्या दागिन्यांचे प्रत्येक तपशील, केशरचनेची प्रत्येक वळणं स्पष्ट दिसतात. विशेषतः आरशात स्वतःला पाहणाऱ्या स्त्रीची मूत, विंचू धरलेल्या चामुंडेचे भयावह, परंतु सौंदर्यपूर्ण शिल्प, महाभारतात असणाऱ्या शरपंजरी पडलेल्या भीष्माला बघताना डोळे पाणावतात आणि - हे सर्व पाहताना माणूस थक्क होतो.
भुलेश्वरचे सर्वाधिक वेधक आणि विद्वानांना सतत भुरळ घालणारे वैशिष्ट्य म्हणजे, गर्भगृहाच्या अंतर्भागातील एक असामान्य शिल्पसमूह.
गर्भगृहाभोवतालच्या उंच कोरीव पट्टीत एका ओळीत स्त्रीरूपातील देवता आहेत. परंतु, या साध्या देवता नाहीत. यात आहे महेश्वरी - म्हणजे शिवाचे स्त्रीरूप, त्याच्या डाव्या बाजूला आहे ‘वैनायकी’ किंवा गणेशाचे स्त्रीरूप आणि उजव्या बाजूला कार्तिकेयाचे स्त्रीरूप ‘कौमारी.’ तिन्हींच्या पायाशी अनुक्रमे नंदी, उंदीर आणि मोर - त्यांचे वाहन कोरलेले आहे. हे केवळ अलंकारिक नाही; हे एक तात्त्विक विधान आहे.
आपण अर्धनारीश्वर ओळखतो - शिव आणि पार्वती एकत्र. परंतु, पुरुष देवतांचे संपूर्ण स्त्रीरूप हे वेगळे आहे. याला शाक्त परंपरेतील शक्तीने सर्वांना व्यापले आहे, या तत्त्वाशी जोडता येते. प्रत्येक देवाची शक्ती त्याच्यापासून स्वतंत्र नाही, ती त्याच्यातच आहे - हा विचार या शिल्पांमध्ये दगडात उतरवलेला आहे. महाराष्ट्रातील इतर कुठल्याही मंदिरात असा संपूर्ण स्त्रीरूप त्रिमूत पाहायला मिळत नाही - हे भुलेश्वरचे अतुलनीय योगदान.
‘भुलेश्वर’ या नावाचा अर्थ सांगताना लोककथा सांगते की, शिवाने येथे पार्वतीला भुलवले - त्याने नृत्य केले, मोहित केले, आणि मग दोघे कैलासाला गेले. यावरूनच भुलेश्वर - भुलवणारा ईश्वर. दुसरी व्युत्पत्ती सांगते की, ‘भूलेश’ म्हणजे ‘भूतलाचा स्वामी’ म्हणजेच शिव. परंतु, या मंदिरात प्रवेश केल्यावर या नावाचा एक तिसरा अर्थही जाणवतो - हे मंदिर माणसाला स्वतःच्या दैनंदिन जगापासून भुलवते, एका वेगळ्याच काळात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. त्या अर्थाने ‘भुलेश्वर’ हे केवळ शिवाचे नाव नसून या ठिकाणाचा स्वभाव आहे.
भुलेश्वरच्या अनेक शिल्पांवर हेतुपुरस्सर घाव घातलेले दिसतात - तोंडे तोडलेली, हात खंडित केलेले. हे सगळे मुघल काळातील आक्रमणाचे व्रण आहेत. परंतु, लक्षात येते की, संपूर्ण मंदिर नष्ट होऊ शकले नाही. इथल्या मूत फोडल्या, पण त्यातले सौंदर्य नष्ट करणे कुणालाही जमले नाही.