दि. २३ मे १९५१ रोजी चीनने तिबेटवर फसवून आणि जबरदस्तीने कब्जा केला. ७५ वर्षे झाली, पूज्य १४वे दलाई लामा भारतातच आहेत. चीनने २३ मे दिवस हा ‘तिबेटमुक्ती’ दिवस घोषित केला, तर तिबेटी नागरिक हा ‘काळा दिवस’ मानतात. त्या अनुषंगाने पूज्य लामा, तिबेटी बौद्ध इतिहास, चीनचे ‘मांचू साम्राज्य’ आणि बौद्ध धर्म याचा घेतलेला मागोवा...
तिबेटी बौद्धांची श्रद्धा आहे की, आठव्या शतकात भारतातून आलेले गुरू पद्मसंभव यांनी तिबेट आणि बौद्ध धर्माच्या रक्षणासाठी ‘पेहर’ नावाच्या देवतेला जबाबदारी दिली. ‘नेचुंग’ मठात अनुष्ठान केल्यावर पेहर देवता ‘ओरेकल’ (प्रमुख भिक्षू) यांच्या अंगात प्रवेश करते. १९५९ साली त्यानुसार एक घटना घडली. नेचुंग मठामध्ये अनुष्ठान सुरू झाले, मंत्रोच्चार उच्चारले जात होते. ‘ओरेकल’ने धातूचा ३० ते ४० किलोग्रॅम वजनाचा पोशाख परिधान केला होता. इतक्या जड पोशाखातही त्यांचे अंग थरथरू लागले. त्यांच्यात असीम शक्ती उत्पन्न झाली आणि ते विजेच्या चपळाईने नृत्य करू लागले. नृत्य करता-करताच ते प्राचीन भाषेत बोलू लागले. ‘ओरेकल’ अचानक गरजले, "जा, जा! इथून आज रात्रीच निघून जा.” कुठे आणि कसे जायचे, हेसुद्धा त्यांनी सांगितले. त्यांची आज्ञा मानून, तो राजभिक्षू राजा त्याच मार्गाने मार्गक्रमण करत भारतात आला. ते होते, १४वे दलाई लामा. आजही ते भारतात धर्मशाला (मैक्लोडगंज) इथे आहेत. इथे नेचुंग मठ स्थापित आहे. आजही तिथे ‘ओरेकल’ (थुप्टेन न्गोडुप) राहतात आणि आजही वेळोवेळी दलाई लामा यांना आणि त्यांच्या निर्वासित सरकारला मार्गदर्शन करतात. अविश्वसनीय आहे; पण तिबेटी बौद्धांची ती श्रद्धा आहे आणि शेवटी प्रत्येकाची आपापली श्रद्धा आणि अनुभव हा महत्त्वाचाच.
याच अनुषंगाने १४वे दलाई लामा यांना भारतात का यावे लागले? तर काही दशकांपूर्वी तिबेट स्वतंत्र देश होता. तिथे प्राचीन ‘बोन’ धर्म, तसेच न्यंग्मा, काग्यु, शाक्या, और गेलुग हे चार बौद्ध संप्रदाय शांततेत नांदत होते. मात्र, ऑक्टोबर १९५० मध्ये चिनी कम्युनिस्ट सैन्याने तिबेटवर हल्ला करत, तिबेटी सैन्याचा पराभव केला आणि मुख्य सैन्य अधिकारी न्गापो न्गावांग जिग्मे यांना युद्धबंदी केले. त्यांच्यापुढे ठेवलेल्या १७ कलमी करारामध्ये लिहिलेले होते की, तिबेट चीनचा स्वायत्त प्रांत असून, स्वतंत्र देश नाही. त्यामुळे तिबेटने इतर देशांशी संबंध ठेवू नये. तिबेटवर पूर्ण वर्चस्व चीनचेच असेल मात्र, दलाई लामांचे राजकीय आणि धार्मिक अधिकार कायम राहतील, तिबेटमधला बौद्ध धर्म चीन जपेल... वगैरे वगैरे.
