दि. 11 मे, दुपारी 2ची वेळ... फोन आला. बापूराव कुलकर्णी गेल्याची दुःखद वार्ता समजली. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. पण, आताच ऐकावी लागेल ही अपेक्षा नव्हती. धक्का तर बसलाच. पण, गेल्या सुमारे 60 वर्षांपासूनचा बापूरावांचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहिला. मन भरून आले, सुन्न झाले... त्यानिमित्ताने बापूंच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
गेल्या 60 वर्षांपेक्षा अधिक काळ पुण्यातील संघकामात सक्रिय असलेले, झोकून देऊन काम केलेले, सर्व कार्यक्रमांत हिरिरीने सक्रिय असलेले अनेक स्वयंसेवक, कार्यकर्त्यांच्या मनात स्थान असणारे बापूराव आला पुन्हा दिसणार नाहीत, भेटणार नाहीत, या भावनेने मन अस्वस्थ झाले.
बापूरावांचे पूर्ण नाव सुधाकर मार्तंड तथा बापू कुलकर्णी, दुग्धव्यवसाय असा परिचय अनेक बैठकीत ऐकण्याची सवय झालेली. दि. 19 जुलै 1939 हा त्यांचा जन्मदिवस. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1961 ते 1965 नागपूरला शाळेत शिक्षक म्हणून नोकरी, 1965 साली पुण्यात, 1965 व 66 दोन वर्षे रमणबाग प्रशालेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.
1966 पासून ते दुग्धव्यवसायात उतरले. सकाळचे दूध टाकण्याचे काम ते सायकलवर करायचे. मावळ भागातील ज्या गवळी बंधूंकडून दूधसंकलनाचे काम व्हायचे, त्या सर्वांशी स्वाभाविकपणे घरगुती संबंध निर्माण झाले. अशा सर्वांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी फराळाला बापू आमंत्रित करायचे. त्यांना कपडे करत. त्यामुळे अगदी सर्वांशीच त्यांचे आपुलकीचे संबंध. त्यातून स्वयंसेवक म्हणून वेगळेपण आवर्जून जपले. नंतर कसबा गणपती परिसरात ‘भारतीय दुग्धालय’ म्हणून डेअरी सुरू केली. सकाळी शाखा सुटल्यानंतर अनेक स्वयंसेवक तेथे येत, भेटी होत. चहा घेतल्याशिवाय कोणी जायचे नाही, असा दंडक असे.
चार वर्षे नागपूरला शिक्षक म्हणून नोकरीत असताना नागपूर संघकार्यालयात निवास होता. यामुळे पू. श्री. गुरुजी, पू. बाळासाहेब देवरस, डॉ. आबाजी थसे, पांडुरंगपंत क्षीरसागर, मा. मोरोपंत पिंगळे अशा अनेक श्रेष्ठ, ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी आत्मीयतेचा संबंध होता. त्यांच्यावर बापूरावांची श्रद्धा, निष्ठा होती. पू. बाळासाहेब देवरस आवर्जून त्यांच्या विवाहास उपस्थित राहिले होते.
पुण्यात आल्यावर दुग्धव्यवसायाबरोबरच बापूंचे संघाचे काम सुरू होतेच. शाखा कार्यकर्त्यांपासून त्यांनी कामास प्रारंभ केला. तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. या काळात पुण्यातील कै. बाबाराव भिडे, तात्याराव बापट, दामुअण्णा दाते, श्रीपतीजी शास्त्री, बाळासाहेब वझे, मुकुंदराव पणशीकर अशा अनेकांशी जवळचे संबंध होते.
