आभासी जगातील ‘गणपत वाणी!’

    23-May-2026
Total Views |
Virtual Politics Propaganda India
 
इंटरनेटच्या विश्वात आपले पाठीराखे निर्माण करणे, ही काही फार मोठी गोष्ट नाही. अशी कृत्रिमरीत्या फुगवलेली आकडेवारी हेच वास्तवातील जनतेचे मत समजणे, यालाच ‘मुंगेरीलालचे स्वप्न’ म्हणतात. त्यांना कितीही वाटले, तरी त्यांच्या या आभासीजगतापेक्षा वास्तवातील विश्व फारच भिन्न असून, तेच त्यांच्या कल्पनेच्या विरुद्ध आहे. मोदी हे वास्तव जगाचे हिरो आहेत.
 
'शेखचिल्ली’ किंवा ‘मुंगेरीलाल’ यांसारख्या आपल्याच कल्पनेच्या मनोराज्यात वावरणार्‍या व्यक्तिरेखा, आता इंटरनेटवरही दिसतात. मुळात इंटरनेट हेच एक स्वतंत्र विश्व आहे. त्याला ‘व्हर्च्युअल’ किंवा ‘आभासी’ जगच म्हणतात. जे प्रत्यक्षात मिळत नाही, ते माणूस कल्पनेने मनात मिळविण्याचा प्रयत्न करतो. वास्तव जगात आपल्या मनासारख्या राजकीय घटना घडत नसल्याने नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींनी आता इंटरनेटचा आधार घेत, आपल्याला हव्या तशा घटना घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंटरनेटवर गेल्या चार दिवसांत निर्माण झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या संकेतस्थळाने, तसे दाखवूनच दिले आहे.
 
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका निकालात, देशातील बेरोजगार युवकांना झुरळांची उपमा दिली होती. त्यावरून कोणा अभिजित दीपके या तरुणाने इंटरनेटवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने संकेतस्थळ निर्माण करत, त्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरू केली. या संकेतस्थळाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते. पण, खोलात जाऊन हा प्रतिसाद देणारे कोण लोक आहेत, ते पाहिल्यावर त्यापैकी बहुसंख्य पाठीराखे हे पाकिस्तान, अमेरिका, तुर्कीये वगैरे देशांत राहणारे असल्याचे दिसून आले. याचाच अर्थ, हे कथित पाठीराखे भाडोत्री असून, भारतातील मोदी सरकारला बदनाम करणे आणि त्याच्याविरोधात असंतोष निर्माण करणे, याच कामात हे भारतविरोधी लोक गुंतले आहेत.
 
भारतात या संकेतस्थळाला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. स्वत: दीपके हा तरुण मूळचा पुण्यातील असला, तरी सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये शिक्षण घेत आहे. तो ‘आम आदमी पार्टी’चा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले. त्याने या पक्षासाठी डिजिटल मोहीमही राबविली होती. आता तो या झुरळांच्या पार्टीच्या संकेतस्थळावरूनही तेच काम पुढे चालवीत असल्याचे दिसते. त्याचा उद्देश अर्थातच, पुढील वर्षी होणारी उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणूक आणि नंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात जनमत तयार करणे, हे आहे. त्यासाठी देशातील तरुणांमध्ये (ज्यांना आजकाल ‘जेन-झी’ म्हणतात) विद्रोह निर्माण करायचा आणि त्यांना रस्त्यावर उतरून हिंसाचार करण्यास आणि लोकनियुक्त सरकारला सत्ताभ्रष्ट करण्यास प्रोत्साहित करायचे, हा आहे.
 
ही रणनीती नवी नाही. गेल्या काही वर्षांत भारताच्या शेजारी देशांमध्ये हीच रणनीती अवलंबिण्यात आली आणि तेथे सत्ताबदल करण्यात आला. भारतातल्या तरुणांनाही सरकार विरोधात चिथावण्यासाठी, गेल्या काही वर्षांपासून भारतविरोधी जागतिक शक्तींचे विविध प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यांच्या दुर्दैवाने भारतातील तरुण अशा प्रकारे देशात अराजक निर्माण करण्यास उत्सुक नाहीत, हे वेळोवेळी दिसले आहे. अगदी ताजे उदाहरण चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आहे. या चारपैकी तीन राज्यांमध्ये सत्ताबदल झाला. पण, तो सनदशीर मार्गानेच. पश्चिम बंगालसारख्या कमालीच्या दरिद्री व मागास राज्यात तर, आजवरचे विक्रमी मतदान झाले आणि भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवरही आला.
 
भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला, तरी तो प्रामुख्याने मनोरंजन आणि आर्थिक व्यवहारांसाठी होतो. इंटरनेटवरून राजकीय घडामोडी, मोदीविरोधी शक्तींना भारतात तितका पाठिंबा का मिळत नाही? याचे एक कारण असे आहे की, देशात भले अनेक समस्या असतील. पण, त्या मोदींमुळे निर्माण झालेल्या नसल्याचे देशातील जनता जाणते. उलट, मोदी यांचा बराचसा कार्यकाळ, पूर्वीच्या सरकारनेच केलेल्या चुका निस्तारण्यातच खर्च झाला आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने देशात इंधनाच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारी ‘बॉण्ड’ विक्रीस काढले. सुमारे दीड लाख कोटी रुपयांच्या या बॉण्डची व्याजासह परतफेड करण्यासाठी, मोदी सरकारला तब्बल तीन लाख कोटी रुपये मोजावे लागले. हे काम नुकतेच गेल्या महिन्यात पूर्णत्वास गेले. म्हणजे गेली १२ वर्षे मोदी सरकार पूर्वीच्या काँग्रेस सरकारचे बिल चुकते करीत होते. हे बॉण्ड विकले नसते, तर हाच निधी देशातील विविध विकास योजनांसाठी वापरता आला असता. यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
 
मोदी हे प्रामाणिकपणे देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही गोष्ट बहुसंख्य जनतेला मान्य आहे. तसेच सध्या उद्भविलेले इंधन संकट, हे मोदी यांच्या निर्णयामुळे उद्भवलेले नाही. तरीही, जगातील अन्य देशांच्या तुलनेत, भारताला या इंधनाच्या संकटाची झळ फारशी बसलेली नाही. त्याचे कारण मोदी सरकारने यापूर्वीच घेतलेले निर्णय! देशातील जनतेचा आणि अगदी तरुणाईचाही मोदी सरकारवर गाढ विश्वास आहे. काही तक्रारी वा नाराजी असली, तरी त्यावर तोडगा मोदीच काढू शकतील- नव्हे, ते काढतीलच, असा विश्वासही त्यांना वाटतो. म्हणूनच भारतविरोधी शक्तींचे देशात अराजक निर्माण करण्याचे सारे प्रयत्न विफल होतात. परिणामी, नैराश्याने घेरलेल्या या विरोधकांनी, आता आभासी जगात आपल्या मनाला हव्या तशा घटना घडविण्याचे ठरविलेले दिसते. ही ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा यापैकीच एक निष्फळ प्रयत्न म्हणावा लागेल. देशात सत्ताबदल करायचा, तर त्यासाठी जमिनीवर प्रत्यक्ष काम करावे लागते. ते कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. केवळ इंटरनेटवरील टीका आणि आवाहनामुळे राजकीय सत्ताबदल घडत नसतो. पण, सत्तेला हपापलेल्यांना सारे काही झटपट व्हायला हवे आहे. दुर्दैवाने वास्तव जगात हे चालत नाही.
 
आपल्याच कल्पनेच्या मनोविश्वात गुंगलेल्या लोकांपैकी, ‘गणपत वाण्या’ची व्यक्तिरेखा एका मराठी कवीने निर्माण केली होती. ‘गणपत वाणी’ हा दुकानात एकटाच असताना, आपल्या कल्पनेच्या मनोराज्यात गुंग होतो आणि त्यात तो लाथ मारतो. तेव्हा त्याच्या समोरील तेलाची बरणी पडून सारे तेल वाया जाते आणि त्याच्या सार्‍या भावी योजनाही फुकट जातात. या झुरळांच्या कथित जनता पार्टीनेही, अशीच एक लाथ हाणली आहे.