जर तिबेटने चीनचे म्हणणे मान्य केले नाही, तर तिबेटमध्ये कत्तली केल्या जातील, बॉम्ब टाकले जातील, सगळे नष्ट करू, अशीही धमकी चीनने दिली. न्गापो न्गावांग जिग्मे यांनी या करारावर सही केली तो दिवस होता, दि. २३ मे १९५१. चीनने हा दिवस ‘तिबेटमुक्ती दिन’ मानला. मुक्ती दिन का? तर, चिनी कम्युनिस्टांनी कांगावा केला की, दलाई लामा हे सर्वोच्च पद उपभोगतात. त्यांच्याकडे सर्व सत्ता एकवटली आहे. बाकीच्या तिबेटी बौद्धांकडे त्यांच्या मानाने काहीच नाही. तिबेटमध्ये आर्थिक समता आणण्यासाठी, लामांची सत्ता काढून तिथे कम्युनिस्ट सत्ता आणली म्हणून मुक्ती दिन (!!!). मात्र, हे मत तिबेटी जनतेचे नव्हते. चीननेच हा खोडसाळ दावा केला होता. त्यामुळे तिबेटींसाठी हा काळाच दिवस होता.
या सगळ्या घटनेचा दलाई लामा यांनी विचार केला. चीनच्या प्रचंड सैन्यशक्तीपुढे टिकाव लागणार नाही, युद्धामध्ये तिबेटी बांधव नाहक मारले जातील. चीनचे म्हणणे मान्य केले, तर तिबेटमधील बौद्ध धर्म आणि तिबेटी तरी वाचतील. याच विचारांनी दलाई लामा यांनी चीनसोबत सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, दलाई लामा यांनी बौद्ध धर्म त्यागावा, त्यामुळे तिबेटची जनताही धर्म सोडेल, असे तत्कालीन चिनी सर्वोच्च नेता माओ त्से तुंग याला वाटत होते. त्याने तसा दबावही दलाई लामांवर आणला. त्याच वेळी चीनने तिबेटमधली हजारो प्राचीन मठ तोडले, अतिप्राचीन बौद्ध साहित्य जाळले, नष्ट केले. ‘कम्युनिस्ट’ सरकारने तिबेटी बौद्धधर्मियांवर अत्याचार केले. चीनमधल्या मूळच्या चिनीवंशीय लोकांनाही तिबेटमध्ये आणून वसवले. थोडक्यात, चीनने तिबेटमधून बौद्ध धर्म आणि जनता यांना नष्ट करण्याचा सपाटाच लावला. या अशा बिकट प्रसंगी लामा यांनी ‘ओरेकल’ यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यानुसारच ते भारतात आले.
२०व्या शतकातल्या या घटनेचे मूळ १६व्या शतकात आढळते. १६व्या शतकाच्या मध्यावर तिबेटमध्ये तत्कालीन लामांचे वर्चस्व होते. लामांचा मंगोलांवर प्रभाव होता. मंगोल राजाने बौद्ध धर्म स्वीकारला. पुढे चीनच्या भिंतीपलीकडील चीनवर राज्य करता यावे म्हणून, ‘मांचू’ सम्राटाने मंगोलांशी संबंध वाढवले. मंगोलांमुळे ‘मांचू’ सम्राट आणि तत्कालीन लामा यांचा संपर्क झाला. वर्ष १६३४ मध्ये मर्चन लामा यांनी ‘मांचू’ शासक ताई-सुंग (ताईजोंग) याला महाकालची मूर्ती भेट दिली.
महाकाल हा तिबेटी बौद्धांच्या परंपरेनुसार रक्षक देव. बौद्ध धर्मामधल्या या महाकाल देवाचे स्वरूप काय? तर, डोक्यावर आणि गळ्यात नुकत्याच कापलेल्या मुंडक्याची माळ, तीन डोळे, केस आणि दाढी आगीच्या ज्वाळाप्रमाणे वरच्या दिशेकडे वळलेले, कमरेला वाघाचे कातडे परिधान केलेले आणि आभूषण म्हणून शरीरावर विषारी सर्प. तिबेटच्या बौद्ध धर्मातले महाकाल देवता आणि तांडव करणार्या भगवान शंकर यांच्यात काही फरक आहे का? नाहीच.