पुण्यात शाखेपासून नगरकार्यवाह म्हणून प्रारंभी रास्ता, सोमवार, मंगळवार पेठेतही त्यांनी काम केले. त्याचबरोबर नाना, भवानी, गंज, गणेशपेठेत काम केले. दुग्धव्यवसाय असल्याने सायकलवर घरोघरी दुधाचा रतीब घालण्याचे काम त्यांनी केले. त्यातून अनेक घरांशी कौटुंबिक संबंध. असे संबंध असायचे की, दूध घालण्याचे काम करायचे, त्याच घरात चहा घ्यायचे. अनेक कुटुंबांचे केवळ सदस्य नाही झाले, तर त्या घरांमध्ये बापूरावांचा निर्णय अंतिम असायचा. या नात्याने अनेकांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवायचे. अनेक घरांतील स्थिती पाहून अनेकांना नोकरी लावण्यासाठी बापूरावांनी प्रयत्न केले. तसेच उद्योग-व्यवसायासाठी साहाय्यदेखील केले. आजारी व्यक्तींच्या औषधोपचाराची व्यवस्था करण्यापासून ते त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेत बापूरावांनी अनेकांचे विवाहदेखील जुळवले. बापूराव ज्या लग्नाच्या बैठकांमध्ये असायचे, तिथे लग्न जुळवूनच बैठक संपायची. प्रत्यक्ष विवाहप्रसंगी पंगतीत वाढप करण्यापासून सर्व कामेही ते अगदी सहजपणे करायचे. प्रसंगी आर्थिक साहाय्यही करायचे. सर्व गोष्टी कोणताही गाजावाजा न करता, जणू आपल्या घरातील काम आहे, या भावनेने. सकाळचे दूध टाकण्याचे काम झाले की, मग बापूराव रात्री उशिरापर्यंत संघकामात व्यस्त. त्यांची दिनचर्याही तशी धावपळीची होती. शाखा, भेटी, संपर्क, बैठका या सर्व कामांसाठी त्यांनी अखंड परिश्रम उपसले. सुरुवातीला सायकल नंतर ‘लुना, एम 50’ स्कूटर असा त्यांचा प्रवास असायचा. पण, यामुळे कुठे तरी व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. अनेकदा तोटादेखील सहन करावा लागला. पण, तरीही संघकाम असताना चहा, खाणेपिणे, प्रसंगी भोजन असे कार्यकर्त्यांसाठी खर्चही ते तितक्याच बिनबोभाटपणे आपल्या खिशातूनच करायचे. त्यासंबंधी त्यांनी कधीही तक्रार केलेली आठवत नाही. कारण, त्यातच त्यांना आनंद असायचा. कार्यकर्त्यांचे वाढदिवस, केळवणही आवर्जून लक्षात ठेवून, कष्ट करून साजरे करत असत.
संघकाम करत असताना हिवाळी शिबिरात अनेक वर्षे ‘उभारणी प्रमुख’ हे अत्यंत कष्टाचे काम बापूराव सहजपणे करायचे. त्याचे तंत्र त्यांना पूर्णपणे अवगत होते. त्याचे बारकावेही माहीत होते. संघशिक्षा वर्ग मे महिन्यात पुण्यातच त्यावेळेस व्हायचे. त्यात उपाहारगृहाचे काम करायचे. पहाटेचा चहा, खाण्याचे पदार्थ, रात्री उशिराचा चहा करायचे. हे सर्व काम साहजिकच कष्टप्रद होते. पण, बापूराव कधीही कुरकूर करायचे नाहीत की नाराजीही व्यक्त करायचे नाही.
पुण्यातील व्यापारी वर्गाशीही बापूरावांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्याने, संघाचे विविध कार्यक्रम, शिबीर, संघ शिक्षावर्गासाठी धान्य संकलन करणे हे आपले काम आहे, अधिकाऱ्यांनी सांगायची ते वाटही पाहात नसत. त्या व्यापारी बंधूंना शिबीरे-वर्ग पाहण्यासाठीही बापूराव आवर्जून बोलवायचे. संघ अधिकाऱ्यांशी परिचय करून द्यायचे. या सर्व गोष्टींसाठी धावपळ, कष्ट करणे, झीज सोसणे हे त्यांच्या अंगवळणीच पडले होते. हे सर्व करताना अनेक वेळा अगदी वाईटपणाही यायचा. तोही ते सहन करण्यासाठी सदैव तयार असायचे आणि हे त्यांनी गृहीत धरलेलेच असायचे.
आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून अनेक स्वयंसेवकांशी, कुटुंबीयांशी बापूराव संपर्क ठेवायचे. त्या काळात सर्व प्रकारची कामे करणे म्हणजे संकट ओढवून घेणेच होते. पण, ती जोखीम स्वीकारून त्यांनी अनेक कामे सहजपणे केली.
विविध कामांसाठी निधीसंकलन करणे, हे तर बापूरावांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. मोतीबाग कार्यालयाचे बांधकाम, गोविज्ञान संस्था, धर्मजागरण विभाग, सा. ‘विवेक’, ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, ‘एकता’ मासिक यांचे वर्गणीदार वाढविणे, विशेषांकांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करणे, स्वत: विकत घेऊन अनेकांना विकणे, भेट देणे, घेण्याचा आग्रह करणे, अनेकजणांकडे अशा रकमेची आग्रही मागणी बापूरावांनी केली. अनेकांनी ती पूर्णही केली.
स्व. बापूराव देशस्थ ॠग्वेदी संस्था, शनिवारवाड्यासमोरील बटाट्या मारुती मंडळ, समर्थ मंडळ, गोविज्ञान संस्थांचे विश्वस्त होते. त्या सर्व संस्थांच्या बैठकीला आवर्जून उपस्थित असायचे. कार्यक्रम, उपक्रम ठरवायचे. त्यात सक्रिय भागही द्यायचे, ही त्यांची विशेषतः होती. सा. ‘विवेक’, ‘धर्मजागरण’ निधीसंकलन मोठ्या प्रमाणात केल्याने पू. मोहनजींच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला होता.
पूर्व भागात बापूरावांनी संघाचे काम मनापासून केले. 40-50 वर्षांपूर्वी त्या भागात हिंदुत्ववादी विचाराला, संघकामाला अनुकूलता नव्हती. कार्यकर्ते संख्येने कमी होते. संघकामासाठी हा भाग कसोटी घेणारा असे. पण, बापूरावांनी अक्षरश: झोकून देऊन काम केले. वेळ पाहिली नाही की कष्टाची चिंता केली नाही. आपल्या प्रचंड संपर्कातून काम तर केलेच. पण, अनेकांच्या घरात, कार्यकर्त्यांच्या पालकांच्या मनात आपले स्थानही सहजगत्या-नकळतपणे प्राप्त केले, हे त्यांचे विशेष योगदान आहे. राजेंद्रजी, बंकटशेट मुंदडा, अनिल कुमारजी मिश्रा या सगळ्यांना संघात दायित्व देऊन आजही ते सक्रिय आहेत. त्यांच्या घरात संघाला, बापूरावांना विशेष स्थान आहे.
कै. मोरोपंतांनी संघात ‘गाय’ या विषयाला चालना दिली, प्रबोधन केले. या विषयासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, संस्थेला कै. मोरोपंतांच्या नावाने पुरस्कार देण्याची प्रथा बापूरावांनी सुरू केली.
4 मे या दिवशी बापूराव जुन्या त्यांच्या काळात घडलेल्या स्वयंसेवकांचे एकत्रीकरण करीत असत. तीन-चार तासांचा तो कार्यक्रम असे. भोजनाचाही अंतर्भाव असे. सर्व नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना बोलावत असत. वर्षभरात त्यांनी केलेल्या विशेष योगदानाचा उल्लेख करून त्यांचा सन्मान करत. परगावी असलेल्यांना बोलावत. बापूरावांच्या शब्दाखातर ते प्रवास करूनही येत असत. या कार्यक्रमाची सर्व व्यवस्था, नियोजन, सर्वांशी संपर्क बापूराव आवर्जून करीत असत. त्यावष काही विशेष कामासाठी निधीसंकलन असेल, तर ते आवाहनही बापूराव करीत. स्वत:ही निधीसंकलनासाठीचे योगदान देत असत. अनेक स्वयंसेवक आज मोठ्या पदांवर काम करतात; आर्थिकदृष्ट्याही संपन्न, समृद्ध आहेत. तरीही, बापूरावांचे स्थान त्यांच्या जीवनात वडीलकीचेच होते. त्यांच्या शब्दाला मान होता. तो मान देण्यात धन्यता मानणारे अनेकजण आहेत.
सौ. वहिनी सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा सुधांशू अमेरिकेत असतो. सूनही अनुज्ञा अमेरिकेत असते. बापूरावांचे कुटुंब समाधानात आहे. धनकवडीतील प्रभात शाखेशी बापूरावांचा संपर्क होता. तेथेही अनेक कार्यक्रमात ते सक्रिय होते.
बापूराव घरातच स्वस्थ बसले आहेत, विश्रांती घेत आहेत, असे दृश्य कधीही कोणी अनुभवले नाही. जुन्या स्वयंसेवकांच्या घरी जाणे, आजारी सहृदयांना भेटणे, सुख-दु:खांची दखल घेणे, अनेक कार्यक्रमांसाठी परगावी जाणे हे त्यांनी शेवटपणे आवर्जून केले. बापूरावांनी विश्रांती कधी घेतली नाही. शेवटी-शेवटी तर वॉकर घेऊन रिक्षानेही त्यांनी प्रवास केला. सक्रिय राहिले. अनेकांना कामाची प्रेरणा दिली. निर्लेप वृत्तीने काम केले. असे ज्येष्ठ, अनेकांचे पालक, साधी राहणी ही विशेषत: त्यांनी शेवटपर्यंत जपली. समाजातील अनेक थरांतील प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी त्यांचे आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे संबंध होते.
असे सदैव सक्रिय राहिलेले बापूराव आज आपल्या सगळ्यांना सोडून गेले. कृतार्थ, संपन्न आयुष्य जगले. सौ. वहिनींनीही त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या कार्यात मोलाची साथ दिली, हे विशेष आहे. ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती|’ या पद्याप्रमाणेच ते जीवन जगले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- विनायकराव डंबीर