देव नाही म्हणणारे आपल्या इथे काही लोक आहेत आणि ते दलाई लामांवर श्रद्धा ठेवतात, त्यांना हा इतिहास माहिती आहे का? असो, विषयांतर झाले. तर, ‘मांचू’ सम्राटाला ही मूर्ती मिळाली आणि काही काळातच त्याची सत्ता पूर्ण चीनवर प्रस्थापित झाली. हे लामांच्या आशीर्वादामुळेच झाले असे त्याला वाटू लागले. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. पुढे तिबेटमध्ये नेपाळ आणि भूतानचे राजे हल्ले करू लागल्यावर, लामांच्या तिबेटचे रक्षण म्हणून ‘मांचू’ने आपले सैन्य पाठवले. तिबेट आणि बौद्ध धर्माचे रक्षण ‘मांचू’ सम्राट करणार, त्याबदल्यात लामांनी त्याला आशीर्वाद द्यायचे हे ठरले. २०व्या शतकापर्यंत हे सुरू होते. या काळात तिबेटमध्ये स्वतंत्र देश म्हणून लामांचे वर्चस्व होते, सेना होती आणि स्वतंत्र प्रशासनही होते. ‘मांचू’ सम्राटाच्या श्रद्धेस्वरूपात, संरक्षणासाठी त्याचे सैन्य तिबेटमध्ये राहिले.
पुढे ‘मांचू’ सम्राटाच्या पुढच्या पिढीतील राजाला तिबेटवर सत्ता मिळवण्याची हाव सुटली. त्याने जबरदस्तीने तसा प्रयत्न केला मात्र, याच काळात चीनमध्ये राजेशाही उलथवण्याची कारवाई तीव्र झाली, ‘मांचू साम्राज्य’ कोसळले. राज्य कोसळल्याबरोबर तिबेटमध्ये असलेले सम्राटाचे सैन्य सैरभैर झाले. १९१२ साली त्यांनी तिबेटमध्ये लूटमार - हिंसाचार सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून लामांच्या सैन्याने त्यांच्यावर आक्रमण केले. तेव्हापासून तिबेटमध्ये ‘मांचू साम्राज्या’चे सैन्यच नव्हते. पुढे ४० वर्षे तिबेटमध्ये लामांचे धर्मराज्य होते मात्र, १९५० साली चीनने तिबेटच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. ‘मांचू’ सम्राटाचे सैन्यच तिबेटमध्ये असल्याने, तिबेट हा चीनचाच भूभाग असल्याचे चीनने म्हणण्यास सुरुवात केली. पण, केवळ हेच कारण नव्हते; तर चीनला तिबेट हवे होते. याची कारणे होती-
१. चीन आणि भारताच्या मध्ये तिबेट होते. तिबेटवर सत्ता मिळाल्यास भारतावर कुरघोडी करता येईल.
२. ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज, मेकांग, यांगत्ज़ी, आणि पिवळी नदी या सगळ्या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो. तिबेटवर कब्जा केल्यास, क या नद्यांवर कब्जा होईल आणि त्याद्वारे भारत, बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया आणि पाकिस्तान या देशांच्या पाणीपुरवठ्यावर अंकुश ठेवता येईल.
३. तिबेटमध्ये हे लिथियम, तांबे, सोने, युरेनियम आणि क्रोमियमचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.
४. जगभरातल्या बौद्धांची लामांवर श्रद्धा आहे. लामांनाच ताब्यात घेतल्यास, जगभरातले बौद्ध आपले म्हणणे मानतील असे चीनला वाटते. त्यामुळेच तर पुढचे लामा कोण? हे चीनच ठरवेल, असे चीन म्हणतो.
मात्र, पुढचा लामा हा परंपरेनुसारच ठरेल, चीन ठरवू शकत नाही, असे १४वे दलाई लामा यांनी स्पष्ट केले. या परिप्रेक्ष्यात चीनने तिबेटवर पारतंत्र्य लादून ७५ वर्षे झाली. याबद्दल जगभरातले उदारमतवादी गप्प आहेत. दुसरीकडे, भलेही चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसोबत तिबेटी बौद्धांनी तडजोड केली असली, तरी त्यांच्या अंतरंगात तिबेटच्या स्वातंत्र्याची ज्योत तेवते आहे. त्यामुळेच १४वे दलाई लामा यांचे शिक्षक त्रिजंग रिन्पोचे यांनी, १९५० साली ‘ग्यालू’ हे तिबेटचे राष्ट्रगीत लिहिले. त्यातली काव्य पंक्ती आहेत-
मी वांग वो क्यी नम पार ग्याल वि पे
डू क्यी मुन पा नम पार चोम ग्युर चिग
याचा अर्थ आहे- तिबेटवर आलेले परकीय संकटाचे आणि अन्यायाचे काळे ढग लवकरात लवकर नष्ट होवोत. लोकशाही, न्याय आणि स्वातंत्र्याचा नवा सूर्य तिबेटमध्ये पुन्हा एकदा अभिमानाने उगवावा.
९५९४९६९६३८